Header Ads Widget

हिंगणघाटातील अंकिता जळीतकांडाचा आज निकाल

    हिंगणघाट : येथील बहुचर्चित अंकिता जळीतकांड प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण झाले असून, या प्रकरणाचा निकाल येत्या शनिवार, ५ फेब्रुवारीला लागणार आहे. प्रा.अंकिता जळीतकांड प्रकरणात सरकारी आणि आरोपी पक्षातर्फे युक्तिवाद पूर्ण झाला असून जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश भागवत यांच्यासमोर सरकारी पक्ष आणि बचाव पक्षातर्फे युक्तिवाद सुरू होता, तो २१ जानेवारीला पूर्ण झाला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे २९ साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायालय या प्रकरणाचा निकाल देईल, असा विश्‍वास अँड. उज्ज्वल निकम यांनी दिला.

    प्रा.अंकिता पिसुड्डे हिचा दोन वर्षे पूर्वी दोन फेब्रुवारी २0२0 ला निर्घृण हत्या करण्यात आली होती. १0 फेब्रुवारीला तिचा उपचारादरम्यान नागपूर येथील ऑरेंज सिटीमध्ये जीवनसंघर्ष संपला होता. अंकिता जळीतकांड प्रकरणात पोलिसांनी आरोपी विक्की ऊर्फ विकेश नगराळे यांच्यावर भारतीय दंड विधानानुसार आरोपी निश्‍चित केले होते. या जळीत कांडाचे पडसाद संपूर्ण देशामध्ये उमटले होते. गुन्हेगारीला त्वरित फासावर द्या या मागणीसाठी सर्वत्र मोर्चे व निदर्शने केली होती. पीडित अंकिता व आरोपी हे दोघेही हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावाचे रहिवासी आहेत.

    अंकिताचा मृतदेह ज्यावेळी दारोडा येथे अंत्यसंस्कारासाठी आणला होता. त्यावेळी संतप्त गावकर्‍यांनी रुग्णवाहिका व पोलिसांवर दगडफेक केली होती. शासनाला लोक आग्रहापुढे झुकून सदर प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयामध्ये होईल असे घोषित केले व विशेष सरकारी वकील म्हणून शासनातर्फे सुपरिचित अधिवक्ता अँड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती याप्रकरणी करण्यात आली. त्यामुळे प्रकरणाची जलद चौकशी करण्यात आली. यावेळी सरकारी पक्षातर्फे अँड. उज्ज्वल निकम, अँड. दीपक वैद्य यांनी भाग घेतला. बचाव पक्षातर्फे अँड. भूपेंद्र सोने, शुभांगी कोसार,अवंती सोने व सुदीप मेर्शाम यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या