• Wed. Jun 7th, 2023

जयंती धोळे झेंडा वाळे बापुर !

    संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त

    जगात परिवर्तनवादी तथा इहवादी विचारांची फार समृद्ध परंपरा मागील हजारो वर्षांपासून आपल्याला बघायला मिळते.अनेक विचारवंत या जगाच्या पाठीवर होऊन गेले. त्यांचा कुठे नामोल्लेखही झालेला नाही, नामोल्लेख न झालेल्या महान विचारवंतामध्येच महान क्रांतिकारी , दूरदृष्टी असणारे संत सेवालाल महाराज यांचे नाव घेतले जाते. आजही आपल्याला समाजामध्ये धार्मिक मानसिकतेचे प्राबल्य असल्याचे दिसते. कट्टर धार्मिक मानसिकतेला परिवर्तन अमान्य असतो. आजपासून 283 वर्षांपूर्वी म्हणजे 15 फेब्रुवारी 17 39 रोजी भीमा नायक रामावत आणि धरमणीयाडी यांना पुत्रप्राप्ती झाली. त्यांचे नाव संत सेवालाल ठेवण्यात आले. त्यांच्या जन्माच्या विविध आख्यायिका समाजात रूढ आहेत. समाजेरो पोरीयातारा म्हणून ओळखले जाणारे. भारत आणि इतर उपखंडात असलेल्या इतर देशातील समग्र बंजारा गोर बंजारा समाजाचे आराध्यदैवत व श्रद्धास्थान असलेले संत शिरोमणी अखंड ब्रम्हांडनायक सेवालाल महाराज यांची आज 283 वी जयंती.

    या थोर तत्वज्ञ आणि विचारवंत महानायकाच्या विचाराला उजाळा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शाळा, महाविद्यालय वेगवेगळ्या कार्यालयाच्या ठिकाणी संत सेवालाल महाराजांची जयंती साजरा करण्याचे आदेशच दिलेले आहेत. याबद्दल प्रथमता शासनाचे समाजाच्या वतीने आभार. सेवालाल महाराज यांना चार भावंडे होती यातून देवीच्या प्रकोपाने (देवी यासाथीच्या रोगाने) बाणा यांचे निधन झाले होते. बापूंच्या घरी जवळपास तीन हजार सातशे गोधन (गाई, बैल) होते. या गोधनाच्या पाठीवर धान्य घेऊन या प्रदेशातून त्या प्रदेशात धान्याची ने आण करण्याचे मोठे काम या काळात होत होते. या गोधनातून बापूला गराशा या बैलावर खूप प्रेम होते. बैलाच्या पाठीवर धान्य ठेवून देशातील राजा महाराजांना रसद पोहोचवण्याचे काम या माध्यमातून होत होते. त्या काळामध्ये सर्वात मोठे दळणवळण म्हणजे वस्तूंची ने-आण करण्याची, लागणाऱ्या अत्यावशक वस्तू, रसद, लदेणीच्या माध्यमातून सर्वदूर पोहोचविण्याच महत्वाचकाम समाजाकडून होत होते यात शंका नाही.

