अमरावती : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ येथे बुधवार, दि. 26 जानेवारीला सकाळी 9.15 वाजता जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर विभागीय क्रीडा संकुल येथे होणार आहे. याप्रसंगी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.
कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर कोविड नियमांचे पालन करीत मर्यादित अर्थात केवळ 50 व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. सोहळ्याच्या अनुषंगाने आवश्यक तयारी पूर्ण झाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते सकाळी 8. 10 वाजता ध्वजारोहण होणार आहे.
शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, या दिवशी सकाळी साडेआठ ते दहा या दरम्यान ध्वजारोहणाचा अन्य कोणताही शासकीय अथवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. अशा ठिकाणी हे कार्यक्रम सकाळी साडेआठ वा. पूर्वी किंवा दहा वा. नंतर आयोजित करावे,असे परिपत्रकान्वये स्पष्ट करण्यात आले आहे.
कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे मुख्य ध्वजारोहण समारंभ केवळ 50 व्यक्तींच्या उपस्थितीत होईल. नागरिकांनीही गर्दी टाळावी. त्याचप्रमाणे, सर्व प्रतिबंधक नियमांचे पालन करावे. संस्थांनी व कार्यालयांनी ऑनलाईन कार्यक्रमांवर भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या