Header Ads Widget

७, ८, व ९ जानेवारी रोजी सोलापुरात ३४ वे राज्य पक्षिमित्र संमेलन

    सोलापूर : ३४ वे महाराष्ट्र राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलन येत्या ७, ८, व ९ जानेवारी रोजी सोलापुरात डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित केले असून संमेलनाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती संयोजक डॉ. मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन यांनी दिली.

    डॉ. मेतन फाऊंडेशनच्यावतीने आणि सामाजिक वनीकरण व वन विभाग सोलापूर यांच्या संयुक्त सहकार्याने होणार्‍या या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ पक्षिमित्र प्रा. डॉ. निनाद शहा हे आहेत. तर स्वागताध्यक्ष जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे आहेत. वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे उद्घाटक आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते व पुण्याच्या एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशनच्या सचिव प्रा. स्वाती कराड-चाटे यांच्या उपस्थितीत उद््घाटन होणार आहे. कोरोनाविषयक सर्व नियमावलींचे काटेकोरपणे पालन करीत पार पडणार्‍या या संमेलनासाठी अमरावती व नाशिकहून सायकल फेरी येणार आहे. या सायकल फेरीचे स्वागत पोलिस आयुक्त हरीश बैजल करतील.

    बोधचिन्ह म्हणून सापमार गरुडाचे चित्र -

    या संमेलनाचे बोधचिन्ह म्हणून सापमार गरुडाचे चित्र वापरले जाणार आहे. सोलापूर जिल्हा माळरान व गवताळ प्रदेश व त्यावरील जैविक विविधतेसाठी ओळखला जातो. माळरानावर अनेक शिकारी पक्षी आढळतात. त्यापैकी सापमार गरुड पक्षी या माळरानावरील वैभव म्हणून ओळखला जातो. या संमेलनाची संकल्पना ह्य माळरान- शिकार पक्षी संवर्धन ह्य अशी निवडण्यात आली आहे. सोलापूरचे वनक्षेत्र अवघे १.८ टक्के असले तरी येथे ३५७ प्रजातींचे पक्षी आढळतात. त्यामुळेच सोलापूर हे पक्ष्यांचे माहेरघर आहे, असे प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीमअली यांनी म्हटले होते. या संमेलनात पक्षी निरिक्षण भ्रमंतीसाठी हिप्परगा जलाशयासह सिद्धेश्‍वर वनविहार व माळरानावर भ्रमंती केली जाणार आहे.

    शुक्रवारी ७ जानेवारी रोजी पक्षिमित्रांसाठी दोन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. यात जखमी पक्ष्यांची राखायची निगा, छायाचित्र संपादन आदी विषयांवर कार्यशाळा आयोजिली आहे. ८ व ९ जानेवारी रोजी पक्षी विषयांवर व्याख्याने, शोधनिबंध, मुलाखत आणि चर्चासत्र होणार आहे. या संमेलनात महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेचा उद्देश साध्य करून सोलापूर हे पक्ष्यांचे नंदनवन असल्याचा संदेश दिला जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या