दवाखान्यात दाखल होण्याबाबत पथकाच्या आग्रही भूमिकेने महिलेची सुरक्षित प्रसूती

    अमरावती : संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढवणे हे मेळघाटात मोठे आव्हान आहे. गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी कधीकधी पथकांना जोरदार आग्रहाचाही अवलंब करावा लागतो. भिलखेड्यातील अशाच एका प्रकरणी दवाखान्यात दाखल होण्यास नकार देणाऱ्या मातेला आरोग्य पथकाने घेतलेल्या आग्रही भूमिकेने भरती करण्यात आले व तिची प्रसूती सुरक्षित होऊन ती व बाळ सुखरूप आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    चिखलदरा तालुक्यात भिलखेडा हे गाव आहे. तेथील एका गरोदर महिलेला अंगावर व पायावर सूज असल्याचे तपासणीत आढळले. तिला दवाखान्यात भरती होणे अत्यावश्यक होते. त्यानुसार तिला व तिच्या कुटुंबियांना समजावण्यात आले. रुग्णालयात संदर्भित करून तिची तपासणी स्ञी रोग तज्ज्ञांकडून करण्यात आली. तपासणीमध्ये तिचा रक्तदाब वाढल्याचे आढळल्याने तिला औषधोपचार सुरु करुन आठ दिवसात प्रसुतीकरीता भरती करावे लागेल, असे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.एक आठवडयानंतर तिला तिच्या घरी प्रसुती कळा सुरु झाल्या. ही माहिती आशा सेविकेला मिळताच त्यांनी ती रुग्णालयात कळवली. वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष नागले यांनी धामणगांव गढी येथून रुग्णवाहिका मिळवून भिलखेडा गाठले.

    मातेच्या प्रसुती वेदना सुरु होत्या. मात्र, तिची मनस्थिती दवाखान्यात येण्याची नव्हती. तिचे सासु व पती घरी नसल्याने आपण दवाखान्यात येऊ शकत नाही ही भुमिका तिने घेतली. मात्र, वेळ अटीतटीची होती. त्या अवस्थेत तिला सोडणे वैद्यकशास्त्राच्या मूल्यांशी प्रतारणा करणारे ठरले असते. मातेचा नकार कायम होता. आरोग्य पथक विवंचनेत पडले. तिला तिच्या मनाच्या विरोधात दवाखान्यात कसे न्यायचे? ती प्रसुतीवेदनेने तडफडत होती.

    प्रसुतीदरम्यान अथवा नंतर कुठलीही गुंतागुंत उद़़भवली तर काय परिणाम होऊ शकतात याची कल्पना रुग्णाला नव्हती.त्यामुळे तिचा अट्टाहास कायम होता. आरोग्य पथकापुढे तिची प्रसुती सुखरुप पार पाडणे हेच उद्दिष्ट होते. अखेरीस पथकातील महिला सदस्या डॉ. निता नागले, आरोग्य सेविका हिना सौदागर,आशा सेविका सीमा भुरय, अंगणवाडी सेविका श्रीमती रिमा बेलसरे यांनी एकत्र येऊन महिलेला सांभाळून घराबाहेर काढले व तिला दवाखान्यात भरती केले.आशा सेविका स्वतः तिच्यासोबत दवाखान्यात राहिल्या. वैद्यक पथकाने उपचार सुरू केले. तिची सुखरुप प्रसुती झाली. तिला असणा-या उच्च रक्तदाबामुळे होणारा धोका टाळला. मातेची संस्थात्मक प्रसूती करण्यात पथकाला यश मिळाले.