- * डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाचा उपक्रम
अमरावती (प्रतिनिधी) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त राज्यभरात आजपासून दि. 16 एप्रिलपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमात संपूर्ण 10 दिवस संविधान जागर, सामाजिक न्याय विभागांच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद, कार्यशाळा, शाळा महाविद्यालयांतून विविध स्पर्धांचे आयोजन आदी कार्यक्रम होतील, अशी माहिती प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे यांनी आज दिली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमात सलग 10 दिवस अभिनव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. कार्यक्रमाचा शुभारंभ प्रादेशिक उपायुक्त श्री. वारे यांच्या उपस्थितीत आज झाला. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्य तथा उपायुक्त जया राऊत, सहायक समाजकल्याण आयुक्त माया केदार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते. सामाजिक समता कार्यक्रमाची माहिती देताना श्री. वारे म्हणाले की, या कार्यक्रमात दि. 7 एप्रिल रोजी विविध महाविद्यालये, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे, निवासी शाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आदींचे आयोजन, तर 8 एप्रिलला स्वाधार शिष्यवृत्ती मिनी ट्रॅक्टर लाभार्थ्याना प्रतिनिधीक वाटप, दि. 9 एप्रिलला ज्येष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबीर व नागरिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
ते पुढे म्हणाले की, दि. 10 एप्रिलला विविध महाविद्यालये, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह निवासी शाळा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन, दि. 10 एप्रिलला जिल्ह्यात समतादूतमार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य, लघुनाटिकांद्वारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेचे प्रबोधन करणे, दि. 11 एप्रिलला महात्मा फुले जयंती कार्यक्रम, व्याख्यानमाला, दि. 12 एप्रिलला प्रत्येक जिल्हयात मार्जिन मनी योजनेंतर्गत कार्यशाळा आयोजित करणे, मार्जिन मनी योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांची कार्यशाळा आयोजित करणे आदी कार्यक्रम होतील.
दि. 13 एप्रिलला संविधान जनजागृती कार्यक्रम होणार आहे. दि. 14 एप्रिलला सामाजिक न्याय विभाग अंतर्गत सर्व शासकीय कार्यालय, निवासी शाळा, आश्रमशाळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रम, व्याख्याने, चर्चासत्र आदी कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत होतील. त्याचप्रमाणे, यादिवशी जात पडताळणी प्रमाणपत्रांचे ऑनलाईन वितरण कार्यक्रमही होणार आहे. तसेच, जिल्हास्तरावर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान मेळावा व व्याख्यानमाला होईल. दि. 15 एप्रिलला सहायक आयुक्त कार्यालयात महिला मेळावा, तसेच महापुरूषांच्या कार्याबद्दल व्याख्याने होतील, तसेच, तृतीयपंथी व्यक्तींमध्ये जनजागृती व ओळखपत्र वाटप कार्यक्रम होणार आहेत. दि. 16 एप्रिलला ग्रामीण व शहरी भागामध्ये अनुसुचित जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे व अनुसुचित जाती व नवबौद्ध वस्ती सुधार लाभार्थ्यांचे मनोगत कार्यक्रम आणि समता कार्यक्रम समारोप होईल, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या