अमरावती : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेत नाफेडच्या वतीने हंगाम 2021-22 साठी तूर खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे.
राज्य सहकारी पणन महासंघाच्या जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयातर्फे 20 डिसेंबरपासून ऑनलाईन पध्दतीने नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, जिल्ह्यात एकूण सात खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. केंद्राच्या ठिकाणीही नोंदणी सुरू करण्यात आली असून शेतकरी बांधवांनी केंद्राच्या ठिकाणी संपर्क करून नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
अधिकाधिक शेतकरी बांधवांना हमीभावाचा लाभ मिळवून द्यावा
पणन कार्यालयाने अधिकाधिक शेतकरी बांधवांची नोंदणी करून घ्यावी. कुठेही शेतकरी बांधवांची अडवणूक होता कामा नये, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात सात केंद्रे
जिल्हा विपणन कार्यालयामार्फत चांदूर रेल्वे, दर्यापूर, धारणी, नांदगाव खंडेश्वर, तिवसा, अचलपूर येथे, तर खरेदी विक्री संघामार्फत तसेच अचलपूर येथे ‘जयसिंग विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पथ्रोट’ मार्फत नोंदणी सुरू आहे.
आवश्यक कागदपत्रे
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देताना जिल्हा विपणन अधिकारी कल्पना धोपे म्हणाल्या की, नोंदणीसाठी खरीप हंगाम 2021-22 मधील पीक पेरा नोंद असलेला तलाठ्यांच्या सही-शिक्क्यानिशी ऑनलाईन सात बारा,आधारकार्डाची छायांकित प्रत, बॅक पासबुक प्रत सोबत आणावी व बँक पासबुकावर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड स्पष्ट नमूद असावा. यामध्ये जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये, असे श्रीमती धोपे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या