अमरावती :खरीप पणन हंगाम सन 2021-22 मध्ये खरेदी केलेले भरडधान्य मका तसेच ज्वारी यांचे लक्ष निर्धारित करुन मार्च 2022 मध्ये शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये अंत्योदय कार्डधारकांना 5 किलो प्रति कार्ड तर प्राधान्य कुटूंब योजनेंतर्गत प्रति माणसाला एक किलो धान्याचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हृयातील अंत्योदय तसेच प्राधान्य कुटूंब योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना मार्च ते मे 2022 या कालावधीत शासनस्तरावरुन 3793.50 क्विंटल ज्वारी तर 29768 क्विंटल मका या भरडधान्याचे वितरण करण्यात येणार आहे.
मार्च 2022 मध्ये गव्हाचे नियतन कमी करुन अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना गव्हासोबतच मका व ज्वारी हे भरडधान्य वितरित करण्यात येत आहे. यासाठी शासकीय धान गोदामात पुरविण्यात आलेला मका, ज्वारी हे भरडधान्य रास्तभाव दुकानदारामार्फत शिधापत्रिकाधारकांना मार्च महिन्यातच देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच वाटपाअभावी मका, ज्वारी हे भरडधान्य गोदामात पडून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. वितरणाअभावी धान्य खराब झाल्यास त्याबाबत जबाबदारी निश्चित करुन सदर रकमेची बाजार भावाने संबंधितांकडून वसूली करण्यात येईल. याची नोंद घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी पत्रकाव्दारे केले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या