दुःख झेलून त्या मातेने आम्हा घडविले।
क्रांतीज्योती सावित्रीला वंदन हे पहिले।।
धूर्त मनुची कुटील करणी।
होती नारींची करूण कहानी।।
कष्ट यातना होत्या जीवनी।
दुःख अंतरी नयनी पाणी।।
त्या अबलाना कर्तृत्वाने नवजीवन दिधले।। १।।
शिक्षणाची दारे होती।
नारी,बहुजना बंद। ।
विद्येवाचून समाज होता
डोळे असून अंध।।
शिक्षणाच्या गंगेला तू भूवरी आणिले।। २।।
इंधनापरी तु जळली।
चंदनापरी तु झिजली।।
ज्ञानाची पेटवली ज्योती।
विद्येचा वणवा झाली।।
कार्य अधुरे ज्योतिबाचे पुढे चालविले।। ३।।
अनाथांची माता झाली।
दिन दुबळ्यांची वाली।।
उपेक्षितांच्या हक्कासाठी ।
जीवनभर तु झटली।। बहुजनांच्या उद्धारा तु जीवन अर्पियले ।।४।।
कवि-रमेश वरघट
करजगाव
ता. दारव्हा जी. यवतमाळ
0 टिप्पण्या