अमरावती : मागील दोन महिन्यांत कोविड 19 च्या रूग्णांमध्ये दिसून आलेली शाश्वत व लक्षणीय घट लक्षात घेता कोविड 19 साथीच्या अनुषंगाने लागू निर्बंध काढून टाकण्यात आले आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज जारी केला.
सर्वच जिल्ह्यातील कोविड रूग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून, पॉझिटिव्हिटी दर व वापरात असलेली वैद्यकीय खाटांची संख्या नियंत्रणात आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात कोविड निर्बंधाबाबत लागू सर्व आदेश मागे घेण्यात आले आहेत. एक एप्रिलच्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात यापूर्वीचे कोणतेही निर्बंध लागू राहणार नाहीत. तथापि, व्यक्तिगत व सामाजिक आरोग्याचे संरक्षण करण्याच्या हेतूने कोविड अनुरूप वर्तणूकीचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी केले आहे.
प्रतिदिन आढळणारी रूग्णसंख्या, पॉझिटिव्हिटी दर आदींबाबत आरोग्य व संबंधित यंत्रणांनी लक्ष ठेवून सतर्कता बाळगावी. कोणत्याही स्थितीत साथरोगाचा पुनश्च प्रादुर्भाव आढळल्यास तत्काळ आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला सूचित करावे, असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिक, विद्यार्थी यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना व जनजागृती सातत्याने सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या