Header Ads Widget

माय मराठी...

  "माझा मराठीची बोलू कौतुकें।
  परी अम्रुतातेही पैजा जिंके।
  ऐसीं अक्षरे रसिकें मिळविन।"

  आज २७ फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन. महाराष्ट्र व गोवा ही दोन्ही राज्ये आज ह्या मराठी भाषेचा दिवस साजरा करतात. २७ फेब्रुवारी हा अजरामर कविवर्य कुसुमाग्रज ह्यांचा जन्म दिवस. नाशिक मध्ये जन्मलेले विष्णू वामन शिरवाडकर (वि. वा. शिरवाडकर) हे अग्रगण्य कवी, ज्ञानपीठ विजेते,(१९८७) महान नाटककार, कथाकार. असा महान पुरुष अनंत काल स्मरणात रहावा म्हणून त्यांचा जन्म दिवस हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून शासनाने जाहीर केला. कुसुमाग्रजांची "कणा" ही कविता बरंच काही शिकवण देते.

  "ओळखलंत का सर मला"
  "पाठीवर हात ठेऊन फक्त लढ म्हणा"

  अशा अजरामर काव्य रचना केलेल्या थोर कविचे शुभाशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे ही सदिच्छा. "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" सुरेश भटांची कविता. खरंच एकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी, मी मराठी. आजचा एक दिवस मराठीचे गोडवे गाऊन उपयोग नाही. तर मराठी भाषा जतन करा. तिला सतत उपयोगात आणा. आपल्या महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात बोलली जाणारी भाषा. सामान्य जनतेला आपली वाटणारी भाषा.

  अगोदर संस्कृत भाषाच प्रज्वलीत होती. सामान्य जनतेला समजणे कठीण होते. "भगवत गीता" सामान्य लोकांपर्यन्त पोचवावी म्हणून आपले महान संत ज्ञानेश्वरांनी भगवत गीता मराठीतून लिहिली व ती "भावार्थ दिपिका" म्हणून लोकांना मिळाली. माझ्या मराठीचा मान अमृतापेक्षा ही श्रेष्ठ आहे. आपल्या महान संतांनी मराठी भाषेला एवढ्या उंचीवर नेले की ह्या भाषेचे सर्वश्रेष्ठ साहित्य आहे. ते महान संत म्हणजे संत तुकाराम, संत रामदास, संत एकनाथ, संत नामदेव इत्यादी. ह्यांचे साहित्य फक्त भक्तिमार्गच नसून आजच्या समाजाला शिकण्या सारख्या खूपच गोष्टी आहेत. उदाः संत रामदासांचे "मनाचे श्लोक" व 'दासबोध" स्वतःआपण कसे वागावे, संस्कृती कशी जपावी हे मनाच्या श्लोकातून कळते. तर दासबोधात मूर्ख कोणाला ओळखावे, त्यांची लक्षणे कोणती हे कळते. आजच्या तरुणांनी ह्यांचे वाचन केले व अमलात आणले तर ते आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाहीत. कवी मोरोपंतांनी ५८ प्रकारात रामायण लिहिले. श्रीराम जय राम जय जय राम. ही अक्षरे सुरुवातीला,शेवटाला, मध्ये,आडवी, तिडवी वापरून रामायण लिहिले "किती महान ते"

  बहिणाबाईना लिहिता वाचता येत नव्हते, तरी सृष्टीत आजूबाजूला दिसणाऱ्या दृष्य व अनुभवाने एवढ्या महान ओव्या व रचना रचल्या, त्या अजरामर आहेत. एवढीशी पक्षीण आपल्या इवल्याशा चोचितून एवढा सुंदर खोपा तयार करते, तर माणसा तुला देवाने दोन हात व दहा बोटे दिलीत, मग तू काय करायला हवे. खरंच असे बोधप्रिय काव्य रचनांचे छापील कार्य त्यांच प्र. के. अत्रेनी स्वखर्चानी केले. मराठी भाषेला ग.दी.माडगुळकरांनी चार चांद लावले "गीत रामायण " लिहून. पु.ल.देशपांडे, व अनेकांनी मराठी भाषेची शान वाढवली.

  आज आपण एकमेकांना शुभेच्छा देऊन मराठी भाषा दिन साजरा करतो. आज एकच दिवस करून उपयोग नाही. ही भाषा टिकवायची असेल तर आपण व सरकारने सुध्दा प्रयत्न करायला हवेत, नाही तर काही दिवसांनी मोडी सारखी मराठी ही नाहीशी व्हायला वेळ लागणार नाही. त्वरीत काही तरी करा. आपल्या देशात २८ प्रांत आहेत. प्रत्येक प्रांताची भाषा आहे. उदाः कर्नाटक प्रांत ह्या प्रांतात सगळे कन्नडच भाषा बोलतात. त्याना सरकाने तशी सक्तीच केली आहे मग आपल्या महाराष्ट्रात कां नाही? आपण त्या राज्यात गेलो तर" काला अक्षर भैस बराबर" अशी गत होते, मग? आज मराठी शाळा ओस पडतात. सरकारने सुध्दा कमी केल्यात. प्रत्येक आई वडिलांना आपलं मुल इंग्रजीतच शिकावं असं वाटतं. स्वतःला इंग्रजीच ज्ञान नसलं तरी जिवाचा आटापिटा करून मुलांना इ़ंग्रजीतच पाठवतात.

  पण असं कां? आपल्या मातृभाषेतून शिकलांत तर कल्याण होईल, पैसे ही वाचतील. आपले मोठ मोठे लोक मराठीभाषा शिकूनच महान झालेत! जगात अनेक भाषा आहेत. व्यवहारा करता त्या त्या शिकता येतात पण आधी मराठीला बाळगा नंतर दुसऱ्या भाषेकडे वळा. परदेशात राहणारे आपले अनेक लोक जरी त्यांच्या मुलांना इंग्रजी या दुसऱ्या भाषेत शिकवत असले तरी तेथे ते घरी आपल्या मुलांशी मराठीतूनच बोलतात. आपली संस्कृती जपतात. या उलट इथे राहणारे लोक इंग्रजीचा तोरा दाखवतात. धड नीट बोलता येत नसलं तरी पार्टीत चार इंग्रजी शब्दांची फेक टाकून मिरवतात. पण ह्यांना जेव्हां राग येतो व ते भडकतात तेव्हां हमखास मराठीतूनच शिव्या हासडतात!!

  सुरेश भटांच गाणं आठवा "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी " त्या प्रमाणे वागा व सरकारने सुध्दा कर्नाटका सारखे काही उपाय करावे अशी कळकळीची विनवणी करते. तसे काही केले तरच मराठी वाचेल, माझी माय मराठी जीवंत राहील. मी मराठी. जय महाराष्ट्र, जय माय भाषा "मराठी"

  शोभा वागळे
  मुंबई.
  8850466717

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या