Header Ads Widget

प्रवासी गाड्याना सुरक्षा प्रदान करण्याची गरज..!

  * रेल्वे प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर..!

  धावत्या रेल्वेत प्रवाशांना लक्ष करण्याचे प्रकार औरंगाबाद मुंबई विभागात सध्या वाढले आहेत. यापूर्वी ५ एप्रिलला नंदीग्राम एक्स्प्रेस आणि नांदेड मनमाड पॅसेंजर रेल्वे थांबवून लुटमार केल्याची घटना घडली होती.ही घटना ताजी असतानाच आता परत एकदा दरोडेखोरांनीऔरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर 8 ते 10 जणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री दौलताबाद-पोटूळ दरम्यान ही धक्कादायक घटना घडल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे प्रवासी गाड्याना सुरक्षा प्रदान करण्याची गरज आहे.

  चक्क सिग्नलला कापड बांधून रेल्वे थांबवून आठ ते दहा जणांच्या टोळीने लुटमार केल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास अर्धा तास हा सगळा प्रकार सुरू होता. दरम्यान एक महिलेच्या गळ्यातील चैन आणि इतर वस्तू चोरल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे, रेल्वे डब्बा S5 ते S9 वर दगडफेक करण्यात आली असून घटनास्थळी ॲम्बुलन्स देखील उभी होती.. दरम्यान हे दरोडेखोर ॲम्बुलन्समधून आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे, 5 एप्रिल रोजी अशाच प्रकारे नंदीग्राम एक्स्प्रेस आणि नांदेड मनमाड पॅसेंजर रेल्वे थांबवून लुटमार केल्याची घटना घडली होती.

  औरंगाबाद येथे मुंबई-नांदेड नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वेगाडीला पोटूळ रेल्वे स्टेशनजवळ लाल दिवा दाखवून थांबवून रेल्वेत घुसलेल्या चार ते पाच दरोडेखोरांनी प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने, तर मोबाईल हिसकावल्याची घटना घडल्यानंतर 5 एप्रिलला शुक्रवारी रात्री 12.55 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती देऊनही पोलीस यंत्रणा सक्रिय न झाल्याने रात्री पावणेतीन वाजेच्या सुमारास नांदेड-मनमाड या पॅसेेंजर रेल्वेला अशाच प्रकारे थांबवून दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून प्रवाशांना लुटल्याची दुसरी घटना घडल्याने प्रवाशांत खळबळ उडाली.

  याप्रकरणी औरंगाबाद लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मुंबईहून औरंगाबाद मार्गे नांदेडला निघालेली नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वेगाडी शुक्रवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास लासूर स्टेशन येथून औरंगाबादकडे येत होती. त्यावेळी देखील पोटूळ रेल्वे स्टेशन येथील ग्रीन सिग्नलला दरोडेखोरांनी कपडा बांधून झाकले. यामुळे केवळ लाल सिग्नल रेल्वे मोटारमनला दिसल्याने स्टेशनजवळच चालकाने गाडी थांबविली. गाडी थांबताच धारदार शस्त्रे घेऊन रेल्वेतील एका डब्यात घुसलेल्या दरोडेखोरांनी प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करण्यास सुरुवात केली होती.

  रेल्वेत वारंवार दरोडेखोरी होत असल्याने प्रवाशांची सुरक्षा वार्‍यावर असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. एकीकडे रेल्वे गाड्यांची संख्या वाढत असताना त्या मानाने सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाचे जवान गस्तीसाठी कमी पडत आहेत की गस्तीमध्ये ढिसाळपणा आला आहे? याबद्दल प्रवाशांना कोडे पडले आहे. एका गाडीवर सरासरी रेल्वे सुरक्षा बलाचे दोन ते चार जवान गस्तीवर असतात. या जवानांना पहिल्या ते 22 व्या डब्यापर्यंत गाडीची तपासणी करणे अनिवार्य असते. तरीही प्रवाशांना वेगवेगळ्य़ा पद्धतीने लुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. आरपीएफचा कोणताही धाक उरलेला नसल्याने लुटमारीच्या प्रकारांची पुनरावृत्ती होत असल्याचा सूर यामुळे उमटत आहे. दरम्यान, धावत्या रेल्वेत गस्तीची जबाबदारी आरपीएफचे जवानांवर असते. मात्र, लुटमारी किंवा प्रकरणांच्या तपासासाठी लोहमार्ग पोलिसांकडे जबाबदारी असते. आरोपींना अटक करण्यासाठी, व्हीआयपींच्या बंदोबस्तासाठी लोहमार्ग पोलिसांचे पथक नियुक्त केले जाते.एकंदरीत रेल्वे गाड्यांच्या तुलनेत रेल्वे सुरक्षा दलांची व जवानांची संख्या कमी असल्याने गस्ती अभावी रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे.रेल्वेत चोरी, दरोडे, लुटमारीचे प्रमाण प्रचंड वाढलेले असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी काही चोरट्यांना पकडले असले तरी त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी कोणतीही ठोस उपाययोजना केली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

  प्रा डॉ सुधीर अग्रवाल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या