    सर्व बैलामधून गराशा हा संत सेवालाल महाराजांना अतिशय प्रिय असल्यामुळे या बैलावर महाराजांचे भरपूर प्रेम होते .बालपणापासूनच अत्यंत चाणाक्ष, भरदार अंगकाठी , पाणीदार डोळे, मानेपर्यंत केस, लांब दाढी, भरदार अंगात भरारी सदरा, धोतर, डोक्यावर पगडी, कपाळावर चंदनाचा टिळा, गळ्यात मोत्याची माळ, कानात बाळी, यांच्या सर्व पोषाखा मुळे संत सेवालाल महाराज यांना “तोडावाळो” म्हणून ओळखले जायचे. तांडा, वाडी, वस्ती, जंगल यामध्ये वास्तव्य करून उदरनिर्वाहासाठी भारताच्याच नव्हे तर जगाच्या पाठीवर पूर्वेकडून पश्चिमेकडे व उत्तरेकडून दक्षिणेकडे संपूर्ण जग भ्रमण करणाऱ्या समाजाला दिशा दर्शविणारे, क्रांतिकारी महापुरुष सद्गुरू संत सेवालाल महाराज. रूढीग्रस्त आचार विचार आधुनिक काळात तकलादू होऊन परंपरागत जीवन कालबाह्य होईल, अशी दूरदृष्टी ठेवून तर्कवादी व काळाचे चक्र ओळखून, येणाऱ्या काळात काय काय ? घडेल याची शक्यता, याबाबतचे सत्य वचन मांडणारे तत्त्वज्ञानी म्हणून सेवालाल महाराजांची ओळख आहे. बंजारा समाजाचा” पोरयातारा “म्हणून ओळखला जाणाऱ्या संत सेवालाल महाराजांनी त्या काळामध्ये त्यांच्या वचना मधून समाजाला दिलेली शिकवण आजही हा समाज प्रामाणिकपणे मानत आलेला आहे. त्यांच्या शिकवणीचा वारसा जपून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.

    “हमारो तांडो हमारो राज” अशी घोषणा देऊन,
    भूमीआरो मातोतोडे वाळो, 1
    जुरूरी जहाज लोटेवाळो I कटक नदीने थोपे वाळो |

    संत सेवालाल महाराज यांनी त्याकाळी अनेक प्रकारची सत्यवचने आपल्या वाणी मधून दिली. आणि ती आज सत्य ठरतांना आपल्याला दिसत आहे.

    यी सतयुग छ् I :
    (अर्थ : हे सतयूग आहे)
    येर बाद कलियुग आये I
    (अर्थ :यानंतर कलीयुग येईल)
    बाप बेटार पट कोणी I
    (अर्थ: वडील आणि मुलाचे एकमेकांशी पटणार नाही)
    घरेघरे म कलह चालिये I :
    (अर्थ : घराघरात / कुंटूबांत कलह माजेल)
    आळीपाळीम नंगारा वाजीय I
    (अर्थ : देशाच्या कानाकोपऱ्यात धर्माधर्माच्या नावाचा नंगारा वाजेल)
    घरघर नाइकी आय |
    (अर्थ : घराघरात पुढारी/नेतेमंडळी तयार होईल)
    गोमाता न चारो कोणी मळीय I
    (अर्थ : गुराढोरांना चारा मिळणार नाही )
    वानावानर दःख आय I
    (अर्थ : वेगवेगळ्या प्रकारचे आजार येईल, असाध्य बिमाऱ्या येईल)
    दखेर डॉक्टर परख करीय l
    (अर्थ : डॉक्टरांना निदान करता येईल)
    बेमारी हात कोणी आव I
    (अर्थ : पण बिमाऱ्या हाताबाहेर जाईल म्हणजे डॉक्टर निदान करू शकतील पण उपचार करू शकणार नाही.)

    विषमतेच्या पायावर उभा असलेला समाज, धर्म, कधी कोणाचे कल्याण करू शकत नाही. याची महाराजांना जाणीव होती. म्हणूनच त्यांनी त्यांच्या वचनांमधून “कोई केनि भजो मत” “कोई केनी पूजो मत,” म्हणजे याचा अर्थ पारंपारिक अंधश्रद्धेचा फोलपणा जगासमोर अधोरेखित करून, परिवर्तन हेच जीवनाचे सर्वात सुंदर आणि यथार्थ वर्णन असल्याचे संत सेवालाल महाराजांनी आपल्या वचनातून स्पष्ट केले. याचाच अर्थ असा की कोणाला पुजत बसण्यापेक्षा महाराजांनी स्वकर्मा ला जास्त महत्त्व दिले आहे. परिवर्तनाच्या खांद्यावर स्वार होऊन समाजाला प्रगतीच्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न संत सेवाभायांनी केला. सेवाभाया चे बोल आजही बंजारा समाजाच्या कंठात सुरक्षित आहेत. बंजारा समाजामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये संत सेवालाल महाराजांचे वचने प्रगट केली जातात. भजनाच्या माध्यमातून, होळीच्या गीतातून (लेंगीच्या माध्यमातून), दिवाळीचासण साजरा करीत असताना, बंजारा समाज आपला पारंपारिक संस्कृती जपत असताना संत सेवालाल महाराजांचे विचार व त्यांची वाणी येणाऱ्या पिढीपर्यंत कशी पोहोचवता येईल याची खबरदारी नेहमीच घेत आलेला आहे. दिवाळीचा सण असो वा होळीचा सण असो, तीज उत्सव असो व समाजातील पारंपारिक पद्धतीने होणारा लग्न सोहळा असो ,या सर्व सोहळ्यात संत सेवालाल महाराजांची वचने भजनाच्या माध्यमातून, दोहाच्या, व लडीच्या माध्यमातून आजही सुरक्षित ठेवण्यात आलेली आहेत.

