कोल्हापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण ज्ञानदेव उपाख्य एन.डी. पाटील यांचे सोमवारी निधन झाले. कोल्हापुरात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ९३ वर्षांचे होते.
वातावरणात बदल झाल्याने पाटील थोडी अस्वस्थता वाटत होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनाच्या दुसर्या लाटेत त्यांना कोरोनाचा संसर्ग देखील झाला होता. परंतु या वयात देखील त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. एक झुंजार नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कामगार, शेतकरी यांच्या अनेक प्रश्नांसाठी ते कायम लढत राहिले.
नारायण ज्ञानदेव पाटील यांचा जन्म १५ जुलै १९२९ रोजी सांगली जिल्ह्यातील नागावमधील ढवळी येथे एका शेतकरी कुटुंबात झाला होता. पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए आणि एल.एल.बी पर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते. कै. एन.डी पाटील १९५४- १९५७ छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथे प्राध्यापक तसेच 'कमवा व शिका' या योजनेचे प्रमुख व रेक्टर होते. त्यानंतर त्यांनी १९६0 साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, इस्लामपूर येथे प्राचार्य म्हणून जबाबदारी स्वीकारली. १९६२ मध्ये ते शिवाजी विद्यापीठ - पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य होते. १९६५ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्य तर १९६२ ते ७८ या काळात शिवाजी विद्यापीठाच्या कार्यकारिणीचे सदस्य होते. शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र विभागाचे डीन म्हणून १९७६-१९७८ याळात त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. प्राथमिक शिक्षण आयोगाचे १९९१ सदस्य नियुक्त झाले.रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व पुढे १९९0 पासून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन म्हणून त्यांनी धुरा सांभाळली होती.
0 टिप्पण्या