कवयित्री सौ. माधुरी काकडे यांनी संपादित केलेल्या मधुसिंधू या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात महाराष्ट्र, बंगलोर, गोवा व इतर ठिकाणाच्या ३५ कवयित्रींच्या ३५० कवितांचा काव्यसंग्रह अभ्यासताना छोट्याशा रचनेत आशय मोठा असल्याचे लक्षात घेता येते. प्रेम, जिव्हाळा, स्नेह, आपुलकी या गुणांनी युक्त असलेल्या विविध नातेसंबंधांच्या कवितांनी रसिक वाचकांना आपलेसे केले आहे. त्यातील आशय आणि अभिव्यक्ती मनाला स्पर्श करून राहतात. नावातच मधु असल्याने व संक्रांतीच्या पूर्वसंध्येला काव्यसंग्रह प्रकाशित होताना या कवयित्रींच्या भावभावनेत तिळगुळाचा गोडवाही भरून राहिला आहे. खास करून या कवयित्रींनी आपला सन्मान आत्मसन्मान सांभाळून भावानुभवांना नेमकेपणाने शब्दबद्ध केले आहे. सर्व स्तरावरील सर्वच वयोगटातील आणि सर्वच घटकांतील कवयित्रींनी व्यक्तिगत भावानुभूतीसह निसर्ग, पर्यावरण, कुटुंब, समाजव्यवस्था, रीतिरिवाज संस्कृती स्त्रीजीवन याविषयी लिहून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. काव्यमय भाव आणि भावकाव्य यांचा मिलाफ मधुसिंधूमध्ये लयबद्ध नादमय शब्दात व्यक्त झाल्याचे जाणवते. आपल्या अनुभवांशी व भावजिवाशी एकरूप होताना अतिशय प्रामाणिकपणे स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला न्याय देऊ अशा तऱ्हेने केलेले काव्य लेखनाचे मनापासून स्वागत आणि आदर करणे योग्य ठरते. आज काव्य लेखनाचे स्वरूप व तंत्र बदलताना ह्या सर्वच कवयित्रींनी सभोवताल वास्तवतेने प्रतिमा आणि प्रतीक यांच्या सहाय्याने सहजतेने व उत्स्फूर्ततेने शीघ्रतेने काव्यलेखन कसे करता येते हे सोदाहरण दाखवून दिले आहे. अतिशय मोजके शब्द, भावपूर्ण आशय, ओघवती शैली या काव्याचे गुणविशेष सांगता येतील. विशेषतः संपादिका कवयित्री माधुरी काकडे यांचीही चोखंदळ दृष्टी, सर्व विषय समावेशकता आणि भावसौंदर्याची विविधता लक्षात घेऊन केलेले संपादनही दखलपात्र ठरते.
या प्रकारच्या काव्यरचनेचे तंत्र व स्वरूप लक्षात घेतल्यानंतर साधारणपणे सुनीत, दशपदी, हायकू, चारोळी याप्रमाणेच मधुसिंधू हा काव्य रचना प्रकार देखील लवकरच लोकप्रिय होईल असा विश्वास वाटतो. कवितेला जवळ जाणारी, दोन शब्दांसह, जोड शब्दांतून भाव शब्दात ही कविता थेट मनाला जाऊन भिडते. उदा. आई होताना एक स्त्री म्हणते त्याप्रमाणे
- क्षण भाग्याचा
- असे मातृत्वाच
- आयुष्यभराचा
- तो मांगल्याचा
- (सौ.विद्या महेश मलवडकर मधुसिंधू काव्य - मातृत्व - पृ.२०६)
एक सुविचारही सहज काही शिकवून जातो.
- शुद्ध कर्माने
- आनंद मिळतो
- ठसा उमटतो
- जगी त्यागाने
- (कवयित्री सौ.अनिला कैलास मुंगसे काव्य- कर्म.पृ.२२)
लोकगीताशी नाते सांगणारे डॉ.सौ. पुष्पांजली आप्पाजी कुंभार यांचे मधु काव्य मधुसिंधू म्हणून नावाजताना
- भक्तीची वाट
- तुळशीची माळ
- भजनात टाळ
- मृदंग थाट
- (पृ.११६.)
तसेच माय मराठीचे माहात्म्य सांगताना सौ.योजना प्रसाद पाटील म्हणतात त्याप्रमाणे
- मराठी माती
- स्वर्ग अलवार
- शब्द हळुवार
- जपते नाती
- (पृ. २२२)
असे आदरभावाने लिहिले आहे.काव्य निर्मितीची भूमिका आणि प्रेरणाही सौ. रश्मी आनंद देवगडे यांनी सोदाहरण विशद केली आहे. काव्य-छंद (पृ.१२१) उत्कट प्रेमाचे भावमधुर नातेही सौ. माया भय्या देशमुख यांच्या मधुसिंधूत शोधताना
- सहवासाची
- गंमत जंमत
- जोडीची संगत
- ओढ सुखाची
- (पृ.७२)
यातून सुखद अनुभव घेता येतो.ह्या मधुसिंधू काव्यसंग्रहाला जगन्नाथ शिंदे (महाराष्ट्र बुक ऑफ रेकाॅर्डिश लेखक) यांची बहुमोल, अभ्यासपूर्ण, प्रदीर्घ प्रस्तावना लाभली ही एक जमेची बाजू मांडता येईल.शिवाय या प्रस्तावनेतून संपूर्ण काव्यसंग्रहाचे अंतरंग व गुणविशेष आणि भावसौंदर्य समजण्यास नक्कीच मदत होईल ! तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार श्री. रणजीत वर्मा यांनी तयार केलेले मुखपृष्ठ सुरेख व अनुरूप आणि देखणे झाले आहे. खास करून महिलांनी महिलांच्या काव्यलेखनास प्रवृत्त करणारा हा काव्यप्रकार बहुगुणसंपन्नतेने अविष्कृत होताना दुसऱ्या बाजूने त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या प्रतिभासंपन्न कवयित्री आणि संपादिका सौ. माधुरी काकडे यांचेही कौतुक करणे श्रेयस्कर ठरते. अल्पावधीतच मधुसिंधू काव्यप्रकार लोकप्रिय करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा महत्त्वपूर्ण वाटतो. हा काव्यसंग्रह प्रातिनिधिक स्वरूपात प्राधान्याने कवयित्रींचा असूनही पुढील काळात कवी-कवयित्रींचा एकत्रित स्वरूपात असा काव्यसंग्रह प्रकाशित होण्यास वाव आहेच! कवी मंडळींनी देखील यातून स्फूर्ती व प्रेरणा घेत असे काव्य लेखन करावे असे मनापासून वाटते. एका नव्या प्रकारच्या काव्यलेखनाला सौ. माधुरी काकडे यांनी चालना दिली असून त्यांचेसह सर्वच सहभागी कवयित्रींचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! नववर्ष संक्रांतीच्याही शुभेच्छा!
- --------------
- संपादकीय संस्कार:-
- सौ. माधुरी मगर- काकडे
- -----------------
- प्रकाशक- अनुराधा प्रकाशन, पुणे
- संपादिका- माधुरी काकडे.
- (भ्र.ध्वनी.९२२६४५३०८८)
- आवृत्ती- जानेवारी २०२२
- पृष्ठे-२३०
- स्वागत मूल्य रु.२००/-
- प्रा. डॉ. मधुकर गणेश मोकाशी.
- संपर्क भ्र.ध्वनी ९०११५६५४०६
0 टिप्पण्या