    पूर्वेपासून पश्‍चिमेकडे, उत्तरेपासून दक्षिणेकडे मालवाहतूक करत असताना, उदरनिर्वाहासाठी जगभर भ्रमण करणाऱ्या समाजाला एकसंघ ठेवण्याचे कार्य या ब्रह्मचारी, तपस्वी, महाराजांनी केले आहे. त्यांनी सांगितलेली वचने, बोलीभाषेतील लडी भजन करीमंडळी पारंपारिक वाद्याचा म्हणजे थाळी नंगारा याचा वापर करून समाजापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य अधिक करीत आहेत. पूर्वीपासूनच समाजावर अंधश्रद्धेचे सावट होते. अवैज्ञानिक विचारांचा पगडा होता. धार्मिक कर्मकांड, यामुळे समाजाचे अहित होताना सेवालाल महाराजांना दिसत होते, तेव्हा त्यांनी बुद्धिप्रामाण्यवाद, तर्कशुद्धपणा, अंधश्रद्धामुक्ती व कल्याणकारी समाजाच्या निर्मितीचा ध्यास मनामध्ये घेतला होता. तेव्हा त्यांनी आपल्या वचनातून म्हटले होते.

    कोई केणीजो मत,
    कोई केणीपुजो मत ”
    “जाळंजो, छाळंजो पचच मानजो

    अर्थ असा” की प्रत्येक गोष्ट जाणून घ्या, तिची सत्यता पडताळूण बघा, तिची ओळख करून घ्या , त्याचे मूल्यमापन करा, खरे आणि खोटे याचे परीक्षण करा, परीक्षण करण्याची क्षमता अंगी बाळगा, स्वतःला समजून घ्या आणि मगच त्या विचाराला मान्यता द्या किंवा अंगीकारा. म्हणजे कोणतीही गोष्ट डोळे बंद करून स्विकारू नका.हा अतिशय महत्वाचा व मोलाचा विज्ञानवादी संदेश महाराजांनी दिला,

    तांडा असो किंवा शहरी भाग असो आज आपल्याला नायक, कारभारी, समाजातील पेचप्रसंग सोडवताना दिसतात. आज ही बंजारा समाजात एक “भाषा एक पेहराव” ही संस्कृती टिकून असल्याचे चित्र आपल्याला दिसते. संत सेवालाल महाराज हे पुरोगामी कार्य आणि कृती करणाऱ्यांपैकी एक होते. त्यांच्या काळात शिक्षणाचा अभाव असल्यामुळे, स्त्रिया अंधश्रद्धेला बळी पाडायच्या त्यांनी आपल्या भजनातून, वचनाच्या वाणीतून धार्मिक कर्मकांडात गुंतून राहू नका, पशुबळी देऊ नका ,समाजाचा कष्टाचा पैसा व वेळ वाया जाईल असे कोणतेही कार्य करू नका. देवाला प्राण्यांची बळी देऊ , नका असे सांगताना “किडी मुंगीन साई वेयेस” याचाच अर्थ असा की, भूतलावरील सर्व किडया मुंग्यांना जीवन जगता यावे, भूतलावरील सर्व किडया, मुंग्यानाही जीवन जगण्याचा अधिकार आहे.
    प्राणीमात्रावर प्रेम करणारा हा अहिंसावादी संत.

