जळगाव : जामनेर येथील शिक्षक कॉलनी मध्ये राहत असलेल्या मनिषा सपकाळे हिला तीचा पती अनिल सपकाळे हा जखमी करून पळून गेला होता. उपचारा दरम्यान मनीषा हिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलानी यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
जामनेर येथील शिक्षक कॉलनीत राहत असलेले अनिल सपकाळे व त्यांची पत्नी मनीषा सपकाळे हे ३ फेब्रुवारी २0१९ रोजी दुपारी एक वाजून ३0 मिनिटांनी शिक्षक कॉलनीतील बोळीमध्ये लोकांचा ओरडण्याचा आवाज आल्याने मृत मनीषा हिच्या आई प्रभाबाई निना कोळी या काय झाले हे पाहण्यासाठी गेल्या. यावेळी प्रकाश शेनफडू मुळे यांच्या घरासमोर जावई अनिल चावदस सपकाळे हातातील काहीतरी हत्यार घेऊन पळतांना दिसला. मनिषा ही जमिनीवर पडलेली होती. तिच्या डोक्यातून रक्त येत होते. तिच्या डोक्याला मोठी जखम झाली होती. तिला जामनेर येथील सुविधा हॉस्पीटल तेथून सरकारी हॉस्पीटल जामनेर व तेथून जळगांव येथील दवाखान्यात उपचाराकरिता दाखल केले.
उपचार सुरू असताना मनीषाचा मृत्यू झाला. याप्रकरणी जामनेर पोलिसात ३0२चा गुन्हा नोंद झाला होता. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालय, जळगांव येथे सुनावणीमध्ये १५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आल्या. यात केसमध्ये मृत मुलीची आई , प्रत्यक्षदश्री स्वतंत्र साक्षीदार प्रविण टहाकळे, सुजाता भिवसने, मृताच्या बहिणीचा मुलगा जयेश तायडे, डॉ. हर्षल चांदा, डॉ. निलेश देवराज, पंच किशोर तेली, गणेश इंगळे, फोटोग्राफर नितेश पाटील आणि तपासअधिकारी पो.नि.प्रताप इंगळे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. कोर्टासमोर आणलेला पूरावा ग्राहय धरुन कोर्टाने आरोपीस दोषी धरुन जन्मठेप व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कारावास अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील प्रदिप एम. महाजन तर खटल्याचे कामी केस वॉच पो.कॉ.सोनासिंग डोभाळ जामनेर पो.स्टे. आणि कोर्ट पैरवी पो.हे.कॉ.राजेंद्र सैदाणे यांनी मदत केली.
0 टिप्पण्या