Header Ads Widget

लोकांनी आयुष्यभर बूस्टर डोस घेत राहायचे का?-बाळू धानोरकर

    मुंबई : कोरोना विषाणू संसर्गावर सध्या एकमेव प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाचा पर्याय सांगितला जात आहे. त्यामुळेच आता पहिल्या दोन डोसनंतर आता भारतातही परदेशाप्रमाणे तिसर्‍या बूस्टर डोसला सुरुवात झाली आहे. मात्र, यावरूनच काँग्रसच्या एका खासदारांना लोकांनी आयुष्यभर बूस्टर डोस घेत राहायचे का? असा सवाल करत राज्यातील ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला आहे. या खासदारांचे नाव आहे बाळू धानोरकर. त्यांनी कोरोना नियंत्रणात राज्य आणि केंद्र दोघेही अपयशी ठरल्याचा आरोप केला. तसेच केंद्रातील मोदी सरकारवरही कायम स्वरुपी उपाययोजना न केल्याच्या मुद्यावर टीका केली.

    खासदार बाळू धानोरकर म्हणाले, आता उपाययोजना करणे हा विषय राहिलेला नाही. मागील २ वर्षांपासून आपण फक्त उपाययोजना-उपाययोजना म्हणतो आहे. कोविडवर अचूक असे कोणते औषध आहे? ओमिक्रॉनवर कोणते औषध आहे? तुमच्या प्रयोगशाळा काय करत आहेत? केंद्र सरकारच्या प्रयोगशाळा काय करत आहेत? राज्य सरकारच्या प्रयोगशाळा काय करत आहेत? आजही आपण दुसर्‍या देशाने पाठवलेल्या लसींवर बोलतो आहे.

    आपण परदेशात पाहतो की तीनदा लस घेतली, चारदा लस घेतली. फक्त लस हा विषय नाही. लस दिली म्हणजे त्या विषाणूवर नियंत्रण आले का? लस घेतल्यावर विषाणूवर किती दिवस नियंत्रण असेल यावर आजही केंद्र आणि राज्य सरकार बोलत नाही, असे त्यांनी सांगितले.लसीकरण २ महिन्यासाठी आहे की ३ महिन्यासाठी आहे की ६ महिन्यासाठी? आधी म्हणाले ३ महिन्यासाठी आहे, मग सांगितले ६ महिन्यासाठी आहे. आज सरकारकडे लसी उपलब्ध नाहीत म्हणून हे सांगतात ९ महिन्यापयर्ंत हे लसीकरण कार्यरत आहे. याला काय अर्थ आहे, असेही मत बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले.

    यावेळी बाळू धानोरकर यांनी शाळा बंद करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. तसेच लोकांनी आयुष्यभर बुस्टर डोसच घेत रहायचे का? असा सवाल करत राज्यातील ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या