    संत सेवालाल महाराज यांच्या काळामध्ये ईश्वराला खुश करण्यासाठी पशुबळी ची परंपरा होती. बोकड, पशुबळी ची परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न महाराजांनी केला, त्यासाठीच महाराजांनी गहू गूळ व तूप यांचा शिरा प्रसाद म्हणून वापरला व तो अग्नीला अर्पण करावा, आणि सर्वांना प्रसाद म्हणून वाटावा. अशी परंपराच समाजामध्ये रूढ करण्याचा प्रयत्न संत सेवालाल महाराजांनी केला. याच शिकवणीनुसार आजही बंजारा समाजामध्ये संत सेवालाल महाराज यांना शिर्‍याचा भोग दिला जातो. संत सेवालाल महाराज यांनी समाजातील कुप्रथा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. समाजाला अंधश्रद्धेच्या चाकोरीतून बाहेर काढताना, समाजातील अशिक्षित, सामान्य, कष्टकरी, धर्मभोळेपणा असलेली निरक्षर, व अडाणीलोकांमधील भोळेपणाचा फायदा घेऊन, भ्रम निर्माण देवाचा धाक दाखवून, समाजाला दिशाहीन बनविणार्‍या धार्मिक कर्मकांडाच्या जाळ्यात बंजारा समाज पुरता अडकला होता. यातून समाज बाहेर कसा पडेल यासाठी महाराजांनी प्रयत्न केला. तसे पाहिले तर मुळात गोर समाज, जात, धर्म, आणि दैव,कर्मकांड यापासून हा समाज मुक्त होता.

    प्राचीन काळापासूनच हा समाज आपली वेगळी ओळख घेऊन वावरत आला आहे. तांड्याची संस्कृती ही फार प्राचीन व समृद्ध संस्कृती म्हणून ओळखली जाते. बंजारा ” तांडासंस्कृती “ही विज्ञानवादी, मानवतावादी, समतावादी, व निसर्गपूजक असल्याचे आपल्याला आढळते या समृद्ध संस्कृतीचा वारसा मौखिक बोलीभाषेतून, सेवाभाया च्या वचनाच्या माध्यमातून समाजाला आजही टिकून ठेवणे गरजेचे झाले आहे. बदलत्या काळाच्या ओघात थोड्याफार प्रमाणात बदलाची जवळ तांड्याच्या बंजारा समाजाच्या संस्कृतीलाही झालेली आज पाहायला मिळत आहे.वेगळी परंपरा, वेगळी ओळख, वेगळ्या पेहेराव जसे आटीटोपली,हसलो, भूरिया, घागरो, काचोळी, रप्यारी हार, आणि इतर भाषेपेक्षा वेगळी बोलीभाषा, वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जाणारे वेगवेगळे सण-उत्सव. लग्नाच्या अनोखी पद्धती,यात गायले जाणारे ढावलो सारखा प्रकार, होळी या सणाला अनुसरून निसर्गाला पुरक वापरला जाणारा केसुलाचा रंग, वेगळा नृत्यप्रकार गीताच्या स्वरूपात डफड्याच्या वादनाच्या तालावर ठेका घेणारी लेंगी संस्कृती. काळाच्या ओघात लुप्त होणार नाही यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा.

    नेहमीच बंजारा समाजाने संचित, व समृद्ध, संस्कृतीचे जतन व संवर्धन करून आपले जीवन फुलविले आहे. देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत च्या जडणघडणीत या विस्थापित बंजारा जनसमूहाचे, समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत या उपेक्षित लोक समूहाने कसे जीवन जगावे ? यासाठी समाजाला लढण्याचे व जगण्याचे बळ संत सेवालाल महाराजांनी दिले आहे. संत सेवालाल महाराज यांची आज 283 वी जयंती जगभरात ‘सर्वत्र मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने अख्खा बंजारा समाज व पृथ्वीवरील समग्र मानवजातीकडून या महान संताला विनम्र अभिवादन…!

    -दत्तराव पणतू पवार बंजारा
    नागपूर
    7972428457
Post Views: 35

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *