‘मुक्काम पोस्ट पाटीपुरा’ एक आश्वासक उपक्रम

  यवतमाळ शहराने आजवर आंबेडकरी चळवळीत राज्याला आदर्श ठरावेत असे उपक्रम दिले आहेत. यवतमाळचे “समता पर्व” असो की “स्मृती पर्व” यातून परिवर्तनवादी विचार लोकाभिमुख होण्यास मदतच झाली आहे. याच पठडीतील “मुक्काम पोस्ट पाटीपुरा” हे कवी आनंद गायकवाड यांनी संपादित केलेले पुस्तक तर राज्यातील चळवळींसाठी रोल मॉडेल ठरावे असेच आहे. जाणून घेऊया या पुस्तकांविषयी आजच्या आश्‍वासक मध्ये…

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या विचारांचा रथ पुढे नेण्यासाठी गावोगावी शिलेदार पुढे आले. कोणी गाणी लिहिली, कोणी गाणी गायली, कोणी भाषणे दिली तर कोणी जलशातून प्रबोधन केले. या सगळ्यांचा परिपाक असा झाला की, एके काळी गावकुसाबाहेर असलेला आणि अस्पृश्य मानल्या गेलेला जनसमुदाय आपल्या अस्तित्वाने चमकू लागला. या परिवर्तनास कारणीभूत ठरलेली काही माणसे आज हयात आहेत तर काही काळाच्या आड गेलेली आहेत. त्याच बरोबर हेही जगजाहीर आहे की, प्रस्थापित इतिहासकरांनी या वंचितांसाठी काम करणाऱ्या लोकांच्या कामाला आजवर वगळण्याचेच काम केले. मात्र यावर अश्रू ढाळत बसण्यापेक्षा आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे या पद्धतीने काम सुरू झाले आहे ठिकठिकाणच्या या कामासाठी रोल मॉडेल ठरावे असे “मुक्काम पोस्ट पाटीपुरा” हे पुस्तक आहे.

  खरेतर यवतमाळ शहरवासीयांसाठी पाटीपुरा हे नाव अपरिचित नाही. औरंगाबादचे क्रांतीनगर, नागपूरचे इंदोरा वा घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर या सारखीच पाटीपुरा ही वस्ती आहे. आजमितीस २५ हजारांपेक्षा अधिक लोकवस्ती असलेला हा परिसर दाटीवाटीने वसला आहे. यवतमाळ शहराचे चार नगरसेवक याच परिसरातून निवडून येतात. स्थानिक राजकीय सत्तेची उलथापालथ करण्याची धमक असलेल्या वस्तीने आंबेडकरी चळवळीसाठी नेहमीच “जागते रहो” चा पहारा दिला आहे. आजचा काळ म्हणजे…

  कालपर्यंत रात्री वैऱ्यांच्या होत्या
  आता दिवसही वैऱ्यांचे होत आहेत

  या पठडीतला हा काळ. अशा काळात समाज परिवर्तनाच्या चळवळीत या वस्तीचे योगदान फार मोठे आहे. देशात आणि राज्यात घडलेल्या प्रत्येक घटनेचे प्रतिध्वनी पाटीपुऱ्यात उमटले आहेत. पाटीपुरा अजूनही गरम आहे. थंड होणेही नाही. आज वर लढा कोणताही असो मग तो नामांतराचा असो की रमाबाई नगर, खैरलांजी बेलछी हत्याकांड असो की जवखेडा सोनई अशा प्रत्येक अन्यायकारक घटनेचा प्रतिध्वनी पाटीपुरात उत्स्फूर्तपणे उमटल्याशिवाय राहिला नाही. मात्र असे असले तरी शतकातील यवतमाळ साकारताना तिथल्या कलमकसायांनी पाटीपुरा वस्तीची दखल घेतली नाही. ही खंत जिव्हारी लागल्याने पाटीपुऱ्यात वास्तव्यास असलेल्या आंबेडकरी चळवळीच्या शिलेदारांनी पाटीपुराच्या इतिहासाचा धांडोळा घेतला आणि जवळपास १२० पानाचा पाटीपुऱ्यातील व्यक्तीवर आधारित हा ग्रंथ साकारला. या ग्रंथाचे संपादन कवी आनंद गायकवाड यांनी केले. २०१७ साली यवतमाळला स्मृती पर्वात या ग्रंथाचे प्रकाशन झाले. आपल्या कामाची दखल घेतली गेल्याबद्दल अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. एक इतिहास रचला गेला.

  महाराष्ट्राला लढण्याचा इतिहास आहे हा इतिहास विविध जाती समुदायातील लोकांनी घडविला असला तरी लिहिण्याचा मक्ता आजवर एका विशिष्ट वर्गाकडे होता. त्याने तो समान न्यायाने लिहिला नाही. यावर पाटीपुरा वस्तीतील आनंद गायकवाड आणि त्यांच्या मित्र परिवाराने घेतलेल्या मेहनतीला नक्कीच दाद द्यावी लागेल.

