औरंगाबाद : देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मोठी गुड न्यूज दिली आहे. देशातील रेल्वेस्थानक अत्याधुनिक करत विमानतळासारखे केले जाणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे यात महाराष्ट्रातील काही शहरांचा सुद्धा समावेश असणार आहे.
औरंगाबाद येथील आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलतांना दानवे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी तीनही मंत्र्यांना बोलवून, स्मार्ट रेल्वेस्थानक करण्याबाबत बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आगामी काळात देशातील रेल्वेस्थानक स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. आज ज्याप्रमाणे विमानतळावर सुविधा मिळतात त्याप्रमाणे विमानतळेसारखी अत्याधुनिक पद्धतीने रेल्वेस्थानक सुध्दा केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात देशातील अशी ७0 रेल्वेस्थानक निवडली जाणार आहे. या पुढील एक महिन्यात याबाबतचे टेंडर काढले जाणार असून, २0२४ पयर्ंत यातील काही रेल्वेस्थानक स्मार्ट रेल्वेस्थानक म्हणून लोकांच्या सुविधेसाठी पूर्णपणे तयार राहतील, असे दानवे यांनी सांगितले.
या स्मार्ट रेल्वेस्थानकात अद्यावत आशा इमारती असणार आहे. ज्यात पर्यटकांसाठी विशेष सुविधांनी सज्ज असलेल्या इमारती असतील. तसेच याठिकाणी हॉटेल, मॉल या सारख्या सुध्दा सुविधा पुरवल्या जातील. आज ज्या पद्धतीने अद्यावत विमानतळे आहेत त्याचप्रमाणे ही स्मार्ट रेल्वेस्थानक तयार करण्याचा संकल्प असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. मोदी सरकारच्या 'स्मार्ट रेल्वेस्थानक' या महत्वाकांक्षी योजनेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील रेल्वे स्थानकांचा सुद्धा समावेश असणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली. ज्यात पुणे, मुंबई, नागपूर, दादर स्टेशन, सीएसटीएम यांचा समावेश असणार आहे. तर यात प्रामुख्याने नागपूर-मुंबई आणि पुणे या शहरांचा पहिल्या टप्प्यात समावेश असणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या