• Mon. Jun 5th, 2023

मराठी शब्दांचे महत्त्व…

  आज दि.२७ फेब्रुवारी २०२२ ला असलेल्या ” मराठी भाषा गौरव दिना” निमित्त “मराठी शब्दांचे महत्त्व” हा कवी व लेखक प्रा.अरुण बुंदेले यांचा लेख वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत. -संपादक

  आज दि. २७ फेब्रुवारी २०२२ ला असलेल्या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना” विनम्र अभिवादन ” आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना “हार्दिक शुभेच्छा !” मराठी शब्दांचे महत्त्व अनेक संतांनी सांगितलेले आहे. शब्दांमध्ये जे सामर्थ्य आहे ते कशातच नाही असेही म्हटले जाते कारण शब्द जसे शास्त्रज्ञान सांगून जीवन आनंदित करू शकतात तसेच हेच शब्द शस्त्रांचेही कार्य करू शकतात. संत कबीर शब्दांचा परिणाम वर्णन करताना म्हणतात की,

  शब्द शब्द सब को ये काहे ।
  शब्द के हात न पाँव ।
  एक शब्द औषध करे ॥
  एक शब्द करे घाव ॥

  संत शिरोमणी तुकाराम महाराज शब्दांची पूजा करायला सांगताना म्हणतात की,

  आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने।
  शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ।
  शब्दची आमुचे जीवाचे जीवन।
  शब्दा वाटु धन जनलोका ।
  तुका म्हणे पहा शब्द हाची देव।
  शब्दांची गौरव पूजा करू ॥

  अर्थात शब्दांच्या रत्नांचं घर संत तुकारामांजवळ आहे . त्याचा उपयोग जनकल्याणासाठी त्यांनी केला. तत्कालीन समाजाला त्यांनी आपल्या अभंगवाणीच्या शब्दातून ढोंगी साधू पासून वाचविले. त्यांच्या एका अभंगातील शब्दातील विचारांनी हजारो विद्यार्थ्यांना अभ्यासाची प्रेरणा मिळाली व आजही मिळत आहे.ते आपल्या अभंगात म्हणतात की,

  असाध्य ते साध्य। करिता सायास।
  कारण अभ्यास। तुका म्हणे॥

  कवयित्री शांता शेळके यांना तर स्वत:च्या अस्तित्वाची जाणीवच शब्दातून होते.त्या म्हणतात की,

  शब्दात चित्रे रेखली,
  शब्दात शिल्पे कोरली।
  शब्दांमध्ये पिकुनी पुरे फळ।
  हे आता आले रसा,
  माझ्या असण्याची शब्द
  मला देती ग्वाही ।
  शब्दाहुनी वेगळी मी नाही, मी नाही॥

  शब्दातून माणसांसाठी आरती गाणारे कवीवर्य यशवंत मनोहर म्हणतात की,

  शब्दांची पूजा करीत नाही मी।
  माणसांसाठी आरती गातो॥
  ज्यांच्या गावात सूर्य नाही।
  त्यांच्या हातात उजेड देतो.॥

  अर्थात अंधाऱ्या झोपडीत सूर्य ओतण्याचे कार्य करण्यासाठी यशवंत मनोहर शब्दांची पूजा न करता माणसांसाठी ते आरती गातात ती शब्दांतूनच. कवी सुधीर मोघे म्हणतात की,

  शब्दात निखारा फुलतो ।
  शब्दात फुलही हळवे ॥
   शब्दांना खेळाविताना।
   शब्दांचे भान हवे ॥

   म्हणजेच निखारा फुलविण्याचं सामर्थ्य जसं फुलात आहे तसच फुलांसारखी कोमलताही शब्दात आहे म्हणून शब्दांचा उपयोग करताना शब्द वापरणारा भानावर असणे आवश्यक आहे. आयुष्यभर निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करताना

   स्वत:साठी जरी काही,
   करता आलं नाही ।
   तरी इतरांसाठी जगून बघावं॥
   दुसऱ्याच्या डोळ्यातील,
    आसवं पुसताना ।
    त्यात आपलं प्रतिबिंब शोधावं ॥

    अशा शब्दांच्या रचनेने सत्कारमूर्तींचा सन्मान होत असतो. अर्थात येथे सांगणारा तर सन्मान करतोच पण शब्दही सन्मान करीत असतात. “स्वातंत्र्य देवीची विनवणी” या कवितेत कवी कुसुमाग्रज स्वातंत्र्यानंतर सुवर्णमहोत्सवाप्रसंगी आपल्या शब्दरचनेतून स्वातंत्र्य देवीला अभिवादन करतानाच भारत पुत्रांना ते हात जोडून सांगतात की, वाईट मार्गाने जाऊ नका. कवी कुसुमाग्रज म्हणतात की,

    पन्नाशीची उमर गाठली।
    अभिवादन मदत करू नका॥
    मीच विनविते हात जोडुनी।
    वाट वाकडी धरु नका ॥
    पुढे ते म्हणतात की,
    प्रकाश पेरा आपल्या भवती।
    दिवा दिव्याने पेटत असे ॥
    इथे भ्रष्टता तिथे नष्टता।

