Header Ads Widget

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त एजाज आर्थिक संकटामुळे करतोय मोलमजुरी

    मुंबई : स्वप्न तर खूप आहेत, पण ती पूर्ण करणे शक्य होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळाला होता. पण आता मला आर्थिक संकटामुळे मोलमजुरी करावी लागते आहे. अशी शब्दांमध्ये वयाच्या १५ व्या वर्षी राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळवणारा एजाज नदाफ हा आपली व्यथा मांडतो आहे.

    सध्या एजाज मोलमजुरी करून आपले कुटुंब चालवतो आहे. मोठे धैर्य दाखवून दाखवत नांदेड जिल्हय़ातील अर्धापूूर तालुक्यातील पार्डी येथे २0१८ मध्ये नदीच्या वाहत्या प्रवाहात एजाजने दोन मुलींचा जीव वाचवला होता. एजाज नदाफ या शाळकरी विद्यार्थ्याला राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या हस्ते २0१८ मध्ये राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी एजाज हा केवळ १५ वर्षांचा होता, तो पार्डी येथील रहिवासी असून सध्या त्याला पोटाची खळगी भरण्यासाठी केळीच्या गाडीवर मजुरी करावी लागते आहे. एजाज मोलमजुरी करुन दिवसाला केवळ ३00 रुपये कमवतो आहे. अत्यंत गरीब परिवारात जन्मलेल्या एजाज नदाफचे आई-वडील शेतात मजुरी करतात. त्याच्याकडे बारावीच्या परीक्षेची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते, त्यामुळे त्याचे एक वर्ष वाया गेले. यंदा बारावीत एजाजला ८२ टक्के गुण मिळाले आहेत. पण पुढील शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. सरकारने मदत करण्याची गरज असल्याचे त्याचे आई सांगते.

    जिल्हा परिषदेने यापूर्वी एजाज नदाफला घरकुल मंजूर करण्याचे आश्‍वासन दिले होते. पण आतापर्यंत कोणत्याही योजनेचा लाभ त्याला मिळालेला नाही. तसेच नोकरीही देण्याचे आश्‍वासनही त्याला देण्यात आले होते. सध्या एजाज आणि त्याचे कुटुंब परिस्थितीशी संघर्ष करत अच्छे दिन येण्याची वाट पाहत आहेत. एजाजकडे राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराचे प्रमाणपत्र ठेवण्यासाठी साधे कपाटही नाही. सध्या रेल्वेचे राज्यमंत्रीपद महाराष्ट्राकडे आहे. त्यामुळे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यात लक्ष घालून एजाजला रेल्वेमध्ये नोकरी दिली तर बरे होईल, अशी विनंती एजाजला मदत करणारे सामाजिक कार्यकर्ते नागोराव भांगे यांनी केली आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून दोघांचे प्राण वाचवणार्‍या एजाजला राष्ट्रीय पुरस्कार तर मिळाला. पण त्यानंतर एजाजला काहीही मिळालेले नाही, त्याच्यावर शिक्षण सोडून देण्याची वेळ आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या