नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे आरोग्यासह आर्थिक व्यवस्थेलाही प्रचंड नुकसान सहन करावे लागले आहे. त्यातही गरीब जनतेला त्याचा फटका बसला असून त्यांच्या उत्पन्नात ५३ टक्क्यांची घट झाली आहे. तर श्रीमंतांच्या संपत्तीत अधिक वाढ झाली आहे.
मुंबई येथील पिपल्स रिसर्च ऑन इंडियाज इकोनॉमी अर्थात प्राईस या संस्थेने २0२१ च्या एका सर्वेक्षण अहवालात हे निरीक्षण नोंदवले आहे. आर्थिक उदारीकरणानंतर सगळ्यात कमी आर्थिक स्तरावर असलेल्या २0 टक्के भारतीय जनतेचे वार्षिक उत्पन्न १९९५ नंतर सातत्याने वाढत होते. पण, कोरोना महामारीदरम्यान २0२0- २0२१ मध्ये उत्पन्नात प्रचंड घट पाहायला मिळाली आहे. २0१५ -१६ नंतर गेल्या पाच वर्षांत ही टक्केवारी ५३ अंशांनी घटली आहे. तर त्या तुलनेने जो २0 टक्के श्रीमंतांचा वर्ग होता, त्यांच्या उत्पन्नात मात्र ३९ टक्क्यांची वाढ झाली आहे. हे सर्वेक्षण एप्रिल आणि ऑक्टोबर २0२१मध्ये करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यात दोन लाख घरे आणि दुसर्या टप्प्यात ४२ हजार घरांचा समावेश होता. हा अहवाल १00 जिल्हे, १२0 तालुके आणि ८00 गावांमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे बनवण्यात आला आहे.
या अहवालात लोकसंख्येला पाच भागांमध्ये विभागण्यात आले. पहिला भाग हा सगळ्यात गरीब २0 टक्के जनतेचा होता. या भागातील लोकांना कोरोनाचा सगळ्यात जास्त फटका पडला. कोरोना महामारीने शहरात राहणार्या गरीब जनतेला सगळ्यात जास्त हानी पोहोचवली आहे. या दरम्यान त्यांचे उत्पन्न संपुष्टात आले. जे उत्पन्न मिळत होते, त्यात ५३ टक्क्यांची घट झाली. दुसर्या २0 टक्के लोकसंख्येत कनिष्ठ मध्यम वर्गाचा समावेश होतो. त्यांच्या उत्पन्नातही ३२ टक्के इतकी घट झाली आहे. तिसरा भाग हा मध्यम उत्पन्न असलेला गट आहे. त्यांच्या उत्पन्नात ९ टक्के घट पाहायला मिळाली. चौथा वर्ग हा उच्च मध्यमवर्गीयांचा गट आहे. त्यात सात टक्क्यांची वृद्धी पाहायला मिळाली तर सगळ्यात श्रीमंत अशा २0 टक्के लोकांच्या उत्पन्नात ३९ टक्के इतकी वाढ आढळून आली.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या