Header Ads Widget

मायची वाकय...!

मह्या मायची वाकय 
व्हती लयच गुनाची
ऊन ,पाऊस ,हिवात
लाज झाके गरीबाची

कोनी म्हनेत वाकय
कोनी म्हनेत बोथरी
कोनी म्हने देसमुखी
थेच आमची सातरी

थेच आमची गादीबी
थेच आमची दुलई
असो पावने रावने
थेच करे सरभराई 

बाचं धोतर तिच्यात 
आन्ं मायचं लुगळं
रुप तिचं दिसायचं
घोंगळ्याहून येगळं 

नक्षीदार ईन तिची
राहे ठोकय सुताची
आंगावर पांघरता
ऊब मायची वाटाची 

तिच्यावरच झोपून
गरीब सायेब झाले
तिले जायून टाकलं 
तथी बिलांकीट आले

बोथरीवानी मा-बाप
घराभायेर फेकते
जागी त्यायच्या लेकरं
कुत्रे घरात आनते 

नोका लेकायहो तीची
असी अवदसा करू
मायबाचे आशीर्वाद
असे दूर नोका  करू 

भुलू नोका दिस जुने
हाये ओयख तुमची 
कितीबी उळा वरतं
माय मातीच आमची

- अरूण विघ्ने
आर्वी, जि.वर्धा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या