अमरावती : उच्च शिक्षणाबरोबरच संशोधनाची सोय असलेली शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था शतकपूर्तीकडे वाटचाल करीत आहे. येथील संशोधन व अध्ययन सुविधांच्या विकासासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जात आहे. ही कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी परिपूर्ण नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.
संस्थेच्या परिसरातील नियोजित कामांच्या अनुषंगाने पाहणी करताना जिल्हाधिकारी श्रीमती कौर बोलत होत्या. उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष काकडे, संस्थेच्या संचालक डॉ. अंजली देशमुख, डॉ. शिवानंद कुमार, डॉ. श्रीकृष्ण यावले, विशाखा सावजी, जयंत चौधरी, संतोष पवार आदी उपस्थित होते.
संस्थेच्या परिसरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, उपाहारगृह, मैदाने, वसतिगृहे, प्रयोगशाळा, योगभवन आदी विविध ठिकाणांना भेट देऊन जिल्हाधिका-यांनी नियोजित विकासकामांची माहिती घेतली.
संस्थेला स्वायत्तता मिळाली असून, परीक्षांसाठी स्वतंत्र सेटअप करण्यात येणार असून, परीक्षा विभागासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याचे नियोजन आहे. ब्रिटीशकालीन रंगमंच, वसतिगृहे, जुन्या इमारतींची दुरुस्ती, आवश्यक बांधकाम, प्रयोगशाळेचे अद्ययावतीकरण यासाठी संस्थेला नियोजनानुसार निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तथापि, प्रत्येक काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावे. कुठलेही काम अपूर्ण राहता कामा नये यासाठी आवश्यक साधनसामग्रीसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
संस्थेच्या परिसरातील एका इमारतीत कोविड केअर सेंटरच्या अनुषंगाने तयारी करण्यात आली आहे. त्याचीही पाहणी जिल्हाधिका-यांनी केली. संस्थेत विद्यार्थ्यांचे 75 टक्के लसीकरण झाले आहे. ते पूर्ण करून घेण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.संस्थेला 2022-23 या वर्षात 100 वर्षे पूर्ण आहेत. त्यानिमित्त जुलैपासून विविध कार्यक्रम राबविण्यात येतील. संस्थेत विकासकामांसाठी चालू वर्षासाठी 4 कोटी व 2022-23 साठी 6 कोटी रूपये निधीतून विविध कामांचे नियोजन करण्यात आल्याचे संचालक श्रीमती देशमुख यांनी सांगितले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या