• Mon. Jun 5th, 2023

विदर्भातील सिंचन प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद

  * अमरावती विभागासाठी 3 हजार 771 कोटींची तरतूद
  * जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचा पाठपुरावा

  अमरावती : विदर्भात सिंचनक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडी शासनाकडून सिंचन प्रकल्पांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात सुमारे 6 हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. अमरावती विभागासाठी 3 हजार 771 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक महत्वाचे सिंचन प्रकल्प पूर्णत्वास जाऊन सिंचनक्षमता व कृषी उत्पादकता वाढण्यास मदत होणार आहे, असा विश्वास राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी व्यक्त केला.

  विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती मिळावी व सिंचनक्षमतेत वाढ व्हावी या दृष्टीने जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू यांच्याकडून सातत्याने प्रयत्न व पाठपुरावा होत आहे. त्यानुसार विविध सिंचन प्रकल्पांसाठी मोठी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. विदर्भात शेतीला सिंचन वाढण्याच्या दृष्टीने ही भक्कम तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पांची कामे गतीने पूर्णत्वास जातील. सिंचनाचे प्रमाण वाढून कृषी उत्पादकतेत भर पडेल व शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्याचा लाभ होईल, असा विश्वास राज्यमंत्री श्री. कडू यांनी व्यक्त केला.

  विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक कामांना गती देण्यात येत आहे. प्रकल्प पूर्णत्वास जाण्याबरोबरच भूसंपादनाची कामेही मार्गी लागणार आहेत.

  अमरावती जिल्ह्यासाठी 862.72 कोटींची तरतूद

  अमरावती जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या विकासकामांची गरज लक्षात घेऊन अर्थसंकल्पात त्याबाबत तरतूद करण्यासाठी जलसंपदा राज्यमंत्र्यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार 862.72 कोटींची तरतूद करण्यात आली. त्यामुळे अप्पर वर्धा, बोर्डी नाला, गर्गा, पंढरी, पेढी बॅरेज, सपन, वासणी प्रकल्पातील अविशष्ट प्रदाने, भूसंपादन आदी कामे मार्गी लागणार आहेत. निम्न पेढी प्रकल्पासाठीही 150 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, बागलिंगा, चांदी नदी, चंद्रभागा बॅरेज, करजगाव, निम्न चारगड, निम्न साखळी, पाकनदी, रायगड नदी, सामदा, टाकळी कलाण आदी प्रकल्पांच्या आवश्यक कामांसाठीही तरतूद करण्यात आली आहे. चांदस वाठोडा, पाटिया धारणी, राजुरा येथील पाटबंधारे कामांसाठीही तरतूद करण्यात आली आहे.

  धरण पुनर्स्थापना व सुधारणेसाठी स्वतंत्र तरतूद

  धरण पुनर्स्थापना व सुधारणेसाठी स्वतंत्र तरतूद आहे. सपन प्रकल्पासाठी 14 कोटी व अप्पर वर्धासाठी 9.40 कोटी तरतूद करण्यात आली आहे. पूरनियंत्रणासाठी देऊरवाडा, करजगाव, शिरजगाव व ब्राम्हणवाडा थडी येथील कामांसाठी 15 कोटी 82 लक्ष रूपये तरतूद आहे.

  विभागातील पाचही जिल्ह्यांतील प्रकल्पांची कामे लागणार मार्गी

  अमरावती जिल्ह्याबरोबरच अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील प्रकल्पांच्या अनुषंगाने विभागासाठी 3 हजार 771 कोटी एवढी भरीव तरतूद करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यासाठी 1 हजार 133 कोटी 64 लक्ष रूपये निधीची तरतूद आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प, उमा प्रकल्प, घुंगशी बॅरेज, नेरधामणा, बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प, शहापूर प्रकल्प, ज्ञानगंगा प्रकल्प, मन प्रकल्प, अकोल्यातील नया अंदुरा, काटीपाटी बॅरेज, कवठा बॅरेज आदींसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.

  वाण प्रकल्प व ज्ञानगंगा प्रकल्पाच्या धरण पुनर्स्थापना व सुधारणेसाठी 11 कोटी 64 लक्ष, तर बाळापूर येथील राज्य संरक्षित स्मारकस्थळी मन नदीच्या काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. विदर्भासाठी मोठी तरतूद झाल्याने सिंचन प्रकल्पांची प्रलंबित कामे पूर्णत्वास जाण्यास मदत होणार आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *