Header Ads Widget

राष्ट्रमाता जिजाऊ गौरव गाथेतील काव्यातून माँसाहेब जिजाऊंचे घडणारे अनोखे दर्शन

  दि.१२ जानेवारी ,२०२२ ला असलेल्या राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त कवी व लेखक प्रा. अरुण बुंदेले यांचा "राष्ट्रमाता जिजाऊ गौरव गाथेतील काव्यातून माँसाहेब जिजाऊंचे घडणारे अनोखे दर्शन" हा कवी व लेखक प्रा.उद्धव कोळपे यांच्या काव्यग्रंथावरील समीक्षणात्मक लेख वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

- संपादक
  ________________________

  स्वराज्याचा राज्यकारभार समर्थपणे व आत्मविश्वासाने सांभाळणाऱ्या राष्ट्रमाता,हिंदवी स्वराज्यामध्ये शिवरायांसारखा युगपुरुष निर्माण करुन एका नव्या युगाची निर्मिती करणाऱ्या युगमाता, लाव्हारसाचे अलंकार धारण करणाऱ्या विरमाता, रयतेला संकटातून मुक्त करणाऱ्या प्रजाहितदक्ष राजमाता माँसाहेब जिजाऊंना जयंतीनिमित्त विनम्र वंदन.

  "राष्ट्रमाता जिजाऊ गौरव गाथा" हा सुप्रसिद्ध कवी व लेखक प्रा.उद्धव हरिभाऊ कोळपे यांचा काव्यग्रंथ वाचण्यात आला. प्रा.डाँ.नरेशचंद्र काठोळे (संचालक,डाँ.पंजाबराव देशमुख आय. ए.एस अकादमी,अमरावती.) यांनी प्रकाशित केलेल्या या काव्यग्रंथात राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जीवनकार्याची गौरवगाथा एकूण ६४ कवितेतून रेखाटलेली आहे. "विश्ववंद्य जिजाऊ चरित्र" या ग्रंथाचे लेखक प्रा.उद्धव कोळपे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ गौरव गाथेत माँसाहेब जिजाऊंच्या जन्मापासून तर निर्वाणापर्यंतचा जीवनप्रवास या गौरव गाथेत काव्यरुपात चित्रीत केलेला आहे .स्फूर्ती,चेतना,प्रेरणा व मायेचा अखंड झरा म्हणजे माँसाहेब जिजाऊ असल्याचे अनेक कवितेतून रसयुक्त, काव्यगुणयुक्त आणि प्रासादिक भाषेत वर्णिले आहे.

  "राष्ट्रमाता जिजाऊ गौरव गाथा" या काव्यग्रंथाची प्रस्तावना कविवर्य जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेली असूनते प्रास्तावनेत म्हणतात की,"काव्यरुपातील हे जिजाऊंचे स्फुर्तीगान सर्वांना प्रेरणादायी ठरावे,असे हे साहित्यिक स्वरुपाचे राष्ट्र कार्यच प्रा.कोळपे यांनी केले आहे." राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथील मा.उपप्राचार्य कवी व लेखक प्रा.उद्धव कोळपे यांनी "जिजाऊं सागरातील विचारधन"या मथळ्याखाली आपल्या मनोगतात , जिजाऊ माँसाहेबांच्या कार्यकर्तृत्वाची काव्यात्म अोळख करुन देण्याचा हा प्रांजळ प्रयत्न असल्याचे सांगितले आहे." राष्ट्रमाता जिजाऊ गौरव गाथा" या काव्यग्रंथाचा ओनामा 'युगांतर 'या कवितेने केलेला आहे. राजमाता जिजाऊंच्या पुण्याईने येथे युगांतर कसे घडले, हे सांगताना कवी प्रा.कोळपे म्हणतात की,

  "बाळ शिवबा तुझे लेकरू।
  वाढवलेस कुशीत माई॥
  घडले युगांतर या भूमित।
  तुझीच ती पुण्याई ॥

  'धन्य धन्य जिजाऊ ' या कवितेत सिंदखेड भूमितील जन्मकहाणी अतिशय मोजक्या व सुबोध शब्दात वर्णिली आहे.ते म्हणतात की,

  लख लख करत।
  काळोख चिरत।
  अवतरली विद्युल्लता॥

  राष्ट्रमाता जिजाऊंच्या नजरेत हिऱ्याचे तेज ,ह्रदयात माया अाणि मनात समतेचा विचार असल्याचे "वंदन तुजला हे जिजाऊ"या वंदनगीतात लालित्यपूर्ण व यमक अलंकारयुक्त भाषेत सांगितले आहे.कवी म्हणतात की,

  "तेज हिऱ्याचे तुझ्या नजरेत।
  सत्व मायेचे तुझ्या ह्रदयात॥
  आकाश निळे तुझ्या अंगणात।
  हे जिजाऊ शिवराय माते॥

  समतेवर आधारित स्वराज्यात कोणताही भेदभाव न करता न्यायदान होत असे, हे कवीला येथे सांगायचे आहे. मुलखावेगळ्या छत्रपतीला घडविण्याचे कार्य माँसाहेब जिजाऊंनी स्वत:च्या शिकवणीतून केले. हे सांगताना कवी म्हणतात की,

  "होती शिकवण माय
  जिजाऊंची।
  प्रेरणा अनमोल भारतीय संस्कृतीची।
  घडला इतिहास इथे आगळा।
  छत्रपती झाला मुलखावेगळा॥

  माँसाहेब जिजाऊमुळे स्वराज्याच्या संग्राम गाथा कशा अमर झाल्या हे 'पुन्हा पेटू दे राण सारे' या कवितेत कविने सांगितले आहे. ते म्हणतात की,

  स्पर्श तुझ्या चरणाचा होता।
  फुरफुरला तो रायगड माथा॥
  मिटवून साऱ्या मरण गाथा।
  अमर झाली संग्राम गाथा॥

  दंभ,अहंकार,व्यसन,कर्जबाजारीपणा, मत्सर, द्वेष, आळस यामध्ये बुडालेल्या समाजाला वाचवायचे असेल तर माँसाहेब जिजाऊंची शिकवण आचरणात आणा,असा उपदेश 'वारसा शिवरायाचा' या कवितेत केलेला.रयतेवरील संकटाचे निवारण करणाऱ्या जिजाऊंचे जनकल्याणकारी चित्र ' जिजाऊ सौदामिनी' या कवितेत रेखाटले आहे. कवी प्रा.कोळपे यांनी माँसाहेब जिजाऊला स्वराज्याचा दीपस्तंभ संबोधून वंदन केलेले आहे ते म्हणतात की,

  वंदन तुजला हे राजमाता।
  तूच आमुची राष्ट्रमाता।
  विनम्रभावे करतो मुजरा।
  मानून तुला विश्वमाता।
  तू संस्कृती या महाराष्ट्राची।
  तूच दीपस्तंभ स्वराज्याची।

  या काव्यग्रंथात कवी प्रा.कोळपे यांनी अगम्य जिजाऊ,आधार जनांचा तू जिजाऊ,धन्य झाल्या माय जिजाऊ,थोर माता शिवरायांची, आरती जिजाऊ मातेची,वंदू जिजाऊला,जिजाऊ थोर, माय जिजाऊ,आठवण जिजाऊंची ,गीत स्वराज्याचे,तुझिया चिंतनाने, संस्कार जिजाऊंचे,संदेश जिजाऊंचा,झाल्या अमर जिजाऊ अशा अनेक कवितेतून राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंची थोरवी सुबोध, प्रासादिक,यमक अलंकारयुक्त भाषेत वर्णिली आहे.'झाल्या अमर जिजाऊ ' या कवितेने माँसाहेब जिजाऊंच्या या काव्यरुपी गौरवगाथेचा शेवट चेतनगुणोक्ती अलंकारयुक्त भाषेत केलेला आहे.या कवितेत कवी म्हणतात की,

  चांदण्याही खूप रडल्या,
  माय जिजाऊ सोडून जाता॥
  थरथरले सारे नभोमंडळ,
  खचल्या रांगा सह्याद्रीच्या॥
  बुडाला रायगड शोक सागरात,
  उठले हुंकार दऱ्या खोऱ्यात॥

  अशी माँसाहेब जिजाऊंच्या निर्वाणामुळे झालेल्या करुण परिस्थितीचे चित्र कवीने येथे करूणरसयुक्त भाषेत रेखाटले आहे.ही कविता वाचताना वाचकांच्या नयनातून अश्रु बाहेर पडून ते माँसाहेब जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होतात,अशा मनाला स्पर्शून जाणाऱ्या काव्यरचना या काव्यग्रंथात वाचकांना वाचायला मिळतात.विश्ववंद्य जिजाऊ, वक्तृत्व एक साधना,देहबोली,मुलाखत तंत्र व साधना इत्यादी पुस्तकाचे लेखक,राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा.उद्धव हरिभाऊ कोळपे यांनी दीर्घ व्यासंगातून जिजाऊंच्या बालपणापासून ते निर्वाणापर्यंतचा प्रेरणादायी जीवनप्रवास या गौरव गाथेत अलंकारयुक्त,लालित्यपूर्ण,रसयुक्त, काव्यगुणयुक्त,प्रासादिक भाषेतून केल्यामुळे तो वाचकांच्या मनापर्यंत पोहोचतो. कवी प्रा. कोळपे सरांना पुढील साहित्य प्रवासासाठी, निरोगी आणि उदंड आयुष्यासाठी मनस्वी शुभेच्छा !

  समीक्षक,कवी,लेखक
  -प्रा.अरुण बाबारावजी बु्ंदेले,
  रुक्मिणी नगर, अमरावती.
  भ्र.ध्व.८०८७७४८६०९.
  पुस्तकाचे नाव : राष्ट्रमाता जिजाऊ गौरव गाथा
  लेखकाचे नाव : प्रा.उद्धव हरिभाऊकोळपे.
  प्रकाशक : प्रा.डाँ.नरेशचंद्र काठोळे
   पृष्ठसंख्या : १००/-
   मूल्य :- १०० ₹

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या