पुरस्कारप्राप्त ‘ जागल ‘ या माझ्या तिस-या कवितासंग्रहावर खुप समीक्षकांनी समीक्षा लिहिल्यात. प्रशांत ढोले सर, प्रा.डाँ.नरेश इंगळे सर, निलेश कवडे सर, डाँ. देवबा पाटील सर, स्व.डाँ.किसन पाटील सर, मिनाक्षीताई नागराळे, क. वि. नगराळे सर, दिपकभौ खवशी, प्रा.पाथ्रीकर सर, राजूभाऊ गरमाडे, प्रा.देव लुले सर, संदीभाऊ धावडे, किरण डोंगरदिवे सर, राजेंद्र घोटकर सर, रमेश मुनेश्वर सर, लिनाताई देगलुरकर, प्रा.डाँ. अरविंद पाटील सर , डाँ. मधुकर वाकोडे सर, विजय बिंदोड सर,यांच्यासह पंचेवीस लोकांनी .
Contents hide
त्यापैकी सौ.लिना देगलुरकर यांची समीक्षा येथे देत आहो.
—————————————————-
‘ बरं झालं म्या गुर्जी झालो’ म्हणणारे ‘जागलकार सेवानिवृत्त शिक्षक ‘प्रसिद्ध वऱ्हाडी’ कवी अरुण विघ्ने’ म्हणजे प्रतिभेचे लेणे लाभलेले अवलिया. चिंतन नभातील शब्द पक्षांना गोंजारत, अलवार कवेत घेऊन अलंकार, उपमा, रुपकेरूपी सिंधूत सुस्नात करून सटीक काव्य निर्मिती करून,साहित्याशी मर्मबंध घट्ट करण्यात त्यांचा हतकंडा आहे .
‘ पक्षी’, ‘वादळातील दीपस्तंभ’ ह्या काव्यसंग्रहाच्या अभूतपूर्व यशानंतर, मायबोलीची थोरवी, महती सांगणारा ‘जागल’ हा अस्सल वैदर्भीय कवितांचा संग्रह म्हणजे बोलीभाषेचे थोडेबहुत ऋण उतरवण्याचा प्रयत्न.लिहू वऱ्हाडी, जगू वऱ्हाडी ….!
*समदे यिऊन एका जागी*
*आता वऱ्हाडी गानं गाऊ*
*माय वऱ्हाडीले मोठी करू*
*तिचा झेंडा अटकेपार लावू*
वरील पद्यपंक्तीतून कवीची आपल्या भाषेविषयी असलेली ओढ, आस्था आणि कळकळ दिसून येते.
काव्यप्रकार कोणताही असो, हाडाच्या साहित्यिकाला तो अवजड कामटा न भासता, ती सुगंधित कूसूमे वाटतात. नाजुक पुष्प,पानांना प्रलग्भ विचारांची विन कशी करावी ..हे कवी अरुण विघ्नेंचा ‘जागल’ वाचताना सहज लक्षात येते. गाव, निसर्ग, शिवार, काळी माती ह्यांच्याशी कवीची नाळ जुळलेलीच आहे. त्यांचे सुंदर वर्णन कधी मनाला भावुन जाते तर कधी भावुक करते. कवी आपल्या गावकोसीत असलेल्या नदीचे कौतुक करताना म्हणतात ..!
*माया वरधा नदीचे*
*पाणी वाहे खयखय*
*सोया वरसाची पोर*
*जसी नाचे थयथय*!
वाहणारी नदी अल्लड षोडशवर्षीय तरूणी वाटणे, ही कवीकल्पना,कवीच्या सखोल अभ्यासाची जाणीव करून देते .
‘अठोन’ हया कवितेत कवी समाजातील दाहक वास्तवाचं दर्शन घडवताना …!
*लचके तोळत कुत्रे*
*संग होते चिल्ले पिल्ले*
*सारी जीनगानी गेली*
*हाकलता लांडग्याले*!
