• Sat. Jun 3rd, 2023

“किनारा” … कवीच्या अंतर मनातील वेदनेचा निखारा

  बोलण्याला वागण्याची जोड द्यावी
  थांबवावा कोरडा उपदेश आता..
  माणसावाणीच यावे माणसांनी
  एकमेकांशी हमेशा पेश आता..

  माणसांना जोडून ठेवण्याची जी विशिष्ट कला ( नव्हे ! मनाचा चांगूलपणा ) ज्या माणसांच्या अंगी असते त्यापैकी एक नाव म्हणजे संदीप वाकोडे. नाते जोडणे अवघड नसते परंतू ते टिकवता यायला हवे, ते कसे टिकवायचे हे शिकायचे असेल तर सरांसारखा एक तरी मित्र तुम्हाला असायलाच हवा. हा निव्वळ शब्दांचा साखरपुडा किंवा कुणाची स्तुती करावी म्हणून नाही तर मी अनुभवलेली वास्तविकता आहे. त्यांचे शेर जसे वाचणाऱ्याला आपलेसे वाटतात तसेच सरांच्या प्रेमळ स्वभावाने माणसेही त्यांच्याशी घट्ट बांधली जातात.’किनारा’ हा वाकोडे सरांचा पहिला ग़ज़ल संग्रह त्याआधी ‘लढाई’ हा काव्यसंग्रह आणि ‘प्रबोधनाची पिंपळपाने’ हा वैचारिक लेखसंग्रह प्रकाशित आहे.माणसाचे नाव मोठे झाले की तो हळूहळू गर्वाच्या शालीत वेढला जातो हे विशेषत्वाने निदर्शनास येते,परंतू सरांचा साहित्यिक गोतावळा खूप मोठा असतांना ही त्यांच्या स्वभावात नम्रपणा आहे..हे त्यांना भेटणारा अनुभवाने सांगू शकेल.

  ग़ज़ल असो वा साहित्याचा कुठलाही प्रकार त्यातून समाज प्रबोधनाचे धडे देणे सोपे असते परंतु त्या शब्दांना,त्या भावनांना अंगिकारणे तेवढेच कठीण..असे असताना वाकोडे सरांचे शेर आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व यात विरोधाभास दिसत नाही, हीच त्यांची खरी ओळख. ग़ज़ल जनमाणसा पर्यंत कशी पोहचवता येईल यासाठी ज्यांनी ज्यांनी जिकरीचे प्रयत्न केले त्यात वाकोडे सरांचे नाव आदराने घेतल्या जाते..गझलदीप प्रतिष्ठानच्या बॅनर खाली ते ग़ज़ल कार्यशाळा,ग़ज़ल मुशायरे असे विविधांगी कार्यक्रम ते राबवत असतात.

  असो जातीधर्मातल्या कोणत्याही
  नसावा कुणी वावडा काळजाला

  किती सहज आणि साधारण वाटत असला तरी या शेराची खोली खूप आहे.. दोन ओळीत जीवनाचे तत्वज्ञान सांगणारा हा शेर वाचताच वाचकाला विचार मग्न करणारा हा शेर, म्हणूनच ग़ज़ल वेगळी ठरते आपल्या अंतरगुणांनी फक्त ती मांडता यायला हवी.
  ग़ज़ल म्हणजे शब्दांचा पालापाचोळा नसून थेट काळजावर भिडणारी,कोरल्या जाणारी शब्दांची कलाकृती आहे.माणूस माणसाला माणूस म्हणूनच भेटायला हवा, आपल्या जातीचा किंवा धर्मांचा अशी हीन भावना जो पर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत मनाची मलीनता कशी शुद्ध होईल? हीच सल ‘किनारा’काराला सलत असावी.ते म्हणतात

  सत्य इतिहासातले हातात हे आले
  माणसांनी माणसांना मारले आहे

  मनाचा मोठेपणा ही माणसाची खरी संपत्ती. ती सहजासहजी लाभत नाही, ज्यांना लाभते ती व्यक्ती लाखात एक गणली जाते.माणूस म्हटले की हव्यास आलाच परंतु या हव्यासावर ज्यांनी नियंत्रण मिळवले तो आयुष्याला सुखी आणि समुद्ध करतो आणि सोबतच आपल्या सहवासातील लोकांच्या सुखदुःखाची जाणीव ठेवतो.

  जोडून खूप झाले शब्दास शब्द येथे
  माणूस माणसाला मी जोडणार आहे

  या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक जण नुसता धावत सुटला असताना शेजारी काय घडते याची कल्पना ही नसते कारण काय तर? मला वेळ नाही. जवळची नाती दुरावत चाललेली आहे अशातच माणसांना जोडण्याचा कविचा संकल्प काबिले तारीफ आहे.वाकोडे सर माणसांना जोडण्याचे कार्य मनापासून करतात हे विशेष.सामाजिक आशयाने परिपूर्ण असा हा ग़ज़ल संग्रह ख-या अर्थाने नवीन लिहीणा-यांना दिशादर्शक ठरेल यात काही शंका नाही. शासन दरबारी थेट जाब विचारण्याची कुवत सांभाळणारा ग़ज़ल संग्रह ‘किनारा’ येत्या ग़ज़लांच्या महापूरात आपला किनारा ढळू देणार नाही याची खात्री आहेच. एक निर्वाणीचा इशारा..

  मथितार्थ जीवनाचा ज्याला कळून चुकला
  घाणीत दुर्गुणांच्या मळला कधीच नाही

  शब्दांना विराम देण्या आधी सरांच्या ‘किनारा’ या संग्रहा सोबतच त्याच्या साहित्य प्रवासाला खूप खूप शुभेच्छा..!

  ▪︎-शरद बाबाराव काळॆ
  धामणगांव रेल्वे
  मोबाईल नं.9890402135
  —————————————————————
  •”किनारा” (मराठी गझलसंग्रह)
  • गझलकार संदीप वाकोडे
  • प्रकाशक- स म ग्र प्रकाशन, तुळजापूर
  • मुखपृष्ठ – विष्णू थोरे (नाशिक)
  • मूल्य – 150 रूपये
  • संग्रहासाठी संपर्क -9527447529
  • किनारा संग्रह पाहिजे असल्यास 9421832623 या मोबाईल नंबरवर फोन पे,गुगल पे च्या माध्यमातून 200 रूपये पाठवा.(संग्रहाची किंम्मत-150 रू.+ 50 रू.पोस्टेज व इतर किरकोळ खर्च) पैसे पाठविल्याचा स्क्रिनशॉट व पत्ता 9527447529 या व्हाॅटसअप नंबरवर पाठवा.धन्यवाद.
   ————————————————————
   • संग्रह ॲमेझाॅन व फ्लिपकार्टवर सुद्धा उपलब्ध आहे.
   •▪︎ॲमेझाॅन लिंक-
   https://www.amazon.in/dp/8194743257/ref=cm_sw_r_apan_glt_i_RNVNWJX3YB3BCSKK8B8X
   ▪︎फ्लिपकार्ट लिंक-
   https://dl.flipkart.com/s/G!hBXruuuN

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *