सरतेशेवटी २०२१ वर्ष संपत आलं आहे.अनेक आव्हानांचा सामना आपण सर्वांनी २०२१केला.अनेक संकटे,आव्हाने आपण २०२१ मध्ये बघितली.कोरोना व कोरोनाची नवं नवं स्वरूप आपण सर्वांनी अनुभवल.अनेक मित्र, मैत्रिणी,आप्त, कोरोनामुळे आपल्या पासून खूप दूर गेलेत. नैसर्गिक संकटे आलीत.नैसर्गिक संकटात शेतीचे होते नव्हते झाले.या सर्व आव्हानांचा सामना करत आपण नवं वर्षात पदार्पण करत आहोत एक दोन दिवसात नववर्षाला प्रारंभ होईल. गेल्या वर्षांत काही स्वप्न अर्धवट राहिलेले स्वप्न यंदाच्या वर्षांत पूर्ण करावयाचेआहे. आरोग्यावर लक्ष केंद्रित करावयाचे आहे. सामाजिक बांधिलकी जपायची आहे. समाजात चुकीच्या ज्या गोष्टी होत आहेत त्याच्याविरुद्ध एकवटायचे आहे.अधिकारांचा उपभोग घेताना कर्तव्याचे पालन करायचे आहे.समाजहित व देशाचं हित जपायचं व त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचा संकल्प या नवं वर्षात आपण करू या..नवे विचार आणि नवे संकल्प घेऊन नव्या वर्षाचं स्वागत करू या..
स्वतःचा व स्वतःच्या आरोग्याची काळजी घेताना इतरांची देखील काळजी घ्यायची आहे.सर्वात मोठे आव्हान आपल्या समोर कोरोनाने आहे.ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा प्रकार एक संकट म्हणून आपल्या समोर उभा ठाकला आहे.हा तीव्र नसला तरी हळूहळू तो सर्वव्यापी होत आहे.ओमीक्रॉंनचे संकट घोंघावत असल्याने त्याला रोखण्यासाठी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे.त्याला रोखण्यासाठी मास्कचा वापर आवश्यक आहे.मात्र मास्कचा वापर होत नसल्याचे सर्वत्र दृश्य बघायला मिळत आहे.एक फॅशन म्हणून आज काही लोकरंगीबेरंगी मास्क लावत आहे.कापडी मास्क दिखाव्यासाठी असून ते विषाणू रोखू शकणार नाही.या पार्श्वभूमीवर त्यासाठी सर्वांनी सर्जिकल मास्कचा वापर करायला पाहिजे.नवं वर्षात या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी मिळून सर्जिकल मास्क वापरण्याचा,कोरोना नियमांचे पालन करण्याचा व इतरांना देखील याबाबतीत मार्गदर्शन करण्याचा संकल्प व प्रत्यक्ष कृती करायची आहे.
नवं वर्षाचं स्वागत करताना सर्वांनीच संकल्प करायला हवा, तो दुस-यांच्या जीवनात आनंदाचे मळे फुलविण्याचा. स्वत:पुरतंच पाहण्याची वृत्ती सोडण्याचा आणि अधिक व्यापक अवकाशाची ओळख करून घेण्याचा…आपल्या आयुष्याच्या वाटचालीत साथ-सोबत करणारे सगेसोयरे, आप्तस्वकीय, आपल्याशी प्रत्यक्ष संबंध आला नसला तरी ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाने, कार्यकर्तृत्वाने आपल्याला प्रभावित केलेले असते असे अनेकजण हे जग सोडून गेलेले असतात. नव्या वर्षात त्यांची सोबत नसणार, ही अपरिहार्यता स्वीकारणे आपल्याला जड जाते. पण वास्तवाला सामोरे जावेच लागते. कोव्हिडं-१९ च्या जागतिक समस्येदरम्यान समाजाबद्दल आपल्या जाणीवा अधिक व्यापक करून संकुचितपणा आपण सर्वांनी त्यागला पाहिजे.अलीकडे संकुचितता म्हटले की ती क्षेत्रीय,धार्मिक, जातीय,व लिंगसापेक्ष परिघात फिरत राहते...जग या पलीकडे देखील आहे..त्या पलीकडे जाता येते..याचा आपण विचार करायला पाहिजे.मात्र होतो काय आपण संकुचिततेच्या कुंपणापकीकडे जातंच नाही.आपण विशिष्ट जातीच्या व धर्माच्या परिघातच स्वतःला कोंडून घेतलं आहे.यामुळेच साहजिकच आपण समाजाचा व देशाचा विचार न करता केवळ संकुचित व भावनिक मुद्द्यांना खतपाणी घालत असतो.. परिणामतः यातून समाजात व देशात दुफळी निर्माण होऊन समाज स्वास्थ्य खराब होत असतें.अलीकडे या संकुचित घटनांनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढत असल्याने सामाजिक व राष्ट्रीय ऐक्य धोक्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी संकुचित व भावनिक मुद्द्यांना स्पर्श न करता समाजाचा व देशाच्या ऐक्याचा विचार करण्याचा संकल्प करायचा आहे.... इतर कोणत्याही संकल्पनेपेक्षा हा संकल्प अति महत्वाचा आहे.
अडीअडचणीच्या काळात माणसाने माणसाला मदत करणे हीच खरी माणूसकी आहे. आज सारे जग कोरोनाच्या संकटाने वेढलेले असताना, अनेकजण आपापल्या पद्धतीने मदत करताना दिसताहेत. काहीजण व्यक्तिगत स्तरावर, तर काहीजण समूह म्हणून या मदतकार्यात उतरले आहेत. पण अशी ही मदत सुटीसुटी न राहता, जेव्हा व्यवस्थेशी जोडली जाते तेव्हा तिचा परिणाम अधिक दुणावतो. आज आपल्याकडे अशा व्यवस्थेला जोडलेल्या मदतीची कमतरता दिसते. त्यामुळे अनेकदा ज्यांना खरंच गरज आहे ते मदतीपासून वंचित राहतात. आपल्या देशात मदत ही बऱ्याचदा आपत्कालीन परिस्थितीत करण्याची गोष्ट आहे. एखादी युद्धजन्य परिस्थिती उद्भवली किंवा नैसर्गिक आपत्ती ओढवली, तरच आपला देश एकत्रित उभा ठाकतो, असे आजपर्यंत दिसून आलेले आहे. एक समाज म्हणून परस्परांना मदत करण्यासाठी एकत्र येऊन व्यवस्थेला मदत करणे आपल्याकडे फारसे आढळत नाही. आज कोरोनाने आपण परस्परांशी किती जोडलेले आहोत, हे लख्खपणे अधोरेखित केले आहे. त्यामुळे किमान आता तरी तरी स्वतःच्या पलिकडे जाऊन विचार करायला हवा. त्यासाठी आपल्या मनावर आणि मदतीवर चढलेली संकुचिततेची पुटे गळून जायला हवीत. खरंतर, एक समाज म्हणून आपण परस्परांसाठी आपण काय करतो, यावरून आपल्या समाजाची प्रगती ठरत असते. दुर्दैवाने या गोष्टी आपल्या देशात होत नाही.हीच फार मोठी शोकांतिका आहे.
आपण भारत देशाचे एक जबाबदार नागरिक आहोत.ही जाणीव आपल्या सर्वांमध्ये सर्वप्रथम निर्माण होणे आवश्यक आहे.. तेव्हा कोणतेही कार्य करताना अधिक जबाबदारीने वागणे करणे हे आमचे कर्तव्य आहे.मात्र आम्ही कर्तव्य विसरतो,मागणी करतो अधिकाराची.अधिकाराची मागणी करताना अधिकारा सोबत कर्तव्य देखील असतात,याचा आम्हाला विसर पडतो.दैनिक जीवन जगत असताना सदोदित व पदोपदी याचा अनुभन आम्ही प्रत्येकजण घेत असतो.शाळा,कॉलेज कार्यालयात आपण नेहमीच जात असतो.या ठिकाणी अणेकजन आपले कर्तव्य करताना चालढकल करत असल्याचा अनुभव आपण अनेकदा घेतलेला आहे.एखादया कार्यालयात पाच ते सहा वेळा गेल्यावरसुद्धा आपले काम होत नसते.संबंधित अधिकारी,कारकून एक तर जागेवर नसतात,असले तर त्यांची काम करण्याची वृत्ती नसते.मोबदल्यात आपल्याला काही तरी मिळाव,ही अपेक्षा देखिल त्यांच्या ठायी निर्माण झाल्याचा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला सेलच.
भारतीय घटनेने प्रत्येक भारतीयाला जसे अधिकार दिले आहेत, तशीच काही कर्तव्येसुद्धा दिली आहेत. बऱ्याच वेळेला या कर्तव्यांकडे नागरिक दुर्लक्ष करतात. सार्वजनिक मालमत्ता ही आपली आहे, तिची जपणूक करणे हीसुद्धा आपलीच जबाबदारी आहे, याचा नागरिकांना सपशेल विसर पडतो. परिसर स्वच्छ ठेवणे हीदेखील आपली जबाबदारी आहे. पण, कचरा सर्रास रस्त्यावर, स्टेशनवर आपण टाकतो. पान खाऊन चहूकडे थुंकणे तर काहींचा जणू छंदच... आपण इतके बेजबाबदार आहोत की, काही झाले की लगेच या सगळ्यांसाठी राजकीय नेतेच जबाबदार आहेत, असे म्हणून त्यातून अंग काढण्याचा प्रयत्न करतो. राजकारण्यांना प्रश्न विचारण्यापूर्वी प्रत्येक नागरिकाने आत्मपरीक्षण करण्याची आज खरी गरज आहे. नाले, गटार हे सांडपाणी वाहून नेण्यासाठी असतात, कचरा टाकण्यासाठी नाही. तरीही नाल्यांना डम्पिंग ग्राऊंडचे रूप आलेले दिसते. ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा टाकावा, अशा सूचना वारंवार पालिकेकडून दिल्या जातात. तरीही हा नियम लोकांनी अक्षरश: पायदळी तुडवला. वाहतुकीचे नियम जितके आपल्याकडे मोडले जात असतील, तितके क्वचितच इतरत्र मोडले जात असतील. अस्ताव्यस्त पार्किंग करणे, ओव्हरटेक करणे या गोष्टी अगदी छातीठोकपणे आपल्याकडे केल्या जातात. नियम मोडण्यात सुशिक्षित-अशिक्षित दोघेही आघाडीवर. शिकून माणूस सुशिक्षित होतो, पण सुसंस्कृत होत नाही. त्यामुळे नियम पाळण्यासाठी गरज कडक कायद्याची नाही, तर गरज आहे सद्सद्विवेकबुद्धीची. पालकांनी नियम पाळण्याची आणि मुलांवर उत्तम नागरी संस्कार करण्याची.नवं वर्षात सामाजिक व देशहिताचा विचार करण्याचा व प्रत्यक्ष कृती करण्याचा संकल्प करू या.
वाढती जीवघेणी स्पर्धा आणि जागतिकीकरणामध्ये प्रत्येक माणूस पैश्याच्या पाठीमागे धावत चाललेला आहे त्यामुळे स्वताच्या सुखासोबतच तो मर्यादित राहिलेला आहे. दुसऱ्याच्या सुखदुःखाशी त्याचा संबंध उरलेला नाही. घरातील संवादाबरोबर समाजातील लोकांचाही एकमेकांशी संवाद हरवत चाललेला आहे त्यामुळे भविष्यातील विघातक परिस्थितीकडे आपण आपोआपच ओढले जात आहोत हे रोखण्यासाठीच चला टी. व्ही. ला आणि मोबाईलला बाजूला ठेवून आपापसातील संवाद वाढविण्याचा संकल्प करूया. गोर- गरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर हसू खुलवण्याचा संकल्प करूया, संकल्प करूया दिन - दुबळ्या जनतेला नवी प्रेरणा देण्याचा अंध- अपंग, रंजल्या गांजल्यांमध्ये स्फुरण चेतवण्याचा संकल्प करूया, संकल्प करूया माणुसकीची मशाल धगधगत ठेवण्याचा अन प्रेमाची बरसात करण्याचा. चला तर मग नवे विचार आणि नवे संकल्प घेऊन नव्या वर्षाचं स्वागत करूया.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या