नागपूर : यंदा हिवाळ्यातही पाऊस सुरू असल्याने थंडीची भट्टी जमलीच नाही. अद्याप फारसा हिवाळा जाणवलाच नाही. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस एकदा पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर वातावरण कोरडे होऊ लागले आहे. परंतु, आता आठवड्याअखेरीस परत एकदा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे नागपूरकरिता हिवाळ्याचे महिने समजले जातात. यंदा नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांमध्ये दर पंधरा दिवसांनी पावसाने हजेरी लावली आहे. यंदा डिसेंबर महिन्यात सर्वाधिक कमी ७.६ अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. हा यंदाच्या मोसमातील नीचांक होता. यंदा म्हणावी तशी थंडी जाणवलीच नाही. जानेवारीतसुद्धा चांगली थंडी असते. तरीसुद्धा सद्यस्थितीत तापमान सरासरीपेक्षा दोन ते अडीच अंशांनी अधिक आहे.
६ जानेवारीपासून उत्तरेकडे पश्चिमी विक्षोपामुळे देशात परत एकदा वार्यांची चक्रीय स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम मध्य प्रदेश आणि विदर्भावरसुद्धा होणार आहे. विदर्भात ढगाळ वातावरण आणि थोड्याबहुत प्रमाणात पावसाचाही अंदाज वर्तविण्यात लावला आहे. शनिवारी, ८ जानेवारीपासून काही दिवसांकरिता परत एकदा पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे. तर, मध्य महाराष्ट्रात ६ व ७ जानेवारी रोजी हलका पाऊस ते गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या