• Sat. Jun 3rd, 2023

आदिवासींच्या मुक्तीचा विचार पेरणारी कविता : रानफूल !

  स्त्री शिक्षणाची दारे खुली झाल्यापासून अनेक आंबेडकरवादी व परिवर्तनवादी विचारांच्या स्त्रीयांनी साहित्यक्षेत्रात आपल्या लेखनीने ठसा उमटविला आहे. मराठी साहित्यक्षेत्र समृद्ध करण्याकरीता विविध साहित्य प्रवाहातून साहित्य निर्मिती झाली आहे, होत आहे. त्यात महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण संस्कृतीचं प्रतिबिंब आपल्याला बघायला मिळतं. यात आंबेडकरी साहित्यप्रवाह (पुर्वी दलीत साहित्य म्हणून नोंद होती), परिवर्तनवादी साहित्यप्रवाह, स्त्रीवादी साहित्यप्रवाह, ग्रामीण साहित्यप्रवाह, बोलीभाषा साहित्यप्रवाह, जनवादी साहित्यप्रवाह, आदिवासीसाहित्यप्रवाह,सत्यशोधक साहित्य प्रवाह अशा साहित्याच्या अनेक प्रवाहांनी मराठी साहित्यात आपला ठसा उमटविलेला दिसतो. नव्हे मराठी साहित्याला समृद्ध करण्यासाठी मोलाची भूमीका बजावलेली आहे. असं म्हटल्यास वावगं ठरू नये. त्यातीलच आदिवासी साहित्य हा एक महत्वाचा प्रवाह आपली भूमीका ताकदिने मांडत असल्याचे आपणास दिसून येते . यात अनेक साहित्तिकांबरोबरच काही लेखीका व कवयित्री पुढे आल्या आहेत. जशा कवयित्री उषाकिरण आत्राम, कुसूमताई आलाम यांच्याबरोबरच सौ. शीतल ढगे यांचेही नाव घेतले जाते. सौ.शीतल ढगे या यवतमाळ जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रहिवासी असून. ‘मुक्तवीरा’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह असून, समीक्षा पब्लीकेशन,पंढरपूरद्वारा प्रकाशीत ‘रानफूल’ हा त्यांचा दुसरा कवितासंग्रह नुकताच हाती पडला. वाचून आनंद झाला. मोजक्या आदिवासी कवयित्रींमध्ये शीतल ढगे यांच्या नावाची ठळक नोंद झालेली दिसते. शीतल ढगे यांची कविता आदिवासी स्त्रीच्या मनातील सल मांडताना दिसते. कवितेच्या माध्यमातून ती प्रयोगशीलता जोपासन्याचं काम करते. तसेच स्त्रीच्या उत्थानासाठी, शिक्षणासाठी ज्या ज्या महापुरुषांनी कष्ट उपसले त्यांच्या कार्याची दखलही घेताना दिसते. तद्वतच आदिवासींची संस्कृती,जीवन जगणं, त्यांचे वनाविषयीचे प्रेम, आस्था, आपुलकी, जिव्हाळाही अधोरेखीत करते. सुगना मुंडा व करमीहातुचे पुत्र, उलगुलान चळवळीचे प्रणेते, धरती आबा बिरसा मुंडा यांच्या चळवळीचा परामर्शही घेते. तिच्या मते रानफूल हे जंगलातील, डोंगर, द-या-खो-या, टेकड्या, माळरान अशा भागात उगवणारे एक साधारण फूल असून ते ज्याप्रमाणे इतरांच्या तुलनेत दुर्लक्षीत राहिले आहे,त्याचप्रमाणे आदिवासी स्त्रीचं जगणं देखील या रानफुलासम इतर स्त्रीयांच्या तुलनेत कायम उपेक्षीत राहिलं आहे. ‘रानफूल’ म्हणजेच आदिवासी स्रीचं प्रतीक आहे. असं कवयित्रीला वाटतं. म्हणूनच कवयित्री ‘रानफूल’ या कवितेत आदिवासी स्त्रीचं जगणं मांडताना म्हणते …

  “रानफुलाला कुठे ठाऊक
  त्याचा जन्मदिन अन् मरणदिन
  तो उगवतो आडगावच्या शेतशिवारात
  खंडाळ्याच्या घाटात खडकाळ भागात
  त्याला रुजताना अन् निजताना
  नसते अंगाईगीत गोड सोहळे
  रानफुलावर पडते ‘प्रज्ञासूर्य’ किरण
  …..यातूनच जागृत होते मन
  रानफुलाला येत जाते समाजभान
  खडकाळ जमिनीत रुजत जायचं
  विपरीत परिस्थीतीतही त्याला फुलायचं !”
  (‘रानफूल’ पृष्ठ ८०)

  सौ.शीतल ढगे ह्या उच्चविद्याविभूषीत गृहीणी असून त्यांनी तीन विषयात एम. ए. केले असून बी. एड्.ही केले आहे. तद्वतच त्यांचे पी.एच.डी.चे संशोधन कार्यही सुरू आहे. त्या सामाजिक जाणीवेतून आपलं मत मांडताना दिसतात. आदिम जमातीचे लोकांचे कायम वास्तव्य हे निसर्गाच्या सानिध्यात राहिले आहे. जंगलामध्ये डोंगरावर,पाण्याच्या स्त्रोताजवळ,जेथे थोडी सपाट जागा दिसेल तेथे चार -दोन घरांची वस्ती करून राहायचे, ज्याला ‘पाडा’ असेही संबोधतात. पिढ्यान्पिढ्या अज्ञानाच्या काळोखात जगताना कधीच कुणाचा जन्मदिवस व मृत्यूदिवस आठवणीत ठेवण्याची सोय नसल्याने ते साजरे करण्याचा प्रश्नच येत नसल्याचे जळजळीत वास्तव कवयित्री आपल्या शब्दात मांडताना दिसते .पण जेव्हापासून या रानफुलांवर प्रज्ञासूर्याची किरणं पडायला लागली तेव्हापासून मन जागृत होऊन समाजभान येऊ लागलं आहे. ही सांप्रत स्थितीतील बदलत्या जिवनाची स्त्रीविषयक जाणीवही कवयित्री आपल्या शब्दात मांडायला विसरत नाही.

  अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगतानाही आदिम जमातीमध्ये वृक्षप्रेम, पशू- पक्षीप्रेम, निसर्गप्रेम मात्र यत्किंचीतही कमी झाले नाही. हा निसर्गाविषयीचा आदरभाव, जिव्हाळा जन्मताच त्यांच्यात पेरल्या गेलेला आहे. अनेक आदिम जमाती आजही याच अवस्थेत जीवन जगताना दिसतात . तर काहींना ज्ञानाचा प्रकाश शहराकडे घेऊन गेला आहे. परंतु बहुतांश लोक अजूनही शिक्षणापासून व विकासापासून कोसो दूर असल्याचे दिसते. शहरीकरणातील विविध प्रवाहात काही लोक सामील होताना दिसतात. पण आजही तो स्वभावाने लाजराबुजराच जाणवतो, त्याने आता मुख्य प्रवाहात यायला पाहिजे, त्याचं वेगळेपण सिद्ध करून आपले हक्क,अधिकार मिळवून सन्मानाचं जीणं जगायला पाहिजे, किमान भावी पिढीच्या विकासासाठी तरी त्याने शिक्षणाच्या प्रवाहात सामील व्हायला पाहिजे. असे तिला वाटते. म्हणूनच कवयित्री आपल्या समाज बांधवांना आपल्या हक्क व अधिकाराच्या रक्षणासाठी लढ्यात सामील होण्यासाठी ‘मोर्चा’ या रचनेतून सुचवू पाहत असावी.

  “मोर्चात जायचे आहे
  सर्वांना मोर्चात जायचे आहे
  घोषणा द्यायच्या आहे
  जातीत घुसणारे
  डोक्यावर चढणारे
  लबाड लांडग्यांना पळवायचे आहे
  बोगसाची दमदाटी
  गोष्ट नाही साधीसुधी
  पोटावरी पाय द्यायचा नाही
  मोर्चात जायचे आहे ! ” (‘मोर्चा’ पृष्ठ २१)

  अशाप्रकारे समाजबांधवांना सजग करण्याचं काम कवयित्रीची कविता करताना दिसते. हे वास्तव नाकारून चालणार नाही की, आदिमांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन काही लोक बोगस आदिवासी बणून सरकारी योजनांचे फायदे लादताना दिसताहेत. त्यासाठी कवयित्रीला शब्दांचे सुरुंग पेरायचे आहेत ,नवी चेतना जागवायची आहे, वैचारीक अंगार चेतवायची आहे, जीवन भंगार होण्यापासून वाचविण्याकरीता, अंधश्रद्धा मनातून हद्दपार करून विज्ञानवादी विचारांच्या मुळा खोलवर रुजवून एका नव्या विचारांच्या महावृक्षासारखा समाज निर्माण करायचा आहे. येथे कवयित्रीची कविता आपल्या स्वाभिमानासाठी,अस्मितेसाठी व्यवस्थेविरोधात विद्रोह करायला उभी होताना दिसते. ही गौरवाची बाब असून, परिवर्तनाची नांदी वाटते. निसर्गालाच आपलं सर्वस्व माणनारा आदिम माणूस हा सर्व भेदाला छेदून समोर आला आहे. परंतु आपले मनातील वनवासीपण त्याने वजा केले पाहिजे . उलगुलानचा खरा अर्थ जाणून घेऊन मगच स्वतःला बिरसाईत मानले पाहिजे, असे परखड मत व्यक्त करताना दिसते. आणि ही काळाची गरजही असावी. आदिवसींनी कोणत्या भ्रमात न राहता, त्याने आता जागं झालं पाहिजे, ख-या परिवर्तनाची कास धरली पाहिजे, आम्हाला खोटंनाटं सांगून दिशाहीन करणा-यांना आम्ही पारखलं पाहिजे. समाजात अनेक मानवरुपी खेकडे, साप, विंचू, सरड्यांचा सुळसुळाट झाला असल्याची बोचरी टिकाही त्या कवितेतून करताना दिसतात . तद्वतच मुलींना शिक्षणाचा व निडर होण्याचा परखड सल्लाही त्या ‘घुसमट ‘ या रचनेतून देताना दिसतात.

  “टपरीवरल्या कावळ्याले हान
  काढ कानाखाली धुपट
  तवाच खरी थांबेल
  तुया मनाची घुसमट !” (घुसमट पृष्ठ २९)

  सध्या समाजात मुलींवर होत असलेले अन्याय, अत्याचार,बलात्कार, छेळखानी ह्या आता नित्याच्या बातम्या बणल्या आहेत. पोलीस,कायदे,नियम,समाजसेवी संघटना आपलं काम करताहेत पण ते कुठे कुठे पुरणार ? त्याकरीता समाजातील प्रत्येक मुलीने परिस्थितीशी दोन हात करण्याइतपत स्वतःला निडर बणवायला पाहिजे. त्यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण घेऊन स्वतःचे रक्षण स्वतः करण्यासाठी सज्ज असलं पाहिजे, ही काळाची गरज आहे. अलिकडच्या मिडीयावरही ती कोरडे ओढताना दिसते. शेतक-यांच्या वाताहतीला अनेक लोक जबाबदार आहेत. तेवढाच माणसाने विविध प्रदुषण करून पर्यावरणाचे संतुलन बिघडविल्याने निसर्गाचा लहरीपणाही कारणीभूत आहे. आरक्षणाच्या नावाने आजही ब-याच लोकांना मिरच्या लागतात.पण सामाजीक, आर्थीक, राजकीय, शैक्षणीक समता प्रस्थापीत होण्यासाठी वंचित, दुर्बल,शोषीत, मागासलेल्यांना,पिचल्या नडल्या रयतेला आजही आरक्षणाची गरज असल्याची स्पष्ट भूमीका कवयित्रीची कविता घेताना दिसते. मात्र ती या प्रवासात ‘युगप्रवर्तक बाबासाहेबांचे’ बोट धरायला विसरत नाही.

  “दाखविली जगण्याची दिशा
  तिमीरातून नेले तेजाकडे
  असंख्य वेदनाची शमविली निशा
  प्रज्ञासूर्य ज्ञानसागर भारतरत्न
  आमुचा कनवाळू कैवारी
  अख्खी कुळे गेला उजळून !”
  (‘युगप्रवर्तक बाबासाहेब’ पृष्ठ ४९)

  अनेक पिढ्यांच्या मानवी गुलामीच्या बंधनातून मुक्त करणारे महामानव,प्रज्ञासूर्य डाँ. बाबासाहेब आंबेडकर संविधानातून सर्वांना समान हक्क बहाल करतात. तेव्हा ते आमच्यासाठी उजेडाचं झाड ठरतात. त्यांच्यामुळे आमची अख्खी कुळं उजळून निघतात अशी प्रांजळ कबुलीही ही कवयित्री देताना दिसते, हे विशेष. सौ. शीतल ढगेची कविता प्रबोधनकारी आहे,ती परिवर्तशील विचारधारेची पुरस्कर्ती आहे. ती समाजमनाला नवा आयाम देण्याचा प्रयत्न करताना दिसते. प्रश्न विचारते, शंका उपस्थित करते, उपाय सुचविते, समाजबांधवांना सजगतेचा इशारा देते, परिवर्तनाचा खरा इतिहास मांडते ,कष्टक-यांचे, शेतक-यांचे,वंचितांचे, शोषीतांचे, पिडीतांचे, माय-बापांचे, स्त्रीयांचे दुःख, व्यथा,वेदनाही मांडते. अनिष्ठ रुढी परंपरांना झुगारून एखादा विचार विज्ञानाच्या कसोटीवर घासूनच स्विकारावा, आंधळेपणाने त्यावर विश्वास न ठेवता त्याकडे डोळसपणे बघायला शिकलं पाहिजे, या भगवान बुद्धांच्या विज्ञानवादी दृष्टीकोणालाही अप्रत्यक्षपणे स्पर्श करते. एवढच नव्हे तर समाजातील उच्च शिक्षीत, सधन, नोकरदार, गर्भ श्रीमंत ,राजकीय लोकांना समाजाकडे लक्ष देण्याच्या हेतूने ती धारेवर धरताना दिसते …

  “समाजाच्या नावाने शिक्षण घेतले राव
  समाजापुढे तुवा वधारला न भाव
  शहराच्या उजेडापुढे विसरला अंधाराचं गाव
  समाजाचं काय ? मह्या समाजाचं काय ? “
  (मह्या समाजाचं काय ? पृष्ठ ६६ )

  सौ.शीतल ढगे ह्या कवयित्रीच नाही तर त्यांच्यात एक सजग कार्यकर्ताही दडलेला असल्याचे दिसते. असे प्रश्न एक सजग कार्यकर्ताच निडरपणे व्यवस्थेला विचारू शकतो. ही परिस्थिती कमी-अधीक प्रमाणात सर्वच समाजात दिसून येते. शिकून सवरून, नोक-यावर लागून काही लोक मोठे होतात. काळोखातून आलेले तेच लोक उजेडात आल्यावर अंधारात खितपत पडलेल्या आपल्या समाजबांधवांना पद्धतशीरपणे विसरतात. अशा समाजातील उच्चभ्रू लोकांना सौ. शीतल बिनधास्तपणे माझ्या समाजाचं काय ? असा प्रश्न विचारते. सौ.शीतल ढगे यांची कविता परिवर्तनशील चळवळीतील ब-याच उजेडप्रवाही व्यक्तिरेखांच्या कार्याचा मागोवा घेते. जसे उलगुलान चळवळीचे प्रणेते, धरती आबा बिरसा मुंडा, तंट्या भील, बापुजी शेडमाके, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, डाँ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीमाई फुले, माता रमाई, इत्यादी.

  या संग्रहात मुक्तछंद, गेयकवितांबरोबरच अष्टाक्षरी, षडाक्षरी ,अभंग अशा एकून ६३ रचना आहेत . बहुतांश कविता आशयघन आहेत. जशा ‘कविता ‘, सावित्री माय, शिवकाव्य,बिरसा मुंडा, मोर्चा, विचारांचा स्फोट, बिरसाईत, खेकडा, डाँ.पायल तडवी, उतरंड, स्त्री शक्तीचा जागर, कास्तकार, मानवाचा खरा मित्र विज्ञानच, इचूकाटा, अलप, जागे व्हा, जोतिबांची शिदोरी, युगप्रवर्तक बाबासाहेब, कुछ तो गडबड है, मायबाप, मह्या समाजाचे काय ? , शोषिक, संविधान, सावधान आता, माता रमाई, या काही काव्यरचना लक्षवेधी वाटतात . यातील पंधरा रचना स्त्री जिवनावर आधारीत आहेत . ब-याच रचना उजेडप्रवाही आहेत . सत्यशोधक आशय मांडणा-या आहेत . काही संयंत भावाच्या, काही विद्रोही स्वरुपाच्या तर काही व्यक्तिरेखांच्या वर्णनात्मक स्वरुपाच्या आहेत . समीक्षा पब्लिकेशनने प्रकाशीत केलेल्या या पुस्तकाचं मुखपृष्ठ संतोष घोंगडे यांनी आकर्षक केलं आहे. सर्वच क्षेत्रात काम करणा-या समस्त महिलांना समर्पीत केलेल्या या कवितासंग्रहाची प्रस्तावना डाँ. सखाराम डाखोरे, वसई यांनी सर्वसमावेशक लिहीलेली आहे. ते आपल्या प्रस्तावनेत कवितासंग्रहाविषयी आपले मत नोंदवितांना म्हणतात …” सौ.शीतल ढगे यांच्या कविता आदिवासी समाज, संस्कृती आणि साहित्यप्रवाहाला समृद्ध करणा-या ,स्त्री दुःखाला वाचा फोडणा-या आणि निसर्गधर्माची नव्याने मांडणी करणा-या आदिवासी प्रवाहातील महत्वाच्या कविता आहेत.”

  सौ. शीतल ढगे यांच्या ‘रानफूल ‘ या कवितासंग्रहाची वाटचाल योग्य दिशेने होतांना दिसते. तिची कविता फुले,शाहू, आंबेडकरी विचारांचे बोट धरून योग्य ट्रँकवरून पुढील इच्छित प्रवासाला निघालेली दिसते. परिवर्तनशील विचारधारेच्या शब्दरुपी प्रहाराने आदिवासी बांधवांना या जंजाळातून मुक्त करण्यासाठी धडपडणारी तिची कविता आहे. ती आपल्या बांधवांना उजेडप्रवाही व्हायला सुचविते आहे. शिक्षणात नवसमाज घडविण्याची ताकद असल्याचे विशद करून आदिवासींनी त्याची कास धरून आपला लढा उभारून आपले हक्क हिसकाऊन घ्यायला शिकलं पाहिजे, जोपर्यंत आपण संविधान मूल्यांवर आधारीत जिवन जगायला सुरुवात करणार नाही,तोपर्यंत आमचा व आमच्या भावी पिढ्यांचा सर्वांगीण विकास होणार नाही, असं तिला वाटतय. त्यांनी पुढील साहित्यकृतीत आदिवासी संस्कृतीच्या सुक्ष्म व लक्षवेधी खाणाखुणा दिसतील, असा प्रयत्न जरूर करावा. शक्य झाल्यास आदिवासींच्या विविध बोलीतील काही प्रातिनिधीक स्वरूपाच्या रचनांचाही समावेश परिशिष्टात शब्दार्थ देऊन करायला हरकत नाही. एकूणच सर्व बाबतीत हा संग्रह दखल घेण्यासारखा आहे. आपल्या कवितेतून योग्य व हितकारी विचार वाचकबांधवापर्यंत पोहचविण्याच्या या धाडसबद्दल कवयित्री सौ.शीतल राजेश ढगे यांचे कौतुक व अभिनंदन करायला हरकत नाही. पुढील साहित्यकृतीस हार्दिक शुभेच्छा !

  ◾️अरुण हरिभाऊ विघ्ने
  मु.पो. रोहणा,
  त. आर्वी, जि. वर्धा
  ◾️कवितासंग्रह : ‘रानफूल’
  ◾️कवयित्रीचे नाव : सौ.शीतल रा. ढगे
  ◾️प्रकाशन : समीक्षा पब्लिकेशन,पंढरपूर
  ◾️पृष्ठसंख्या : ८०
  ◾️मूल्य : १२०/-₹

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *