एमपीएससी परीक्षेत शेतकरी कन्या अश्विनी धापसे राज्यात अव्वल.!

  * बीड जिल्ह्याचं नाव पुन्हा एकदा इतिहासाच्या पानावर

  ध्येय गाठण्यासाठी जिद्द आणि चिकाटी असेल, तर यशाला गवसणी घालण्यापासून कुणीचं रोखू शकत नाही. असचं काहीसं बीडच्या शेतकरी कन्येनं करून दाखवलं. कोणतेही क्लास न लावता, सेल्फ स्टडी करत एमपीएससी मध्ये घवघवीत यश संपादन केलं आहे. विशेष म्हणजे एनटीसीमधून ही शेतकरी कन्या मुलींमध्ये राज्यातून प्रथम आली आहे. अश्विनी बाळासाहेब धापसे असं परिस्थितीवर मात करून घवघवीत यश संपादन केलेल्या शेतकरी कन्येचं नाव आहे. तिचे आता पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार असून, लवकरच ती पोलीस उपनिरीक्षक म्हणून लोकसेवा करणार आहे. तिच्या खांद्यावर स्टार लागणार असल्याने सर्व स्तरातून तिचे स्वागत होत आहे.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  बीडच्या धारुर तालुक्यात असणा-या अंजनडोह येथील अश्विनी धापसे ही घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असणा-या सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी आहे. वडील बाळासाहेब धापसे हे कोरडवाहू शेती व काही काळ पारंपारिक मेंढपाळ करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळत दोन मुले व मुलींचे शिक्षण पूर्ण केले आहे. आर्थिक परिस्थिती जेमतेम, तरीही मुलांनी शिकावं ही त्यांची खुप इच्छा होती. त्यासाठी ते रात्रीचा दिवस करून मेहनत घेत होते. शिक्षण देऊन मुलीला नोकरीला लावायचं एवढेच स्वप्न रंगवणा-या निरक्षर आई-वडीलांनी काहीही करून आपल्या मुलीला स्वत:च्या पायावर उभं करायचं स्वप्न बघितले होते. आता ते स्वप्न त्यांना सत्यात उतरताना बघायला मिळत आहे.

  अश्विनी धापसे हीने 10 वी पर्यंतचे शिक्षण गावातीलच नुतन माध्यमिक विद्यालय या शाळेत पूर्ण केले होते. 10 वी मध्ये 88 टक्के गुण मिळाल्यानंतर तिचा शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज औरंगाबाद येथे नंबर लागला होता. तीन वर्ष तेथे शिक्षण घेतल्यानंतर कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 2017 मध्ये एमपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. एक वर्षाच्या अभ्यासानंतर सन 2018 मध्ये महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा दिली होती. या परीक्षेत दोन गुणांनी तिचा नंबर हुकला होता.

  अश्विनी धापसे पुन्हा औरंगाबाद येथे राहून अभ्यास केल्यानंतर मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेली परीक्षा दिली होती. पोलीस उपनिरीक्षक पदाची पीएसआय सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एनटीसी गटात मुलींमधून धारुर तालुक्यातील अंजनडोह गावची अश्विनी बाळासाहेब धापसे हिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. ही बाब अंजनडोहच नाही तर बीडकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

  तिच्या या यशात तिच्या भावांचा मोठा वाटा आहे. अश्विनीच्या एमपीएससी परीक्षेत तिचा मोठा भाऊ योगीनंद धापसे यांची मोठी मदत झाली. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याने खाजगी कंपनीत नोकरी करून आर्थिक मदत केली. औरंगाबाद येथे बंधू योगीनंद यांच्या सोबत राहून त्यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रेरणेने स्वअध्ययन करत एमपीएससी स्पर्धा परिक्षांची तयारी सुरू केली. विशेष म्हणजे कोणतेही क्लास न लावता, सेल्फ स्टडी केली. यादरम्यान 2019 ला परीक्षा झालेल्या महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परिक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये एनटीसी मुलींमधून अश्विनी धापसे महाराष्ट्र राज्यातून मुलींमध्ये प्रथम आली आहे. यामुळे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे तिचे व कुटुंबाचे स्वप्न साकार होणार आहे.

  यासाठी कुटुंबाची साथ अनमोल असल्याचं तिने म्हटले आहे. अधिकारी होण्याचे माझे स्वप्न होते. अनेकदा परिस्थिती आडवी आली; परंतु मी खचले नाही. वडिलांच्या घामाचे यश मिळवून चीज केले. मोठ्या भावापासूनही मला खूप प्रेरणा मिळाली. माझ्या या यशात कुटुंबाची साथ अनमोल राहिली. त्यामुळे माझे हे सर्व यश त्यांनाच समर्पित करते असे ती म्हटली आहे. दरम्यान धारुर तालुक्यातील अंजनडोह या एका छोट्याशा गावातील मुलीने नेत्रदीपक यश संपादन केल्याने अश्विनीने धारुर तालुक्याची व अंजनडोह या आपल्या गावाची मान उंचावली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर अधिकारी बनू पाहणा-या गावखेड्यातील मुलांमुलींसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

  शब्दस्पर्शी- सुनील शिरपुरे
  कमळवेल्ली, यवतमाळ
  भ्रमणध्वनी-7057185479