  यवतमाळच्या आंबेडकरी साहित्य व कला अकादमी या संस्थेच्या वतीने हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. चित्रकार बळी खैरे, सुनील वासनिक, कवडू नगराळे, प्रा. डॉ. अशोक कांबळे, संजय बोरकर, हेमंत कांबळे, योगानंद टेंभुर्णे, जयप्रकाश चव्हाण, अरविंद खोब्रागडे व वंदना विजय वासनिक यांनी यासाठी मेहनत घेतली आहे. या पुस्तकात योगानंद टेंभुर्णे, प्रा. डॉ. अशोक कांबळे, रवींद्र टेंभुर्णे, गोविंद मेश्राम, सुनील वासनिक, संघमित्रा टेंभुर्णे, संजय बोरकर, प्रशिक भैसारे आणि आनंद गायकवाड इ. मान्यवरांचे या पुस्तकात लेख आहेत. संपादक या नात्याने आनंद गायकवाड यांनी या पुस्तकाच्या निर्मितीचा घटनाक्रम सांगितला आहे. ते लिहितात की, पाटीपुरा या वस्तीला अनेक आयाम आहेत. या वस्तीने शतकाचा वसा आपल्या मागे सोडला आहे. आजही त्याच ताठ्याने ही वस्ती उभी आहे. शतकातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वाडमयीन ठेवा लिखित स्वरूपात उपलब्ध नाही. कदाचित हा ठेवा विस्मृतीत गडप झाला असावा म्हणून तो धुंडाळण्याचे काम या निमित्ताने झाले”

  या पुस्तकात ‘अन्यायाविरोधात लढणारा पाटीपुरा’ या लेखात पाटीपुरा वासीयांनी केलेल्या संघर्षाची माहिती रवींद्र टेंभुर्णे यांनी दिली आहे. त्यात १९५६ ते २०१७ पर्यंतच्या विविध घटनांचा धावता आढावा आहे. विशेषत: पाटीपुरा माळीपुरा संघर्ष, भूमिहीन शेतकऱ्यांचा संघर्ष, नामांतराचा संघर्ष, धोटे विरोधातला संघर्ष, विडी कामगारांचा प्रश्न, जीन प्रेस कामगारांचा प्रश्न, पुतळा विटंबना प्रकरण, नामांतर आंदोलन व खैरलांजी आंदोलन यासह विविध प्रकरणात पाटीपुऱ्यातील लढाऊ महिलांनी केलेल्या संघर्षाची उजळणी यात आली आहे. धम्म चळवळ, सांस्कृतिक चळवळ, साहित्य चळवळ, नाट्य चळवळ, दलित पॅंथर व समता सैनिक दल यांच्या कामाची दखल सुद्धा यात घेण्यात आली आहे. आंबेडकरी चळवळीतील हि. ब. सोनडवले, बालारामजी टेंभुर्णे, गीतकार राजानंद गडपायले यांच्या वर यात स्वतंत्र लेख आहेत. रघुनाथ पोचुजी मेश्राम, राघोबाजी तेलंग, शांताबाई रामटेके, पार्वताबाई गायकवाड, उद्धवरावजी वाघमारे, कचराबाई कचरुजी वानखडे, रमेश गंगारामजी मेश्राम, चंद्रकांतजी रामटेके, नरसिंग रामटेके, रामधन रामचंद्र राऊत, अंजली रामचंद्र महाजन, तुळशीराम डोमाजी मेश्राम, उद्धवरावजी अंबादे व लक्ष्मी नानाजी धाकडे या मान्यवरांबद्दल संक्षिप्त स्वरूपात माहिती आहे. ही माहिती संकलनाची महत्त्वाची जबाबदारी प्रशिक भैसारे यांनी पार पाडली आहे. त्याचबरोबर पॅंथर मीराबाई जोगळेकर, कमलाबाई गायकवाड, रमाबाई सोनटक्के, सरस्वती जोगळेकर, प्रमोदिनी रामटेके, मालती गायकवाड, शोभना कोटंबे, कौसाबाई महाजन या पाटीपुऱ्यातल्या लढवय्या स्त्रियांची माहिती देखील संघमित्रा रवींद्र टेंभुर्णे यांनी संकलित करून या ग्रंथात दिली आहे.

  खरे तर महाराष्ट्रात अशा हजारो वस्त्या आहेत ज्यांनी बाबासाहेबांचा वारसा आणि विचार जपला व तो पुढच्या पिढीला हस्तांतरित केला. या सर्वांचा इतिहास संकलित व्हायला हवा. एका पाटीपुरा वस्तीतला हा इतिहास जर इतका तेजोमय संघर्षशील आणि प्रेरक ठरत असेल तर अशा हजारो पाटीपुऱ्यातला इतिहास अधिकच प्रेरक ठरू शकेल. हे काम सरकार करणार नाही. इतिहासाचे स्वयंघोषित ठेकेदार आणि प्रस्थापित भांडवलदारांची वृत्तपत्रे करणार नाहीत. ते काम त्या त्या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या डोळस आंबेडकरी अनुयायांना करावे लागेल. पाटीपुरा वस्तीने आजवर लढायचे कसे? याचा आदर्श घालून दिला आहेच आता आपला इतिहास संकलित कसा करायचा आणि तो ग्रंथ स्वरूपात प्रसिद्ध कसा करायचा? याचा नवा आदर्श घालून दिला आहे. महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा पहिला प्रयत्न असावा. या प्रयत्न प्रक्रियेचे आणि संपादक आनंद गायकवाड यांचे यासाठी खूप खूप अभिनंदन…

  -रविंद्र साळवे
  बुलडाणा
  9822262003