अमरावती : युवा पिढीत वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी शिराळ्याच्या धर्तीवर गावागावात वाचनालये निर्माण करा. असे प्रतिपादन पालकमंत्री अँड. यशोमती ठाकूर यांनी आज शिराळा येथे केले.समाज कल्याण विभागामार्फत शिराळा येथील मागासवर्गीय वस्तीमधील वाचनालयाचे उद्घाटन पालकमंत्री अँड. ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या वाचनालयामध्ये सर्व विषयांची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. गावातील युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा परिषद सदस्य अलका देशमुख, अमरावती पंचायत समिती सभापती संगिता तायडे, उपसभापती रोशनी अळसपुरे ,जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे, नांदुराच्या सरपंच सूर्यकांता बावणे, शिराळ्याच्या सरपंच अंकिता तायडे तसेच गट विकास अधिकारी राजेंद्र देशमुख, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत आदी यावेळी उपस्थित होते.
ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. ग्रामीण भागाच्या विकासकार्यात ग्रामस्थांचा पुढाकार महत्त्वपूर्ण असल्याचे पालकमंत्री अँड. यशोमती ठाकूर म्हणाल्या. ग्रामिण भागातील विविध विकासकामांचे श्रीमती ठाकुर यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पणही यावेळी करण्यात आले. अमरावती तालुक्यातील कठोरा बुद्रुक येथील गजानन टाउनशिपमध्ये आमदार निधीतून वार्ड क्रमांक एकमधील शिवमंदिर परिसरात सार्वजनिक बगीच्यात तारेच्या साखळी दुव्यांचे कुंपण बांधण्यासाठी दहा लक्ष रुपयांचा निधी पालकमंत्र्यांनी मंजूर केला आहे .या विकासकामाचे यावेळी भूमिपूजन करण्यात आले.
बांधकामाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. या कामाची अंदाजे किंमत साठ लाख रुपये एवढी आहे. तसेच मूलभूत सुविधा योजनेतंर्गत कठोरा बुद्रुक येथील श्री. बुरघाटे ते योगेन्द्र गावंडे यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता बांधकामासाठी चार लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून याचेही भूमिपूजन यावेळी करण्यात आले. तसेच स्थानिक आमदार निधीअंतर्गत वार्ड क्रमांक एकमध्ये श्री. इंगोले ते श्री. गावंडे यांच्या घरासमोरील रस्त्याच्या खडीकरणाच्या कामासाठी सहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाचेही भूमिपूजन यावेळी करण्यात आले.
सावंगा येथील सावंगा- अडगाव रस्ता सुधारणा व डांबरीकरण तसेच पुलाच्या कामासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचेही यावेळी भूमिपूजन करण्यात आले. तसेच चिचखेड, करजगाव, धानोरा कोकाटे, माहुली जहागीर तसेच नांदगाव पेठ येथील विकास भूमिपूजन व लोकार्पणही यावेळी करण्यात आले.
शिराळा ग्रामपंचायत समाज मंदिराच्या कामाचे भूमिपूजन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास श्रीमती ठाकुर यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले . शिराळा ग्रामपंचायत येथे ग्रामस्थांना पालकमंत्र्यांच्या हस्ते नमुना 8 चे वितरण करण्यात आले .यावेळी एकूण 69 ग्रामस्थांना पट्टेवाटप करण्यात आले. यावेळी श्रीमती ठाकूर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्यात.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या