- रखरखता अग्नी अंगावर पांघरून
- पळस एकटाच फुलतो
- कधी रानात तर कधी रस्त्याच्या दुतर्फा
- भर उन्हाळ्यात.
- येणा-या-जाणा-यांना ,पशू-पक्ष्यांना,
- चिडी-मुंग्याना, भुंग्यांना मोहीत करीत असतो, विनामूल्य क्षुधा शमवित.
- एरव्ही मात्र सर्व ऋतूत तो निर्वंश भासतो
- पण फुलण्यासाठी वसंताची वाट बघतो
- त्याची रक्तवर्णी फुलंही आमच्या आयुष्यात रंग भरण्यासाठी तत्पर असतात सदैव.
- आणि फाल्गुन मासात सर्वांना
- मनमुराद चैतन्य बहाल करीत
- स्वतः मात्र झेलत असतो
- उघडा-बोडखा उन्हाचे प्रहार बिनबोभाट.
- काही माणसाचंही अशीच तपतात,जळतात
- पण आम्ही लोक हव्यासापोटी त्याचे हात-पाय धडापासून वेगळे करतो निर्दयीपणे,
- त्याला अधू करून सोडून देतो पाण्याविना निराधार तडफडत जगण्यासाठी.
- झाड,माणूस बणण्याचा जीव ओतून प्रयत्न करीत असतं,
- आपलं सर्वस्व इतरांच्या सेवेसाठी पणाला लावित असतं
- पण माणसातील माणूस मात्र बणताना दिसत नाही
- ते सर्वानांच सारखंच प्रेम देतं
- माणसाचं मात्र तसं नसतं
- याचंच दुःख कायम मनात सलतं
- समजलं तरी उमजत नसतं
- येथेच तर खरं पाणी मुरत असतं.
- मला झाड नाही तर किमान
- माणसातील माणूस तरी होता आलं पाहिजे
- -अरुण विघ्ने
- (“पिंपळ व्हायचंय मला ” या कवितासंग्रहामधून)