हिंगणघाट : अंकिता जळीत प्रकरणाला आता दोन वर्षे तीन दिवस पूर्ण झाले असून, शनिवारी या खटल्याच्या निकालाची तारीख अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल भागवत यांनी निश्चित करण्यात आली होती. परंतु शनिवारी न्यायालयाने न्यायालयीन कामकाज पूर्ण झालेले नसल्याने निकालाकरिता ९ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. वर्धा जिल्ह्य़ासह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेमध्ये उत्सुकता वाढली आहे.
मागील दोन वर्षे तीन दिवसांपूर्वी ३ फेब्रुवारी २0२0 ला सकाळी ७.२0 मिनिटांनी दारोडा येथील अंकिता पिसुड्डे या मातोश्री आशाताई कुणावर महिला महाविद्यालयात कर्तव्यावर जात असताना अचानक गावातील ओळखीचा असलेल्या आरोपी विकेश ऊर्फ विकी नगराळे (वय ३२) याने नदोरी चौकात पेट्रोल टाकून पेटवून दिले आणि परिसरात हाहाकार माजला. याची माहिती मिळताच येथील नगरसेवक व महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर यांनी घटनास्थळी पोहचून पीडितेला ताबडतोब येथील उपजिल्हारुग्णालयात घेऊन गेले आणि घटनेची तक्रार हिंगणघाट पोलिस स्टेशनला केली. हिंगणघाट पोलिसांनी त्याचदिवशी दुपारी २.३0 वाजता आरोपी विकेश नगराळे याला बुटीबोरी (टाकळघट) येथून ताब्यात घेतले. या घटनेच्या निषेधार्थ वर्धा जिल्हासह महाराष्ट्रातही निषेध, मोर्चे काढण्यात आले. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे आणि या प्रकरणात ख्यातनाम वकिलाची नियुक्ती करावी, ही मागणी जनतेने लावून धरली आणि जनतेची ही मागणी सरकारने मान्य करीत हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची घोषणा केली आणि या प्रकरणात प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली.
महाराष्ट्रातील इतिहासात प्रथमच या संपूर्ण घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी तृप्ती देसाई यांनी अवघ्या पंचवीस दिवसात तपास पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले असून, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १७ फेब्रुवारी २0ला आरोपीविरुद्ध आरोप निश्चित करून प्रकरण चालवायला सुरुवात केली आणि या खटल्यात ११ जानेवारी २१ ला प्रथम साक्ष डॉ. उमेश तुळसकर, सुनीता देशमुख, सचिन बुटले या तीन साक्षीदारांची साक्ष झाली. या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपपत्र दाखल करताना एकूण ६६ साक्षीदार गोळा केले होते. परंतु सरकारी पक्षाने यातील महत्त्वाचे प्रमुख २९ साक्षीदार न्यायालयापुढे तपासले यातील एकही साक्षीदार फितूर झाला नाही.
या संपूर्ण खटल्यात ६४ तारखा झाल्या असून, प्रसिद्ध विधितज्ज्ञ उज्जज्वल निकम ३४ तारखेवर स्वत: हजर राहून न्यायालयासमोर सरकारच्या वतीने कामकाज चालविले. कोरोना काळातही त्यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंग हजर राहून कामकाज चालविले. या कामात त्यांना सहाय्यक सरकारी वकील दीपक यांनी मदत केली तर आरोपीचे वकील भूपेंद्र सोने हे पूर्ण वेळ आरोपीच्या वतीने हजर होते. त्यांना शुभांगी कुंभारे (कोसरे) यांनी मदत केली.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या