Header Ads Widget

सार्वजनिक क्षेत्रातील बँका भांडवली दृष्टीने सक्षम

  नवी दिल्ली : केंद्रीय अर्थ आणि कॉपोर्रेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांसोबत नवी दिल्ली इथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक घेण्यात आली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड, आणि वित्तीय सेवा विभगाचे सचिव देबाशीष पांडा यांच्यासह या विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

  केंद्र सरकार आणि भारतीय रिर्जव बँकेने कोरोना महामारीशी संबंधित उपाययोजनांची घोषणा केली होती, या उपाययोजनांची अंमलबजावणी सार्वजनिक बँकानी कशी केली, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. त्याशिवाय, सध्या असलेल्या कोविड महामारीच्या नव्या लाटेमुळे भविष्यात येऊ शकणार्‍या संकटांचा सामना करण्याची सज्जता, यावरही यावेळी चर्चा झाली.

  आपत्कालीन पत-हमी योजना- ईकीएलजीएस च्या यशाबद्दल आनंद व्यक्त करतांनाच अर्थमंत्री म्हणाल्या की अद्याप आपल्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करण्याची वेळ आलेली नाही.आपल्या एकत्रित प्रयत्नांतून आपल्याला कोविड महामारीचा अजूनही फटका बसत असलेल्या क्षेत्रांना आधार देण्याची गरज आहे. कृषीक्षेत्र, शेतकरी, किरकोळ वस्तू व्यापार तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रांना मदत करणे सुरूच ठेवावे, अशी सूचनाही,सीतारामन यांनी बँक प्रमुखांना केली.

  जगभरात ओमायक्रॉनचा वाढता प्रसार आणि जागतिक स्तरावरील घडामोडी यामुळे, वारे उलट्या दिशेने वाहत असले तरीही, देशात व्यवसायाबाबतच्या दृष्टिकोनात प्रगती होत आहे, असे सीतारामन यांनी नमूद केले. संपर्क क्षेत्राशी संबंधित उद्योग व्यवसायांना या महामारीच्या काळात अधिक आधार देण्याची गरज आहे, असेही सीतारामन यावेळी म्हणाल्या.

  पतविषयक मागणीच्या बाबतीत बोलतांना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, किरकोळ क्षेत्रात होत असलेली वृद्धी, एकूणच समग्र अर्थव्यवस्थेत असलेल्या प्रगतीच्या संधी आणि कर्जदारांच्या आर्थिक क्षमतेत झालेली सुधारणा, यामुळे येत्या काळात कजार्ची मागणी वाढू शकेल. देशातील कर्ज परतफेडीच्या संस्कृतीत सुधारणा झालेली आहे, असे निरीक्षण बँकप्रमुखांनी या आढावा बैठकीत नोंदवले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकानी उत्तम कामगिरी केली आहे, तसेच, महामारीमुळे आलेल्या आर्थिक संकटातून देशाच्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी, आवश्यक ती उभारी दिली असल्याचे, या आढावा बैठकीत सांगण्यात आले.

  कोविड-१९ महामारीच्या सुरुवातीपासून देशाला विलक्षण पाठिंबा दिल्याबद्दल अर्थमंत्र्यांनी बँकर्सचे आभार मानले. यशाचे श्रेय त्यांनी बँकिंग समुदायाच्या सामूहिक प्रयत्नांना दिले. सीतारामन यांनी बँकिंग समुदायाला आवाहन केले की त्यांनी त्यांचे कर्मचारी आणि कुटुंबांच्या सुरक्षिततेसाठी कोविड-१९ योग्य वर्तन ठेवावे आणि प्रत्येकाने लसीकरण केले आहे याची खात्री करावी.

  बँकर्सना संबोधित करताना केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड म्हणाले की सार्वजनिक क्षेत्रातील बँका या आपल्या अर्थव्यवस्थेचे पॉवर इंजिन आहेत आणि महामारीच्या काळात बँकर्सच्या कामगिरीबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. डॉ. कराड म्हणाले की, काळासोबत बँकिंग हे अधिक खुले आणि ग्राहक केंद्रित झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या