चंदीगढ : उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये एकीकडे अनेक उमेदवार निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरत असताना एक व्यक्ती मात्र पराभव व्हावा म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार करतोय. विशेष म्हणजे या व्यक्तीने आतापयर्ंत ९३ वेगवेगळ्या निवडणुका लढल्यात. या सर्व निवडणुकांमध्ये त्याचा पराभव झालाय.
मात्र तरीही त्याने ९४ व्यांदा निवडणूक अर्ज करण्याची तयारी सुरु केलीय. या व्यक्तीला १00 वेळा निवडणुकीमध्ये परभूत होण्याचा विक्रम करायचाय. काय धक्का बसला ना वाचून? पण हे खरे आहे. या व्यक्तीचे नाव आहे हसनू राम. मला यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्येही पराभूत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, असे हसनू राम यांनी म्हटले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार ९३ वेळा पराभूत झाल्यानंतर हसनू राम हे त्याच उत्साहाने निवडणुकीचा अर्ज करणार आहेत. ही हसून यांची उमेदवार म्हणून ९४ वी निवडणूक असणार आहे. मात्र यंदाही आपल्याला पराभूत होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही, असा दावा हसनू यांनी केलाय. आपण १00 निवडणुकींमध्ये पराभूत होण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. हा विक्रम मला माझ्या नावावर करायचा आहे, असे हसनू सांगतात.
७५ वर्षीय हसनू वेगवेगळ्या ९३ निवडणुका लढले असून प्रत्येक पराभवानंतर ते आनंद व्यक्त करतात. खेरागड तहसीलमधील नगला दूल्हा येथील रहिवाशी असणार्या हसनू यांच्या या निवडणूक लढण्याच्या आणि पराभवाचे सातत्य सारख्याची कथाही मोठी रंजक आहे.
३६ वर्षांपूर्वी एका मोठय़ा पक्षाने हसनू राम यांना निवडणुकीचे तिकीट देण्याचे आश्वासन देत अंतिम क्षणी तिकीट नाकारले होते. हसनू राम यांच्या मनाला ही गोष्ट फार लागली. त्यानंतर तेव्हापासून ते सातत्याने निवडणुका लढवत आहेत.
हसनू राम पूर्वी राजस्व विभागामध्ये कार्यरत होते. मात्र निवडणुकांसाठी त्यांनी आपली नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतरही त्यांना पक्षाकडून तिकीट मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी महापालिका निवडणुकीपासून ते विधानसभा निवडणुकीपयर्ंत सर्वच निवडणुका लढवण्यास सुरुवात केली.१५ ऑगस्ट १९४७ रोजी जन्म झालेल्या हसनू राम हे आंबेडकरवादी आहेत. एका पक्षाकडे हसनू यांनी तिकीट मागितले होते. त्यावर त्या पक्षाच्या नेत्यांनी हसनू यांना तुला तर तुझा शेजारीही मत देणार नाही. तू निवडणूक लढून काय करणार?, असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर पराभव पचवण्याची तयारी पाहिजे या उद्देशाने हसनू हे प्रत्येक निवडणूक लढवू लागले आणि त्यात पराभूत होऊ लागले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या