अमरावती : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्हाधिकारी तथा जलजीवन मिशनच्या अध्यक्षा पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची आढावा बैठक घेण्यात आली. प्रस्तावांनुसार २६ गावांत पाणीपुरवठा योजनांना तत्वत: प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्यात आली असून, ही कामे गतीने पूर्णत्वास जाण्यासाठी यंत्रणेने सर्वंकष प्रयत्न करावे, तसेच यापुढेही आवश्यक तेथील कामांबाबत प्रस्ताव द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी यावेळी दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर, तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे सर्व उपअभियंता, भूवैज्ञानिक आदी यावेळी उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यातील नियोजित पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव श्री. सावळकर यांनी सभेत सादर केले. त्यानुसार २६ गावांच्या पाणीपुरवठा योजनांना तत्वत: मंजूरी प्रदान करण्यात आली. पुढील प्रक्रिया गतीने राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी दिले.
या योजनांच्या मंजूरीची पुढील कार्यवाही मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत पूर्ण करण्यात यावी. ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत या योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल. तसेच यातील सहा योजना दरडोई खर्चाच्या निकषाच्यावर असल्यामुळे शासनाच्या पूर्वमान्यतेसाठी सादर करण्यात येतील, असे श्रीमती कौर यावेळी म्हणाल्या.ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०२४ पर्यंत ‘हर घर नल से जल’ प्रमाणे पाणीपुरवठा करण्याची शासनाची योजना आहे. या अनुषंगाने जलजीवन मिशनच्या कृती आराखड्यात सन २०२१-२२ मध्ये समाविष्ट पाणीपुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यासाठी जिल्हास्तरावर जलजीवन मिशनअंतर्गत समिती स्थापित आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या