    शंखच पोकळ फुंकू नका ॥भारत पुत्रांना जागृत करण्याचा प्रयत्न त्यांनी शब्दांतून केलेला आहे.कर्मयोगी संत गाडगे बाबांच्या कीर्तनातील व्यसनमुक्तीच्या शब्दात एवढे सामर्थ्य होते की, अनेक व्यसनाधीन लोक तेथेच दारू न पिण्याची व तंबाखू न खाण्याची बाबांसमोर शपथ घेत आणि व्यसनमुक्त होत असत.स्वातंत्र्यपूर्व काळात” वंदेमातरम” हा शब्द म्हणण्यावर इंग्रजांनी बंदी आणली, त्याचे कारण ही तसेच सबळ होते कारण “वंदेमातरम् “या एका शब्दाने भारताला स्वातंत्र करण्यासाठी हजारो भारतीय एकत्र येऊन भारतभूमिच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देण्यास तयार झाले. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या सन १९४२ च्या ” छोडो भारत ” “करो या मरो ” या घोषणेने भारतीयांना इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. कधी कधी शब्दांचे महत्त्व इतके असते की, त्याची महती आपण शब्दातही सांगू शकत नाही ती शब्दातीत असते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जेव्हा आपल्या अभंगातून जनतेला संघटित शक्तीचे महत्त्व सांगत होते तेव्हा आपण संघटित झालो पाहिजे ही प्रेरणा जनतेमध्ये निर्माण होत होती. राष्ट्रसंत म्हणतात की,

    पशुपक्षीही किटके किती ।
    बघा मेळ करूनि राहती।
    आपत्ती येता कोणती ।
    आणि संघटुनिया धावती॥

    मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी शब्दांचे महत्त्व आहेच. अनेक संतांनी आणि कवींनी मराठी भाषेचे मोल शब्दातून सांगितले आहे .त्या शब्दांचे महत्त्व मराठी भाषेच्या वृद्धिसाठी अनमोल ठरते.उदा.कविवर्य सुरेश भट म्हणतात की,

    लाभले भाग्य आम्हांस बोलतो मराठी
    जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
    धर्म ,पंथ, जात एक जाणतो मराठी
    एवढ्या जगात माय मानतो मराठी”

    याशिवाय संत ज्ञानेश्वर,कवी कुसुमाग्रज,कवी फादर स्टीफन्स यांनीही मराठी भाषेचे महत्त्व शब्दातून सांगितले आहे. जगातील प्रत्येक गोष्टीच्या वृद्धिसाठी शब्दांचे महत्त्व आहे. कविवर्य वि.दा.करंदीकर दानाचा गुण अतिशय मोजक्या शब्दात वर्णन करताना म्हणतात की,

    देणाऱ्याने देत जावे ।
    घेणाऱ्याने घेत जावे ॥
    घेता घेता एक दिवस।
    देणाऱ्याचे हात घ्यावे॥

    दानाचा गुण घेण्याची प्रेरणा या शब्दातून वाचकांना मिळते. व शेतकऱ्यांची दयनीय अवस्था बघून कविवर्य विठ्ठल वाघ यांचे वऱ्हाडी शब्द थांबत नाहीत, ते आपल्या अस्सल वऱ्हाडी शब्दातून शेतकऱ्यांचे दयनीय जीवन वर्णन करतात की,

    आम्ही जन्मलो मातीत।
    किती होणार गा माती॥
    खापराच्या दिव्यामधी।
    कधी पेटणार वाती ॥

    क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांनी निरक्षरतेमुळे किती नुकसान होते याचे वर्णन केले आहे. या त्यांच्या सुविचाराचे आज सुभाषित बनले आहे. या सुविचारातील शब्दात साक्षरतेचे अनमोल महत्त्व आहे. ते म्हणतात की,

    विद्येविना मती गेली।
    मती विना नीती गेली।
    नीती विना गती गेली ।
    गती विना वित्त गेले।
    वित्ता विना शुद्र खचले।
    इतके अनर्थ एका अविद्येने केले॥

    थोरांच्या या अशा सुविचारातील शब्दांचे महत्त्व खूप आहे कारण त्या शब्दांनीच समाजाला घडविले आहे. असे हे शब्दांचे महत्त्व सर्वच क्षेत्रात आहे . अशा अनमोल शब्दांचे महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे . संत कबीर यांनी सांगितल्याप्रमाणे ” एक शब्द औषध करे ।” अर्थात चांगल्या शब्दांचे महत्त्व जाणून घेऊन तसे आचरण जेव्हा आपण करू तेव्हा शब्दांचे महत्त्व जगालाही समजेल.

    – प्रा अरुण बाबारावजी बुंदेले,
    रुक्मिणीनगर,अमरावती
    भ्रमणध्वनी:-८०८७७४८६०९

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *