नाशिक : पदमगंधा प्रतिष्ठान, नागपूर यांचे राज्य साहित्य पुरस्कार (२०२१) नुकतेच जाहीर करण्यात आले. त्यात नाशिक येथील साहित्यिक, वक्ता, एकपात्री कलाकार डॉ. प्रतिभा जाधव यांच्या ‘अस्वस्थतेची डायरी’ ह्या वैचारिक लेख संग्रहास विजया बोबडे वैचारिक साहित्य राज्य पुरस्कार २०२१ जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
‘अस्वस्थतेची डायरी’ ह्या लेखसंग्रहास अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ख्यातनाम साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांनी दीर्घ प्रस्तावना लाभली असून ‘बहुसांस्कृतिकतेचे मूल्यभान असणारी साहित्यकृती’ अशा शब्दात डॉ.सबनीस यांनी ‘अस्वस्थतेची डायरी’ चा उल्लेख केलेला आहे. डॉ.जाधव विविध वृत्तपत्रांत व नियतकालिकांत स्तंभलेखन करत आहेत. त्यांचा एक स्वतंत्र चाहता, वाचक वर्ग आहे. सांप्रतकाळातील घडामोडींवर वैचारिक अंगाने आपल्या परखड शैलीत त्या सतत लेखन करत असतात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कुसुमाग्रज अध्यासनाच्या सल्लागार सल्लागार समितीत त्या नियुक्त आहेत.
डॉ. प्रतिभा जाधव यांची ललित, नाट्य, काव्य या साहित्य प्रकारांत ६ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत व तीन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. यापूर्वीही त्यांना सामाजिक,साहित्यिक, सांस्कृतिक व शैक्षणिक योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.