• Tue. Jun 6th, 2023

चिंतनशीलतेतून उजेडप्रवाहीत झालेली कविता : काळोखाच्या तपोवनातून

    मराठी गझलेचा पाया ज्यांनी रचला त्या सुरेश भटसाहेबांच्या सहवासात राहून,त्यांच्या सूत्र संचालनाखाली महाराष्ट्रभर ‘अशी गावी मराठी गझल’ हा कार्यकम करून आपल्या संगीताने व सुमधूर स्वराने मराठी गझलेला सबंध महाराष्ट्रात पोहचविणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम संगीतकार, गायक, कवी, गीतकार,गझलकार म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही ज्यांनी आपली ओळख निर्माण केली ते गझलगंधर्व सुधाकर कदम हे सर्वांनाच परिचित आहेत.

    विदर्भातील व-हाडच्या कुशीत वसलेल्या वर्धा जिल्ह्यातील खरंगणा (गोडे) येथे आजोळी जन्म,मूळ गाव यवतमाळ जिल्ह्यातील दोनोडा ता.कळंब येथे चौथ्या इयत्तेपर्यंत शिक्षण.पुढील शिक्षण यवतमाळ येथे.संगीत विशारद झाल्यावर पोटाच्या सोयीसाठी यवतमाळ जिल्ह्यातीलच आर्णी या छोट्याशा गावी श्री महंत दत्तराम भारती विद्यालयात संगीत शिक्षक म्हणून नोकरी केली.अतिशय खडतर परिस्थितीत स्वतःला घडवत जाणारे हे दिग्गज व्यक्तिमत्व संगीतक्षेत्रात काहीतरी करण्याच्या उर्मीतून सध्या पुणे येथे स्थाईक झाले आहे. त्यांचा सकल सांगीतिक व साहित्यिक प्रवासाचा आलेख हा चढताच आहे. त्यांनी अनेक मैफली गाजविल्या आहेत. आकाशवाणी, दुरदर्शनवरूनही त्यांच्या कार्यक्रमांचा आस्वाद रसिकांनी घेतला आहे. आजमितीस सुधाकर कदम यांच्या नावावर लेखक/कवी म्हणून ’फडे मधुर खावया…’ (स्फूट लेख),’सरगम’ (स्वरलिपी), ’मीच आहे फक्त येथे पारसा’ व ‘काळोखाच्या तपोवनातून’ (काव्य संग्रह) अशी चार पुस्तके, तसेच ’भरारी’ (मराठी गझल गायनाची महाराष्ट्रातील पहिली कॅसेट), ‘अर्चना’ (टी सिरीज)’, ‘खूप मजा करू’ (फाऊंटॆन म्युझिक कं.), ’काट्यांची मखमल’ (युनिव्हर्सल म्युझिक कं.), ’तुझ्यासाठीच मी…’( युनिव्हर्सल म्युझिक कं.) ह्या कॅसेट्स सीडीज आहेत.

    सुधाकर कदम यांनी स्वरबद्ध केलेला हनीफ़ साग़र, बशर नवाज़ यांच्या उर्दू गझलांचा तीन तासाचा कार्यक्रम विविध गायक गायिका करीत आहेत. सुरेश वाडकरांपासून पं.शौनक अभिषेकी,अनुराधा मराठे, वैशाली माडे, नेहा दाउदखाने, रसिका जानोरकर, मयूर महाजन, गाथा जाधव, गायत्री गायकवाड गुल्हाने, प्राजक्ता सावरकर शिंदे, आदित्य फडके, रफ़िक शेख, वैशाली पुल्लीवार, अविनाश जोशी, सचिन डाखोरे सोबतच लहान बंधू शांत कदम व मुली भैरवी,रेणू पर्यंत गुणी गायक- गायकांनी त्याने स्वरबद्ध केलेल्या रचना गायिल्या आहेत.गझलगंधर्व सुधाकर कदम यांचा माझा परिचय तसा समाजमाध्यमावरच झाला. ‘काळोखाच्या तपोवनातून ‘ हा त्यांचा स्वानुभवाची गुंफण करणारा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला.हा गझल-काव्यसंग्रह त्यांनी मला आवर्जून पाठविला आहे. त्याला अनुसरूनच हा लेख प्रपंच.

    “अपुली मस्ती अपुले जगणे
    सोबत अपुले जीवनगाणे
    काय हवे यापरते दुसरे
    मस्त कलंदर होऊन रमणे”

    असा हा आपल्याच धुंदीत जगणारा मस्तमौला माणूस असला तरी कवी, गीतकार, संगीतकार माणूस संवेदनशील मनाचा निश्चितच असतो . त्याला सामाजिक जाण व भानही असते . जीवन जगत असताना प्रत्येक माणसाला कडू-गोड अनुभव येत असतात. तसेच सुधाकर कदम यांच्याही गाठी ते आहेतच . तो अनुभव कथन करणा-या या बोलक्या ओळी…

    “हा भाव-भावनांचा चालूय खेळ सारा
    शब्दात मांडलेला नुसताच हा पसारा
    भगव्यास पांघरूनी वरतून शुद्ध झालो
    पण गाळ अंतरीचा तो राहिला बिचारा !”
    (गाळ अंतरीचा पृष्ठ १६)

    समाजव्यवस्थेकडे डोळसपणे बघताना,असे अनेक अनुभव माणसाच्या काळीज कप्प्यात घर करून असतात. काही माणसं आंतर्बाह्य साम्य नसलेलं जीवन जगत असतात. परंतु असं दुधारी जगणं ब-याच लोकांना न भावणारं असतं. मानवाने अशा फसव्यां प्रवृत्तीपासून सावध असलं पाहिजे, असंच कदाचित कवीला सुचवायचं असावं. हे चिंतन ते आपल्या गझलेतून मांडताना दिसतात. मानवी जीवन हे चक्रव्यूहासारखं असतं, सुख-दुःखाच्या फे-यातून मानवाची सुटका नसते परंतु तरीही आपल्याला ते भेदून पुढील प्रवास करायचा असतो. जरी मानवी जीवन हा एका शून्यापासून दुस-या शून्यापर्यंतचा प्रवास असला तरी मोह, माया, स्वार्थ कुणालाच त्यागता येत नाही . तो पुरता त्यात गुंतत जातो, आणि मग दुःखास कारण बणत जातो. या संबंधी सुचक वाटणारी पुढील गझल बोलकी वाटते.

    “आयुष्याच्या चक्रव्यूहातुन कधीच सुटका नसते
    नियती त्याला दळण्यासाठी खुंटा मारुन बसते
    वजा-बाकिचा हिशेब सारा मांडायासी जाता
    हातामध्ये त्याच्या केवळ शून्य नि शून्यच उरते !” (चक्रव्यूह पृष्ठ १८)

    हे आयुष्याचं गमक सर्वांनाच लागू पडणारं आहे. कदमांची कविता मानवी जीवनाचा सार मांडते .सोबतच ती सजगतेचा इशाराही देते. माणूस अजूनही मानवनिर्मित जाती,धर्माच्या बंधनात अडकलेला दिसतो. पण कवी त्या पलिकडचा विचार करायला सुचवितात . समस्त मानव जात एक असतानाही, उगाच आपण जाती भेदाचे ओझे आपल्या डोईवर सतत वाहत असतो. यापासून कुणालाही लाभ होत नसताना देखील अट्टाहासाने म्हणा की अज्ञानातून म्हणा, ते करीत असतो..

    “मानतो कोठे खरेतर जात आपण ?
    चिकटूनी बसते किती ती जन्मतः पण
    खाऊनी माती तिच्यासाठीच सगळे
    नेहमी करतात भेदाचेच रोपण
    एकता-समभाव दिसतो मानभावी
    पण विषमता दाखवी इथलेच दर्पण
    (‘तर्पण’ ३३)
    किंवा
    “कधी कुणाला आपुल्या हृदयी बसवुन बघ ना
    अजून काही नवीन नाती जुळवुन बघ ना
    रंग सारखा सगळ्यांचा तुज दिसून येइल
    रक्ताशी तू रक्त तयांचे मिळवुन बघ ना”
      (बघ ना पृष्ठ २६)

      सर्व जाती-धर्माची माणसे समान असतानाही, आपण भेदाभेद का विसरत नाही ? ‘भेदाभेद अमंगळ’ असल्याचे सांगून अनेक संत, थोर पुरुषांनी आमचे प्रबोधन केले असतानाही आम्ही आजही त्यालाच चिकटून आहोत. हा मानसीक गुलामीचा दृष्टीकोण बदलून माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कवी करताना दिसतात. या रचनेत संविधानमूल्यांचा जागर होताना दिसतोय. येथे कवीने आपल्या रचनेतून सकारात्मक आशावाद पेरलेला आहे. तद्वतच कविमन गावाकडून फेरफटका मारून येते तेव्हा गावातील जगाच्या पोशींद्याची स्थिती बघून त्यावर सडेतोडपणे व्यक्त होतांना दिसते.

      “आपण असतो अपुल्यासाठी
      उरलो तर मग इतरांसाठी
      कणव न येई शेतक-यांची
      असले नेते त्यांच्या गाठी !” (पृष्ठ २९)

      माणूस विचाराने सोकत चालला की काय असे वाटून जाते . महाराष्ट्रात अनेक शेतक-यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. तो शासकांकडे मदतीच्या आशेने बघतो. पण राजकीय व्यवस्था त्याची व्यथा समजून घेण्यास कुठेतरी कमी पडते आहे का ? याचाही शोध घेण्याची गरज कवीला वाटते . काव्याच्या प्रकारातून जगणं-मरणं मांडण्याची कवीची कल्पकता अफलातून आहे. कवीला जगणं ओवीसारखं तर मरण अभंगासारखं वाटतं.

      “जगणे ही ओवी । मरण अभंग
      ऐसा असे रंग । आयुष्याचा..
      चंद्रभागेकाठी । करुणेचे ठेवे
      त्यातच डुंबावे । मनोभावे…
      सारे भोगायचे । याच जन्मी येथ
      पुनर्जन्म मिथ । वाटे मज…”
      (अज्ञाताची हाक पृष्ठ ३०)

      मृत्यू अटळ आहे. नैसर्गीक प्रक्रियेनुसार परिवर्तन घडत असतं, मानवी जीवनातही बदल होत असतात. मानवाने ते सहर्ष स्वीकारुन कोणत्याही मिथ्या गोष्टीत अडकून न पडता आपल्याला याच जीवनात सर्व भोगायचं असतं. असं सांगून त्यांची कविता पुनर्जन्म ही संकल्पना साफ नाकारताना दिसते. त्यांना पांडुरंगात करुणाकार दिसतो. कवीचा जीवनाविषयीचा दृष्टीकोण अगदी स्पष्ट आहे. येथे ते कर्म सिद्धांत मांडताना दिसतात. ते ‘जीवनगाणे’ या कवितेत म्हणतात..

      “माझी मस्ती , माझे जगणे
      कशास घालू उगी ग-हाणे
      मीच मनाचा राजा असतो
      आणिक संगे नवे तराणे
      असेच करतो सुंदर.. माझ्या
      या जगण्याचे जीवनगाणे !”
      (‘जीवनगाणे ‘ पृष्ठ ३२)

      मस्तमौला संगीतप्रिय कवीच्या मते आपले जीवन हे आपले असते, ते कसे जगायचे? ते ज्याने त्याने आपापले ठरवावे. संगीत जीव की प्राण आहे. त्यातून श्रोत्यांना आनंद द्यायचा आणि आपणही घ्यायचा, याविषयी त्यांची भूमीका स्पष्ट आहे. जीवन सुंदर आहे, ते अधिक सुंदर बनविणे मानवाच्या हाती असते. त्याने ते बिनधास्तपणे आपल्या पद्धतीने जगावे ,कुणाकडेही तक्रार वा गा-हाणे न मांडता. याचेच जीवन ऐसे नाव. कवीने या संग्रहात काव्याचे अनेक प्रकार हाताळलेले दिसतात. एकूण 83 रचनांमध्ये गझल, गीत, अभंग, अष्टाक्षरी, षडाक्षरी, ओळ काव्य, मुक्तछंद इत्यादी अल्पाक्षरी रचना आहेत. पण गेयस्वरुपांच्या काव्यप्रकारात कवीचा हातखंड आहे. मोजून मापून शब्द योजन केले आहे. संगीतकार, गायक,गझलकार व गीतकार असल्याने त्यांना मात्रांची जाण आहे. त्यामुळे रचनांत कुठेही भरकटलेपणा जाणवत नसून शिस्तबद्धता जाणवते. प्रेम कविता वाचून असं वाटतय की कवी अजूनही तरुण असावेत.

      “तुझिया स्पर्शाने । देहातली धग ।
      गंध ओली आग। फुललेली ।
      धुंद देहातून । रोमांच पताका ।
      धरूनिया ठेका । फडकती । (भुलवा पृ.४४)

      अल्पाक्षरातील आशयसंपन्न रचना ही कदमांच्या रचनांची खासियत आहे. कुणीही या प्रेम कवितात रमून जावं, अशाच मनाला भुरळ घालणा-या या रचना आहेत. प्रेम म्हणजे मनाला सुखाची अनुभूती करून देणारी नैसर्गिक देण आहे. सुख म्हणजे नेमकं काय असतं ? तर सुखाची परिभाषा ही व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकते. जेथे मनाचे समाधान तेथेच सुख असते. असं म्हटल्यास वावगं ठरू नये. मग कुणी ते, दीन दुःखीतांच्या, मुक अंधांच्या, भुकेलेल्यांना अन्न देण्यात शोधतात तर कुणी इतरांना छळण्यात, खूप संपत्ती मिळविण्यात शोधतात. कवीला सुख कुठे मिळते ? याचं सुंदर उदाहरण ते पुढील ओळीत सांगतात.

      “जशी स्वीकारली फकिरी
      सुखे फिरतात या दारी
      कुणाशी स्नेह ना उरला
      जगाचा द्वेशही सरला
      जसा झालो निरंकारी
      सुखे फिरतात या दारी !”
      (पृष्ठ ५४)

      प्रत्येक माणूस सुखाच्या मागे धावत असतो. भौवतीक सुखाच्या मागे धावता धावता तो माणुसकी विसरून अमाणुसकीच्या जाळ्यात केव्हा कैद होतो ? त्याचे त्याला भानच राहत नाही.

      “मन वढाय वढाय, उभ्या पिकांतलं ढोर
      किती हांकला हांकला,फिरी येतं पिकांवर”

      या बहिणाबाई चौधरी यांच्या ओळीप्रमाणे मन फार चंचल असतं, म्हणूनच की काय ? कवि आपल्या मनालाच प्रश्न विचारताना दिसतात…

      “रे मना ! तुज काय झाले सांग ना!
      का असा छळतो जिवाला सांग ना !
      हारण्याची ही मजा घे एकदा
      जिंकुनी तुज काय मिळते सांग ना !
      नेहमी एकांत हा अंधारतो
      ‘अत्त दीपो’ का न होशी सांग ना !”
      (रे मना पृष्ठ ५७)

      प्रत्येक माणसाला सदैव जिंकायचे असते. त्याला हारणे पसंद नसते. मग त्यासाठी तो काहीही करतो. जेव्हा मन आपणास स्वस्थ बसू देत नाही, तेव्हा आपल्याला मनावर विजय मिळविता आला पाहिजे. स्वयं प्रकाशित होता आलं पाहिजे. तरच मनःशांती प्राप्त होते. हे सुत्र जीवनाच्या एका विशिष्ट वळणावर अंगिकारलं पाहिजे. येथे तथागताच्या विज्ञानवादी तत्वज्ञानाचा ‘दिवा’ मात्र कविच्या काळीज कप्प्यात जळत असल्याचे दिसून येते.

      “नाही गा मी देव, नाही मी ईश्वर
      मी फक्त माणूस, नाही अवतार
      आत्मा परमात्मा करूनी अमान्य
      सांगितले लोका ज्ञान हे अनन्य
      विज्ञान निष्ठेच्या निकषांवरले
      सत्य तेवढेच फक्त स्वीकारले
      स्वतःच स्वतःच्या हातातील दिवा
      मार्गदर्शनाशी उजळीत जावा !”
      (‘दिवा’ पृष्ठ ८८)

      तथागत म्हणतात मी मोक्षदाता नसून मार्गदाता आहे. त्यांचं तत्वज्ञान हे मानवी मनात विज्ञानवादी दृष्टीकोण रुजविते . मानवाला अज्ञानाच्या काळोखातून उजेडाकडे घेऊन जाणारं आहे. माणूस केंद्रबिंदू असलेला हा विचार मानवकल्याकारी आहे. तो डोळसपणे जगायला शिकवितो. संविधानीक मूल्यांची जपणूक करायला शिकवितो. दुःखमुक्तीचा मार्ग सुचवितो. देव, ईश्वर, आत्मा, परमात्मा, पुनर्जन्म नाकारून ‘अत्त दीप भव’ चं सूत्र मांडतो. एकूणच कदम यांची कविता ही परिवर्तनवादी विचारसरणी अंगिकारताना दिसते. ही या संग्रहाची जमेची बाजू आहे. महात्मा फुले यांचा शेतक-यांविषयीचा कणवभाव व सत्यशोधकी विचार मांडते. कविता सर्वसामान्यांच्या कल्याणाचा विचार मांडते. शेतकरी, कष्टकरी, वंचितांची व्यथा मांडते. त्यांच्या बाजूने भक्कमपणे उभी राहताना दिसते. कदम यांची कविता ही काही अंशी प्रश्नकर्ती आहे.

      “इडा पिडा टळो । बळी राज्य येवो
      फोडतसे टाहो । अंतरात्मा…
      चिल्यापिल्यांसंगे । उन्हापावसात
      राबतो शेतात । सालोसाल ..
      जिवापलीकडे । मेहनत करी
      तरीही भाकरी । मिळेचि ना…
      माणसापरीस । ढोरासीच भाव
      काहो देवराव । झोपले का ?
      मातीचा हा जीव । मातीत जाणार
      शेवटी आधार । मातीचाच…
      साहवे ना आता । जरी हा काळोख
      अंधाराची राख । उजेडाला …!”
      (अंधाराची राख उजेडाला पृष्ठ ९५)

      मानवी जिवन हे अनेक प्रकारच्या काळोखाच्या तपोवनातून ताऊन सुलाखून निघालेले असते. त्याचा प्रवास हा नेहमी उजेडाच्या दिशेने व्हावा. असं प्रत्येकालाच वाटत असते. तसेच कवीलाही वाटणे स्वाभाविक आहे. कवीचा हा संग्रह त्यांचा जिवनानुभव कथन करतो. प्रदीर्घ चिंतनातून आलेले हे गझल-काव्य लेखन आहे. याच अनुभवातून मानवाला शिकवण मिळत असते. त्याच आधारावर आपला मार्ग तो योजत असतो. जीवन अधिक सुखकर होण्यासाठी माणूस मार्ग शोधीत असतो. कदम यांच्या कवितेत तो मार्ग असू शकतो. त्यासाठी जिवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण हा आशावादी व सकारात्मक असण्याची गरज वर्तविते. कवीला हा मार्ग कदाचित मिळाला असावा. त्यांची कविता संगीताशी नाते सांगते. तसेच गझलेला प्रवाहीत ठेवण्याचं महत्कार्यही करते.स्वानुभावातूनच त्यांची कविता फुलत गेलेली दिसते. म्हणूनच ती मानवी जिवनाला यथोचित दिशा देणारी कविता ठरते. कदम यांना अनेक पुरस्कारानेही सन्मानीत करण्यात आले आहे. पण शासनाने मात्र त्यांच्या कार्याची दखल घेतलेली दिसत नाही, याची खंत वाटते. या संग्रहाबाबत सुधाकरराव कदम यांचे अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा !

      -अरुण विघ्ने
      रोहणा,आर्वी,वर्धा
      मो.9850320316
      ◾️कवितासंग्रह : काळोखाच्या तपोवनातून
      ◾️कवि : सुधाकर कदम
      ◾️प्रस्तावना : राम पंडित
      ◾️प्रकाशन : स्वयं प्रकाशन, पुणे
      ◾️मुखपृष्ठ :विनाश वानखडे
      ◾️स्वागतमूल्य : 150/-₹
      ◾️संपर्क : 8888858850

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *