Recent in Technology

Advertisement

Breaking News

अमरावती महानगरपालिकेची ८० टक्के मालमत्‍ता कर वसुली

    अमरावती प्रतिनिधी : महानगरपालिकेने ३१ मार्चपर्यंत थकीत मालमत्ता करावर शास्ती माफ केली होती. त्यानंतर मालमत्ताधारकांकडून थकीत मालमत्ता कर भरण्याबाबत चांगला प्रतिसाद मिळत असल्याने मार्च अखेरपर्यंत वसुली ८० टक्क्यांपर्यंत झाली आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ४० कोटी रुपयांच्यावर मालमत्ता कर वसुली करण्यात आली आहे. यावेळी महानगरपालिका प्रशासक डॉ.प्रवीण आष्‍टीकर यांनी मुल्‍यनिर्धारक नि कर संकलन अधिकारी महेश देशमुख, झोन क्र.१ सहाय्यक आयुक्‍त योगेश पिठे, झोन क्र.२ सहाय्यक आयुक्‍त नरेंद्र वानखडे, झोन क्र.३ सहाय्यक आयुक्‍त नंदकिशोर तिखिले, झोन क्र.४ सहाय्यक आयुक्‍त श्रीरंग तायडे, झोन क्र.५ सहाय्यक आयुक्‍त तौसिफ काझी, सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी, कर निरीक्षक, मालमत्‍ता कर वसुली लिपीक यांचे अभिनंदन केले. मागील वर्षी ६७ टक्‍के इतकी मालमत्‍ता कर वसुली झाली असुन ३३ कोटी रुपये मालमत्‍ता कर वसुल करण्‍यात आला होता. यावर्षी मागील वर्षापेक्षा १३ टक्‍क्‍याने मालमत्‍ता कर वसुली वाढली असुन त्‍याचप्रमाणे ७ कोटी रुपये अधिक मालमत्‍ताकर वसुल करण्‍यात आला.

    महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्‍त्रोत मालमत्ता करातून मिळणारे उत्पन्न आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाला मालमत्ता कर वसुलीवर विशेष भर द्यावा लागतो.यावर्षी मात्र थकबाकीसह चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीवर विशेष भर देण्यात आला. थकबाकी वसुलीसाठी शास्ती (दोन टक्के व्याज) माफीची योजना राबविण्यात आली. त्याला मुदत वाढ देण्यात आली. त्यामुळे मार्चमध्ये कर वसुलीचा आलेख उंचावला.

    २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरीता ५० कोटी ५६ लाख ८९ हजार ७४४ रुपयाच्‍या मालमत्‍ताकराच्‍या वसुलीचे उद्दीष्‍ट अमरावती महानगरपालिकेने ठेवले होते. त्‍यापैकी ४० कोटी ८३ हजार १४२ रुपयाच्‍या मालमत्‍ताराची वसुली मनपाच्‍या कर विभागाने केलेली आहे. उर्वरित मालमत्‍ताकराच्‍या वसुलीसाठी अमरावती महानगरपालिकेकडून विशेष वसुली अभियान राबविण्‍यात आले होते. त्‍या अंतर्गत अमरावती शहरात प्रत्‍येक झोनमध्‍ये वसुली शिबीराचे आयोजन करण्‍यात आले. या विशेष वसुली शिबीरातून अमरावती महानगरपालिकेने पाचही झोन मधून ४० कोटी ८३ हजार १४२ रुपयाच्‍या मालमत्‍ताकराची वसुली केली आहे. त्‍यामध्‍ये झोन क्र.१ मधून ११ कोटी ४४ लाख ४४ हजार ७८८ रुपये, झोन क्र.२ मधून ११ कोटी ५१ लाख ७४ हजार ९८२ रुपये, झोन क्र.३ मधून ९ कोटी २४ लाख ८४ हजार ०८५ रुपये, झोन क्र.४ मधून ४ कोटी ९१ लाख ०३ हजार ६८४ रुपये, झोन क्र.५ मधून २ कोटी ९४ लाख ७५ हजार ०२५ रुपये अशा प्रकारे मालमत्‍ताकराची वसुली करण्‍यात आली आहे.

    सन २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षातील एकूण मालमत्ता कराची मागणी ५० कोटी ५६ लाख ८९ हजार ७४४ एवढी होती. या आर्थिक वर्षांत शास्ती माफीची योजना राबविल्याने आतापर्यंत ४० कोटी ८३ हजार १४२ रुपये वसुली झाली आहे.सन २०२१-२२ मध्‍ये काही शासकीय मालमत्‍तांना अनुदान प्राप्‍त झाले नसल्‍यामुळे शासकीय मालमत्‍तांचे मागणी पोटीच रक्‍कम १ कोटी २१ लाख ४३ हजार ४०४ रुपये वजावट करुन शुध्‍द मागणी ४९ कोटी ३५ लाख ४६ हजार ३४० कोटी असुन त्‍यानुसार वसुलीची टक्‍केवारी ८१.०६ टक्‍के एवढी आहे.

    जानेवारी ते मार्च,२०२२ या कालावधीमध्‍ये मालमत्‍ता करावर आकारण्‍यात आलेल्‍या दंडाच्‍या रक्‍कमेवर सुट देण्‍याकरीता विशेष योजना राबविण्‍यात आली होती. त्‍या अनुषंगाने दंडात्‍मक रक्‍कमेमधुन १ कोटी ६८ लाख ५५ हजार ९७३ रुपये कायमस्‍वरुपी सुट देण्‍यात आल्‍यामुळे मागणीमधील ही रक्‍कम वजा करण्‍यात आली आहे. मालमत्‍ताधारकांनी आपला थकीत मालमत्‍ता कर लवकरात लवकर भरुन महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन अमरावती महानगरपालिकेने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code