मराठी भाषा संवर्धन…

    मराठी भाषेच्या। गौरवाच्या दिनी।
    शुभेच्छा वाणी। सर्वांनाच॥१॥
    मराठी भाषेचा । सन्मान करू या।
    संवाद करू या। मराठीत॥२॥
    मराठी अशुद्ध। लिहू नये कोणी।
    असू द्यावी वाणी। पूर्ण शुद्ध॥३॥
    मराठी अक्षर। सुंदर आकार।
    इकार उकार । नियमात॥४॥
    नवीन वर्षाला । देऊ या शुभेच्छा ।
    लिहू या सदिच्छा । मराठीत॥५॥
    मराठीत लिहा । मराठीत बोला।
    वाचू मराठीला। आपणच॥६॥
    पत्र मराठीत। पाटी मराठीत।
    सही मराठीत। वाचावया॥७॥
    असे कपाटात । ग्रंथ मराठीचे।
    धडे संस्कृतीचे। घरातच॥८॥
    मराठी संस्कृती। टिकवून ठेऊ।
    मराठीचे गाऊ। गोड गीत॥९॥
    मराठी शाळेत। शिक्षण देऊन।
    मराठीचा मान। वाढवू या॥१०॥
    सर्व व्यवहार। करु मराठीत।
    मराठीची वात। पेटवू या ॥११॥
    मराठी वापरू। सर्वच क्षेत्रात।
    मराठीचं नातं। घट्ट करू॥१२॥
    मराठी भाषेला। करू वृद्धिंगत ।
    जोडूनिया नातं। मातृभाषा ॥१३॥
    साहित्य मेळावे। कथेचे कथन ।
    कविसंमेलन । घेत जावे ॥१४॥
    मराठी माणूस। समृद्ध मराठी ।
    श्रीमंत मराठी। करणार ॥१५॥
    भाषा संवर्धन। करू या आपण।
    ठेऊनिया जाण। मराठीची ॥१६॥
    -प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
    रुक्मिणी नगर,अमरावती
    भ्र.ध्व.:-८०८७७४८०९