Header Ads Widget

झाड झाला भीमराया...

    लाख,कोटी वंचितांचा,श्वास झाला भीमराया
    शोषितांच्या प्रेरणेचे, झाड झाला भीमराया
      कायद्याची देत पाचर,ध्वस्त केली बा गुलामी
      विषमतेच्या धोरणाला,धाक झाला भीमराया
      धम्म देऊनी अम्हाला, संपवीली अस्पृश्यता
      ध्येयतीरा गाठणारी, नाव झाला भीमराया
      पेन पाटी देत हाती, हाक दीली लेकरांना
      शिक्षणाच्या पावलांची,वाट झाला भीमराया
      घातले तू पालथे जग, पुस्तकाला चाळताना
      शब्दक्रांती लेखनीची,धार झाला भीमराया
      न्याय,समता, बंधुतेची, धम्म बीजे रोवली तू
      माणसाला जोडणारी,तार झाला भीमराया
      घातली तू गवसनी बा,शिक्षणाच्या डोंगराला
      लोकशाही भारताचा, प्राण झाला भीमराया
      पिंपळाच्या आश्रयाला,लाख येती नील पक्षी
      धम्मक्रांतीच्या रथाचे,चाक झाला भीमराया
      विश्व ज्याला वंदिते त्या,विश्वरत्नाची जयंती
      'मा' रमाई जाहली अन् ,बाप झाला भीमराया
      -अरुण विघ्ने
      (ही कविता समजून वाचावी)
      चित्र सौजन्य : संदेश तुपसुदरे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या