सामाजिक न्याय, लोकशाही मूल्यांप्रती जागृतीसाठी महिला व युवकांनी पुढाकार घ्यावा- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती : सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी व शेवटच्या माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबरोबरच सामाजिक जागृतीही आवश्यक आहे. नागरिकांनी आपल्या हक्क व कर्तव्यांप्रति अधिकाधिक जागरूक राहिले पाहिजे. सामाजिक न्याय व लोकशाही मूल्यांप्रती जागृतीसाठी महिला व युवकांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत महिला मेळावा सामाजिक न्यायभवनात झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे,जयंतराव देशमुख, डॉ. अंजली ठाकरे, श्यामला कटके, प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, सहायक आयुक्त माया केदार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, माविमचे जिल्हा समन्वयक सुनील सोसे आदी यावेळी उपस्थित होते.

    पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, सामाजिक न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह नागरिकांचा कृतीशील सहभागही आवश्यक आहे. आजच्या सामाजिक पर्यावरणात लोकशाही मूल्यांची बूज व सजगता राखणे न्याय, स्वातंत्र्य, समता या मूल्यांच्या संरक्षणासाठी एकजुट आवश्यक आहे. नागरिक म्हणून आपल्या अधिकार व कर्तव्याप्रति सजग राहणे आवश्यक आहे. सामाजिक समता सप्ताह यापुढे मोठ्या प्रमाणावर साजरा व्हावा, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

    महिलांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे कार्य आहे. त्यांचा विचार डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे, असे आमदार श्री. वानखडे यांनी सांगितले.

    दिव्यांग खेळाडूला सात लाखांची मदत

    जि. प. दिव्यांग निधीतून दिव्यांग खेळाडू किरण मेटकर यांना इंटरनॅशनल व्हील चेअरसाठी ७ लाख ३० हजार रूपये निधीचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी पालकमंत्र्यांनी किरणचा गौरव करत संवाद साधला. किरण मेटकर यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.

    सबलीकरण योजनेत जमीनवाटप

    कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमिहिन सबलीकरण योजनेत ८ लाभार्थ्यांना जमीनवाटप करण्यात आले. पशुधन वाटप योजनेत १० लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. श्री. जाधवर यांनी जि. प. समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. श्रीकृष्ण पखाले यांनी सूत्रसंचालन केले.