अमरावती : राज्यघटनेत उल्लेख आहे म्हणून भारत धर्मनिरपेक्ष नाही तर तो पूर्वीपासूनच धर्मनिरपेक्ष होता म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत तसा उल्लेख केला असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हटले असून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना कमी लेखण्याचा हा प्रयत्न निषेधार्ह असल्याचे प्रदेश काँग्रेस प्रवक्ता ऍड. दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे शाश्वत सत्य अद्यापही संघाच्या गळी उतरलेले नसून संधी मिळताच संघीष्ट येन केन प्रकारेण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कमी लेखण्याचा प्रयत्न करीत असतात असाच एक प्रयत्न नागपुरातील एका कार्यक्रमात डॉक्टर मोहन भागवत यांनी गरळ ओकून केला आहे, डॉक्टर बाबासाहेबांनी खऱ्या अर्थाने भारताला धर्मनिरपेक्ष संविधान दिले हे तथ्य नाकारून भारत पूर्वीपासूनच धर्मनिरपेक्ष होता असं म्हणणा-या भागवतांचे हे सामान्यज्ञान आगाध असून भूतामुखी भागवत असाच हा प्रकार असल्याचे दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.इ.स.१२९५ पर्यंत देशात हिंदू साम्राज्य होतं त्यानंतर सतराशे पाच पर्यंत शिवरायांचा महाराष्ट्र वगळता मुगल साम्राज्य होतं या दोन्ही कालखंडात समाजजीवनात राज्यकर्त्यांच्या धर्माचा पगडा होता असे असूनही पाच हजार वर्ष देश धर्मनिरपेक्ष कसा ?असा सवाल ही दिलीप एडतकर यांनी विचारला आहे.
संविधान अस्तित्वात येण्यापूर्वी पाच हजार वर्षा पासून या देशात धर्मनिरपेक्षता अस्तित्वात होती असं दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भेटीत म्हटले होते अशी चक्क लोणकढी थाप डॉक्टर मोहन भागवतांनी ठोकली असून आपल्या दाव्याला दुजोरा देण्यासाठी एका दिवंगत नेत्यांच्या मुखी आपला दावा दडपून मांडणे सरसंघचालकांना शोभले नाही असेही ऍड दिलीप एडतकर यांनी म्हटलं आहे.
परिवर्तनशील प्रवाही व कालसुसंगत हिंदुत्व ही जीवनशैली असून हेच धर्मनिरपेक्षतेचे दुसरे रूप आहे आणि हाच भारतीयांचा हजारो वर्षांपासूनचा स्वभाव आहे असं म्हणणाऱ्या डॉक्टर मोहन भागवत यांनी पेशव्यांच्या काळात अस्पृश्यांच्या गळ्यात मडके आणि ढुंगणाला फडा बांधण्यात येत होता , ती कोणत्या प्रकारची धर्मनिरपेक्षता होती ?स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, ती कोणती धर्मनिरपेक्षता होती ? पुण्यातले सोनार ब्राह्मणां सारखी धोतरं घालतात म्हणून त्यांची तक्रार पेशव्यांनी गव्हर्नर कडे केली होती, ते कोणत्या धर्मनिरपेक्षतेत बसत होतं ? तो सर्व कोणत्या हे सुद्धा स्पष्ट करण्याचे आवाहन दिलीप एडतकर यांनी सरसंघचालकांना केले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या