Header Ads Widget

ध्वनीची मर्यादा राखून १४ महत्वाच्या दिवशी ध्वनीक्षेपक वापरास सवलत - जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून अधिसूचना जारी

    अमरावती (प्रतिनिधी) : बंद जागा वगळता इतर ठिकाणी वर्षातून १४ सण, उत्सव व महत्वाच्या दिवशी ध्वनीची मर्यादा राखून ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देणारी अधिसूचना जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज जारी केली.

    श्रोतगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी ध्वनीची विहित मर्यादा राखून १४ महत्वाच्या दिवशी सकाळी ६ ते रात्री १२ या वेळेत सवलत जाहीर करण्यात आली आहे.

    त्यानुसार यंदा श्रीरामनवमी (१० एप्रिल),डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल), महाराष्ट्रदिन (१ मे), श्रीकृष्ण जयंती (१८ ऑगस्ट), गौरीपूजन सण (४ सप्टेंबर), अनंत चतुर्दशी (९ सप्टेंबर), नवरात्र पंचमी (३० सप्टेंबर), नवरात्र अष्टमी (३ ऑक्टोबर), नवरात्र नवमी (४ ऑक्टोबर), ईद ए मिलाद (९ ऑक्टोबर), दिवाळी सण धनत्रयोदशी (२३ ऑक्टोबर), दिवाळी सण लक्ष्मीपूजन (२४ ऑक्टोबर), नाताळ (२५ डिसेंबर), नूतन वर्ष (३१ डिसेंबर) या १४ सणांच्या दिवशी ही सवलत जाहीर करण्यात आली आहे.

    या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्था व ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाची राहील. ध्वनी प्रदूषण नियम २००० अंतर्गत स्थापित ध्वनी प्राधिकरणाने त्यांच्याकडे प्राप्त तक्रारींवर मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करावी, तसेच प्राधिकरणाने निदर्शनास आणून दिलेल्या बाबींवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिका-यांनी कार्यवाही करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या