Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

समतेचे खंदे पुरस्कर्ते - प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  भारतीय राज्यघटनेने शिल्पकार, आधुनिक भारताचे राष्ट्रनिर्माते समतेचे खंदे पुरस्कर्ते, तुम्हां आम्हाला सर्व भारतवासीयांना देशभक्ती अन् राष्ट्रप्रेमाची शिकवण देणारे युगप्रवर्तक महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर. यांची आज १३१ वी जयंती जगभरात साजरी होत आहे.

  आभाळ होतं फाटलेलं..!
  दु:खाच्या अश्रुंनी दाटलेलं..!!
  उजेडास नव्हता कधी थारा..!
  अंधार झाला होता मानवात सारा..!!

  कवीच्या कवितेतील काव्यपंक्ती प्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माआधी साऱ्या समाजाची अशी अवस्था झाली होती.

  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाल्यावर ...!

  'उध्दरली कोटी कोटी कुळे,भीमा जन्मामुळे..!खरंच एका कवीच्या या कवितेच्या ओळीमध्ये किती अर्थ दडलेला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मामुळे हजारो वर्षांपासून गुलामगिरीच्या गर्तेत सापडलेल्या समाजाला बाहेर काढुन त्यांना स्वाभिमानाचं जीवन दिलं आहे. हजारो वर्षांपासून मृताचं जीवन जगणाऱ्या माणसाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चैतन्य संजीवनी देवुन नवे जीवन दान दिले आहे. हे आपण विसरता कामा नये.

  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अज्ञान, अंधश्रद्धा, गुलामगिरी व जाचक रुढी परंपरेविरुध्द लढाई जिंकणारे ते एक असामान्य धुरंधुर योध्दा होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दुरदृष्टीने विचार करणारे विचारवंत होते. जोपर्यंत शुद्रातिशुद्रांची मानसिक गुलामगिरी दुर होत नाही. तोपर्यंत शुद्रातिशुद्रांचा उध्दार होणे शक्य नाही. त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा सखोल चिकित्सक अभ्यास करुन विज्ञानवादी बुद्ध धम्माचा स्वीकार केला. यातुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा डोळस विज्ञानवाद दिसुन येतो.

  समतेसाठी उभारलेला मानवी हक्काचा लढा म्हणजे 'महाड सत्याग्रह' हा‌ संघर्ष घोटभर पाण्यासाठी नसुन तो मानवी हक्कासाठी आहे. या चवदार तळ्याचे पाणी पिऊन आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. तसा विचार सनातन्यांनी आपल्या मनामध्ये आणु नये. अशा प्रकारे संयमी नेतृत्व, कुशाग्र बुद्धीच्या बळावर त्यांनी २० मार्च १९२७ रोजी उभारलेला '‌महाड‌ सत्याग्रह' यशस्वी केला. व वर्षांनुवर्षे तहानलेल्या चातकाला भीम सागराने पाणी पाजुन तृप्त केले.

  हिंदू धर्म हा जर जगातील श्रेष्ठ धर्म आहे.असा डमका वाजवला जात आहे ! मग त्यामध्ये अनेक जाती आणि उपजाती का आहेत? मग त्या धर्मात अस्पृश्यता का‌ ?पाळली जात आहे. हे शोधण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ' अस्पृश्य ‌मुळचे कोण,व ते तसे का बनले. याचा शोध घेवुन त्यांनी ' शुद्र पुर्वी कोण होते '?हे पुस्तक लिहिले. व याचा मुळ पाया हा हिंदू धर्मग्रंध आहेत. त्यांनाच नाकारण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाडच्या भुमीत' मनुस्मृती ' दहन केली. व हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी, परंपरा यांना‌ बाबासाहेबांनी कायमचीच मुठमाती दिली. हम सबका मालिक एक हैं, तर हिंदुच्या मंदिरात देव -देवताचं आम्हाला दर्शन का घेता येत नाही?आणि म्हणुनच नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह केला. हा सत्याग्रह जवळपास ५ वर्षे चालू होता. ५ वर्षे चाललेल्या हा सत्याग्रह पाहुनी प्रभु रामाने मात्र मंदिराचे दारच उघडले नाही.हिंदुना झोपेतुन जागं करण्यासाठी त्यांनी सामाजिक चळवळीच्या माध्यमातून घावाघावर घाव घातले. त्यातच सर्वात मोठा धक्का दिला. तो नाशिक जिल्ह्यातील येवला येथे १३ ऑक्टोबर १९३५ रोजी .धर्मांतराची घोषणा केली.परंतु त्यानंतर ते तब्बल २१ वर्षे अस्पृश्य समाजाला चेतवित राहिले. आणि अस्पृश्य समाजांनी बाबासाहेबांना साथ दिली.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरच्या भुमीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. समस्त मानवाला बाबासाहेबांनी बौध्द धर्माचा रुपानं नवचैतन्य दिले आहे.

  आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती. ह्या जगामध्ये काही माणसे पिढ्यानपिढ्या श्रीमंत असतात. त्यामुळे ती जगात जन्मला येतात तो हातात सोन्याचा चमचा घेवुनच. तर काही माणसांवर मोठेपणा लादला जातो.पण, अशीही काही माणसे आहेत. ती स्वकर्तृत्वाने मोठी होतात. आणि आपल्या असामान्य कर्तृत्वाने जगाचं प्रेरणास्थान होतात. आणि अशा प्रेरणा स्थानासमोर साऱ्या जगाला आदरपूर्वक नतमस्तक ह्यावे लागते.

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर.हे स्वकर्तृत्वाने मोठे होऊन महान झाले. इथल्या धर्मव्यवस्थेने त्यांना नाकारुन बहिष्कृत केले. त्यांनी कोणालाही न जुमानता अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत परदेशात जाऊन शिक्षण घेतले.व विद्याविभूषित झाले. त्यांच्या विद्वत्तेचा गौरव अमेरिकेतील ' कोलंबिया ' विद्यापिठाने " सिम्बॉल ऑफ दि नाॅलेज " ( ज्ञानाचे प्रतीक ) म्हणून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा' कोलंबिया विद्यापीठाने पुतळा उभारुन अभिमानाने गौरव केला आहे.तर जागतिक स्तरावर त्यांना " सिम्बॉल ऑफ दि इक्कॅलिटी " असे संबोधण्यात आले आहे. त्यांच्या कार्य अन् कतृत्वाची उंची ही हिमालयाच्या शिखरापेक्षाही मोठी आहे. त्यांची विद्वता ज्ञानसागराची खोली ही महासागरापेक्षाही खोल आहे. त्यांचे विचार हे निळ्या नभाला भिडणारे अन् युगानुयुगे ह्या मातीमध्ये उगवणारे माणिक ,मोती रत्ने आहेत. अशा ह्या युगप्रवर्तक, महामानव,प्रज्ञासुर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांस शतशः प्रणाम...!

  - प्रविण खोलंबे.
  मो. ८३२९१६४९६१.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code