Recent in Technology

Advertisement

Breaking News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीला येणार गती समितीकडून पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना माहिती सादर

  * नांदगावपेठ येथील नियोजित जागेवर तज्ज्ञांचे शिक्कामोर्तब

  अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नांदगावपेठ येथील 18.53 हेक्टर जागेवर उभारण्याबाबत तज्ज्ञांच्या समितीने मान्यता दिली असून, वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. नियोजित जागा 'राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगा'च्या निकषांनुसार योग्य असल्याची माहिती तज्ज्ञांच्या समितीने महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याशी चर्चा करून सादर केली.

  अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याबाबत जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यानुसार जानेवारी, २०२१ मध्ये हा विषय कॅबिनेटपुढे येऊन सकारात्मक चर्चा झाली व अर्थसंकल्पीय अधिवेशनातही महाविद्यालयासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली. अमरावती येथील नांदगावपेठमधील सुमारे 18.53 हेक्टर शासकीय जमीनही उपलब्ध करून देण्यात आली.

   'राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगा'च्या (एनएमसी) निकषानुसार प्रस्तावित जागा, नियोजित रचना आदींबाबत अहवाल करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली. या समितीकडून नांदगावपेठ येथील जागेची पाहणी करण्यात आली. समितीने सदर जागा वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय उभारण्यासाठी योग्य असल्याचे शिक्कामोर्तब केले असून, महाविद्यालय निर्मितीचा मार्ग सुकर झाला आहे. तज्ज्ञांच्या समितीने पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांची भेट घेऊन माहिती दिली व महाविद्यालय उभारणीच्या अनुषंगाने चर्चा केली.

   जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आरोग्याची एक चांगली सुविधा शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाद्वारे उभी राहणार आहे. हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय 2023-24 या वर्षात पूर्णत्वास जाण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्यात येतील. महाविद्यालयाची उभारणी गतीने होणे आवश्यक आहे. त्यासाठी आवश्यक निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी दिली.

   महाविद्यालय स्थापनेसाठी नियुक्त समितीत नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. संजय पराते यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचनाशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.तारकेश्वर गोडघाटे, औषधवैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.व्ही.आय. खंडाईत यांची सदस्य म्हणून नियुक्त आहेत. नोडल अधिकारी म्हणून डॉ.विजय शेगोकार यांच्याकडे, तर प्रशासकीय कामकाजात मदत करण्यासाठी नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code