मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यातील दहा मंत्री व २0 आमदारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली असून संसर्ग रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करायच्या याचा विचार सरकारी पातळीवर सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे, कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी दिला.
सातारा जिल्ह्याच्या दौर्यावर असलेले अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल. या संदर्भात मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्याची अंमलबजावणी सर्व भागांत केली जाईल, असे अजित पवार म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी लॉकडाउन केले आहे. देशातील अनेक राज्यांत रात्रीच्या वेळेस लॉकडाउन करण्यात आले आहे. कारण, जेवताना, चहापाण्याच्या वेळेस मास्क काढतो. एकमेकांच्या समोर येतो तेव्हा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होतो. त्यामुळे या गोष्टी टाळणे नितांत गरजेचे आहे, असे अजित पवार म्हणाले.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आपण स्वत: काळजी घेत असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. माझे कार्यक्रम सुद्धा मी वेळे अगोदरच घेतो. त्यामुळे गर्दी कमी होते आणि मीच जर नियम मोडले तर बाकीच्यांना नियम काय सांगणार? पाच दिवसांच्या अधिवेशनात १0 मंत्री आणि २0 आमदार पॉझिटिव्ह झाले. काही दिवस अजून अधिवेशन चालू ठेवले असते तर अध्र्यापेक्षा जास्त मंत्रिमंडळ आणि आमदार कोरोना पॉझिटिव्ह झाले असते, अशी भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
0 टिप्पण्या