पती निधनानंतर विधवा महिलेकडे बघण्याचा दृष्टिकोन, वखवखणाऱ्या नजरा,क्षणिक शरीरसुखासाठी टपलेले मानवी मुखवटे धारण केलेले लांडगे, ह्यांना वैतागून आयुष्याच्या अंतिम क्षणी धनी आता लेकरांचे बस्तान नीट बसले.सारी हयात गेली सर्व करता करता पण सरतेशेवटी तरी सुखाचा एखादा क्षण नशीबात असेल वाटले होते पण ते नशीबी नाही .मी ह्या पांढरपेशा समाजात सुखी नाही …मला तुमची आठवण येते,मला तुमच्याकडे बोलवून घ्या.कितीही विवशता …तळागाळात जाऊन प्रत्येक गोष्टीचा वेध घेऊन , त्याचे शब्दरूपी चित्रीकरण कवीला लिलया जमले आहे.
साहित्यिकांना सामजिक भान असते . साहित्यिक समाजाचा कणाच असतो .साहित्यसेवा, समाजसेवा करताना कोणत्याही प्रकारचा अहंकार मनाला स्पर्शू नये . हे रोखठोक मत मांडताना, कवी विघ्नें, आपल्या ‘आयुष्याचा सातबारा’ कवितेत म्हणतात ..!
*मरणाचा सातबारा परत्येकाचा*
*पयलेच तयार झाला हाये*
*गर्व कायले करतं मानवा*
*जायचा दिवस ठरला हाये*!
आजची जागरहाटी पाहिली तर वरील काव्यपंक्ती समाजकंटकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या आहेत . संवेदनशील कवी सदैव वर्तमान, भुत, भविष्य ह्याबाबत जागरूक असतो .त्याचाच जागर *जागल* काव्यसंग्रहातून करण्याचा कवीने अगदी प्रामाणिक प्रयत्न केला आहे .
*जागल म्हंजे, सिमेवर राखन करनं*
*जागल म्हंजे, संविधानाची सोकारी करनं*
*जागल म्हंजे, चेता रावून अरोयी ठोकनं*
*जागल म्हंजे, उपादी जनावरायचा खेदा करनं*
*जागल म्हंजे, तमाम पिकाची कायजी करनं*
*जागल म्हंजे, अन्यायाईरोधात लढत राहनं..*!
जागलचा अर्थ समजवताना संवेदनशील मनाच्या कवीचे सहावे इंद्रिय जागृत झाल्याचा प्रत्यय येतो. सीमेवरील सैनिकांच्या डोईवर संकटरूपी टांगती तलवार कवीला अस्वस्थ करीत आहे.पीकपाणी, गुरेढोरे यांच्याबद्दलची व्याकूळता, राष्ट्रग्रंथ संविधानाशी एकनिष्ठ राहून, अन्यायाविरूध्द लढण्यासाठी आव्हान करत, जागे व्हा म्हणत आहेत. ही आर्त साद मनास हेलावुन सोडते .
आधुनिकतेचा अंगीकार करत, संस्कृतीची गेलेली रया .नोटाबंदीसारख्या शासन निर्णयाने होणारे जनतेचे हाल, जगाच्या पोशिंद्याची वाईट अवस्था, भरकटत चाललेली आजची तरूण पिढी ह्यावर कवी ने जोरदार आसूड ओढला आहे.
शब्दउपासक, नेहमीच शब्दांची साधना करतात. उचित शब्दांना चाचपडून, त्याची सुंदर काव्यमाला गुंफण्यात कवीला यश आले आहे. वैदर्भीय गोडवा, सुबक मांडणी, सर्व विषय हाताळण्याचे कसब, जणजागरण, लालित्यपूर्ण शब्दकळा देऊन प्रसूत झालेला *जागल* रसिकमनाला मोहवेल. या काव्यसंग्रहाची प्रस्तावना पुष्पराज गावंडे यांनी तर पाठराखन ज्ञानेश वाकुडकर यांनी केली. हा संग्रह संवेदना प्रकाशन, नागपूर यांनी प्रकाशीत केला. मुखपृष्ठ अरविंद शेलार यांचे असून आतील रेखाटने संजय ओरके यांची आहेत. यात एकूण 85 कविता आहेत.अशीच उत्तरोत्तर दर्जेदार, आशयगर्भित साहित्याची निर्मिती होत राहो अन आम्हाला वाचन लाभ मिळत राहो. कवी अरुण विघ्नें यांचे हार्दिक अभिनंदन.जागल काव्यसंग्रहास अनेक मंगलमय शुभेच्छा.
सौ.लीना देगलूरकर,
कल्याण,जि.ठाणे
——————————————-