Recent in Technology

Advertisement

Breaking News

कोशिश करने वालों की कभी हार नही होती..!

  पन्नास मुलाखतीच्या अपयशानंतर यशाचं शिखर हस्तगत

  स्वप्न तर सगळेच बघतात, पण ती सत्यात उतरवण्याची जिद्द फार कमी लोकांमध्ये असते. स्वप्नातील नोकरी मिळवण्यासाठी दररोज लाखो लोक मुलाखती देतात. अनेकांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळते. तर काही जणांना खस्ता खाव्या लागतात. पण जर ध्येय निश्चित असेल आणि ते प्राप्त करण्याची जिद्द असेल तर काहीच कठिण नाही. ध्येय गाठताना तुम्ही कितीदा अडकलात? आणि तुमच्या पदरी अपयश आले, तरी त्याने काहीच फरक पडत नाही. पण हार न मानता सतत ध्येयाचा पाठपुरावा केला तर स्वप्न नक्कीच साकार होतात. मेहनत घेतल्यावर यश पदरी पडते. हे बिहारच्या पाटणा शहरातील एका 24 वर्षीय संप्रिती यादव या तरुणीच्या प्रवासावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ती म्हणाली, प्रत्येक प्रयत्न हा पूर्ण मेहनतीने आणि इमानदारीने करावा. तसेच मुलाखतीमध्ये अपयश येणे देखील महत्त्वाचे आहे. कारण अपयश हे व्यक्तीला अधिक मेहनत करण्यास प्रवृत्त करते. तुम्ही जितके जास्त प्रयत्न कराल तितके चांगले दिर्घकालीन परिणाम तुम्हाला मिळतील, असे ती म्हणाली.

  सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या संप्रिती यादवला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी असणा-या गुगलने 1.10 कोटी रुपये पगाराची नोकरी दिली आहे. पण ही नोकरी मिळवण्यासाठी तिला अपार प्रयत्न करावे लागले. नोकरी मिळवण्यासाठी ती जवळपास 50 वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखतींना सामोरी गेली होती. आपला अनुभव तिने शेअर केला आहे. मुलाखती दरम्यान मला नर्व्हस वाटायचं. चांगले काम करण्यासाठी माझे आई-वडील आणि जवळच्या मित्रांनी मला नेहमी प्रोत्साहन दिलं. मोठ-मोठ्या कंपन्याबद्दल माहिती गोळा करण्यासाठी अनेक तास घालवले. मोठ्या कंपन्यामध्ये मुलाखती या सहसा चर्चा स्वरूपात असतात. सतत अभ्यास करून आणि पूर्ण आत्मविश्वासाने मुलाखत दिल्यास त्यात यश मिळते, असे तिने सांगितले. लंडनमधील गुगलच्या ऑफिसमध्ये काम करण्याची संधी ही माझ्यासाठी पॅकेजपेक्षाही सर्वांत मोठी गोष्ट होती. पॅकेज संदर्भातील माहिती तर नंतर मिळाली. मुलाखत पास केल्याचे कळल्यानंतर माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता. कोणत्याही मोठ्या टेक फर्मशी जोडलं जाणं, हे प्रत्येक सॉफ्टवेअर इंजिनिअरचं स्वप्न असतं. गुगलमध्ये नोकरी आणि तेही लंडनमध्ये काम करणार हीच भावना माझ्यासाठी खूप भारी होती. वैयक्तिकरित्या यामुळे माझ्या आत्मविश्वासात भर पडली आहे, असे तीने सांगितले.

  संप्रिती यादवने पाटणा येथील नॉट्रे डेम अकादमीमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. तर मे 2021 मध्ये दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठातून कंप्युटर सायन्समध्ये बीटेक पूर्ण केले आहे. तेव्हापासून संप्रिती नोकरीच्या शोधात होती. आपल्याला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एखाद्या मोठ्या कंपनीमध्येच नोकरी करायची आहे असं तिने ठरवलं होतं. यासाठी तिने तब्बल 50 मुलाखती दिल्या होत्या. यामध्ये तिने गुगलमध्येही मुलाखत दिली होती.

  गुगलच्या मुलाखतीच्या एकूण नऊ फे-या झाल्या. या फे-यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि वेगवेगळ्या विषयांवर उमेदवारांच्या आकलन शक्तीची चाचणी घेण्यात आली. संप्रितीने या मुलाखतीमध्ये चांगली कामगिरी करत सर्व फे-या यशस्वीपणे पूर्ण केल्या. प्रत्येक फेरीतील तिच्या उत्तराने अधिकारी समाधानी होते. त्यानंतर गुगलने तिला वर्षाला 1 कोटी 10 लाख रुपयांची ऑफर दिली. म्हणजेच महिन्याला जवळजवळ 9 लाखांच्या आसपास पगार तिला ऑफर करण्यात आला. संप्रितीने ही गुगलची ऑफर स्विकारली.

  14 फेब्रुवारीपासून 24 वर्षीय संप्रिती गुगलमध्ये रुजू होणार होती. विशेष म्हणजे संप्रितीला गुगलच्या आधी मायक्रोसॉफ्टनेही नोकरीची ऑफर दिली होती. 50 मुलाखतींमध्ये अपयश आल्यानंतर अचानक तिला चार ठिकाणांहून नोकरीच्या ऑफर्सही आल्या होत्या. मात्र तिने गुगलची ऑफर स्विकारली. “मुलाखतींच्या वेळेस माझा फार गोंधळ उडायचा. मात्र मला पाठिंबा देणारे माझे पालक आणि जवळचे मित्र यांनी मला कायमच अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मी रोज अनेक तास मोठ्या कंपन्यांबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी वाचन करायचे. अनेक मोठ्या कंपन्यांमधील मुलाखती म्हणजे एखाद्या चर्चेसारख्या असल्याने त्या कंपन्यांबद्दलची माहिती असणं हे फार महत्वाचं असतं,” असं संप्रिती सांगते.

  आपल्या मुलाखतीसंदर्भात सांगताना संप्रितीने गुगलच्या टीमकडून ऑनलाइन माध्यमातून एकूण 9 टप्प्यांमध्ये मुलाखत घेण्यात आल्याचं सांगितलं. मी या मुलाखतीसाठी बरीच तयारी केली होती. सर्वच स्तरांमध्ये मला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची मी समाधानकारक उत्तरे दिली. त्यामुळेच माझी निवड झाली आणि मला ही नोकरीची ऑफर देण्यात आली, असं संप्रिती म्हणाली.

  मोठ्या पॅकेजपेक्षा गुगलच्या लंडनमधील कार्यालयामध्ये काम करण्याची आपल्याला संधी मिळणार असल्याने आपण अधिक समाधानी असल्याचं संप्रिती म्हणाली. गुगलच्या लंडन ऑफिसमध्ये काम करण्याची संधी मिळावी, असं संप्रितीचे लहानपणापासूनच स्वप्न होते. संप्रितीचे वडील रामशंकर यादव हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत आहेत. तर आई शशी प्रभा या बिहार सरकारच्या नियोजन आणि विकास विभागात सहाय्यक संचालक पदावर आहेत

.

  आपले प्रेरणा स्रोत हे आई-वडील असल्याचे तीने सांगितले. तिच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा आई-वडीलांकडून मिळाली. मी लहान होते तेव्हापासूनच माझ्या आई-वडिलांनी खूप कष्ट घेतले आहेत. माझ्या आईने अनेक परीक्षा दिल्या. त्यात त्यांना अपयश मिळाले. पण ती कधीच खचली नाही. माझ्या आई-वडिलांना पाहूनच मी वागले. तसेच याशिवाय माझ्या मित्रांकडूनदेखील मी प्रेरणा घेते. कारण प्रत्येकाकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळते असा माझा विश्वास आहे, असे ती म्हणाली.

  तुम्हालाही काही मोठं करायचं असेल, स्वप्नातील नोकरी मिळवायची असेल, तर सर्वप्रथम तुमचं ध्येय निश्चित करावं लागेल. यानंतर त्याच ध्येयानुसार तयारीला लागावं लागेल. त्यासाठी तुम्हाला अपार मेहनत घ्यावी लागेल. यश गाठण्यासाठी पहिल्यांदा रिजेक्टेड ई-मेल, अपयशी मुलाखती, कुटुंब, दबाव आणि निराशेपासून स्वत:ची मुक्तता करून घ्यावी लागेल आणि मोकळेपणाने अभ्यास आणि स्वतःवर विश्वास ठेवून काम करावे लागेल. कारण प्रयत्नाने यश नक्कीच प्राप्त होते. जे लोक प्रयत्न करतात ते कधीही हार मानत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जर यशाच्या शिखरावर जायचे असेल तर मेहनत सोडू नका. कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या बळावर मोठी कामगिरी करता येते. त्या अनुषंगाने तुमचीही स्वप्ने कधीतरी पूर्ण होतील आणि तुम्हालाही यश नक्कीच मिळेल...!

  -सुनील शिरपुरे
  कमळवेल्ली, यवतमाळ
  भ्रमणध्वनी-7057185479

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code