हे क्रांतीसुर्या !!

हे क्रांतीसुर्या,

तू नाकारलास इथला बेगडी धर्म
नी सत्यालाच मानले ईश्वर
सावित्रीच्या हाती लेखणी देऊन
गिरवीलेस स्त्रीत्वाचे अक्षर
सत्यशोधक चळवळीतून
तू उभा केलास झंजावात
अस्पृश्यता जातिभेदाविरुद्ध
इथल्या व्यवस्थेविरुद्ध आसूड उगारून
सूर्याप्रमाणे तळपत राहिलास
नी सिद्ध केलस ‘महात्मा’ हे बिरुद!!
तुझ्या लेखणीतून पाझरले निरंतर
वंचित शोषितांचे दुःख !
रंजल्या-गांजल्यांसाठी तू त्यागलेस
ऐशोआराम नी अमाप सुख !!
मानवजातीच्या कल्याणासाठी
तू खुला केलास ‘फुले वाडा’
काळजामध्ये कोरला आहे
तुझा ‘छत्रपतींवरील पोवाडा’!!
विद्येची महती सांगून
जोडलीस शेतीमातीशी नाळ
तुला घेऊन जाताना
रडला असेल काळ !!
हे क्रांतीसुर्या,
‘ज्योतीप्रमाणे’ जळत राहिलास
तू अखेरच्या श्वासापर्यंत !
मानवतेसाठी लढणारा
तू होतास ‘महात्मा संत’!!
••••
– अनिकेत जयंतराव देशमुख
गोपालखेड जि. अकोला